
सोशल मीडियावर नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नेहमीच नवनवीन ट्रेंड येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून Ghibli च्या ट्रेंडमुळे सोशल मीडियावर या इमेजेसचा अक्षरशः महापूर आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह Ghibli फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही वेगवेगळ्या Ghibli इमेजेस व्हायरल होत आहेत. जाणून घ्या नेमका काय आहे हा ट्रेंड? तुम्ही तुमच्या Ghibli इमेजेस कशा बनवू शकता?
काय आहे Ghibli इमेजेसचा ट्रेंड?
सोशल मीडियावर तुम्हाला वैयक्तिक किंवा राजकीय, सामाजिक, कला, खेळ इत्यादी क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिंच्या हुबेहूब कार्टून इमेजेस व्हायरल होत असलेल्या पाहायला मिळतील. या Ghibli इमेजेस आहेत. Open AI ने ChatGPT '४० इमेज जनरेशन' हे नवीन फिचर आणले आहे. अल्पावधीतच या नवीन फिचरने जगभरात लोकप्रियता मिळवली. तसेच सोशल मीडियावर Ghibli इमेज अपलोड करण्याचा मोठ्या प्रमाणात ट्रेंड सुरू झाला आहे. या इमेजेस खूपच आकर्षक वाटतात. त्यामुळे त्याची संपूर्ण जगभरातील नेटकऱ्यांना भूरळ पडत आहे.
राजकारण्यांना देखील भूरळ
केंद्र सरकारचे MyGovIndia या अधिकृत एक्स हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वेगवेगळ्या Ghibli इमेजेस पोस्ट करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक फोटोमध्ये एका विशिष्ट घटनेची स्टोरीलाइन आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ''नवीन भारताचा स्टुडिओ घिबली स्ट्रोक्स स्टाईलमध्ये अनुभव घ्या.'' तर भाजपच्या अधिकृत एक्स हँडल पोस्टमध्येही PM मोदींच्या Ghibli इमेजेस शेअर केल्या आहेत.
सोशल मीडियावर लोकप्रिय होत असलेल्या या ट्रेंडमध्ये राजकारणी देखील मागे नाही. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक फोटो Ghibli इमेजमध्ये कनव्हर्ट करून तो शेअर केला आहे. त्यावर त्यांनी ''ही माझी #ghibli स्टाइलची एन्ट्री आहे 😀 तंत्रज्ञान आपल्याला नेहमीच आनंदाने आश्चर्यचकित करते!'' असे म्हटले आहे.
IPL टीमही मागे नाही
सध्या IPL चा १८ वा सिझन सुरू आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स टीमनेही सामन्यातील वेगवेगळ्या क्षणांचे फोटो ghibli स्टाईलमध्ये पोस्ट केले आहेत.
सॅम ऑल्टमन यांनीही ठेवला Ghibli डीपी
तर Open AI चे CEO सॅम ऑल्टमन यांनीही त्यांच्या एक्स खात्यावर त्यांचा डीपी Ghibli स्टाईलमध्ये ठेवला आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे की, ''ChatGPT च्या या फिचरला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. लोक मजा म्हणून याला पसंती देत आहेत. मात्र, हा ट्रेंड इतका जास्त प्रसिद्ध झाला आहे की यामुळे ChatGPT चे GPU खूपच स्लो (Melting) झाले आहे.'' असे म्हटले आहे.
Ghibli इमेज कशी तयार करायची?
Ghibli इमेज तयार करणे अतिशय सोपे आहे. यासाठी तुम्हाला ChatGPT 40 आवश्यक आहे. चॅटजीपीटीमधील इमेज क्रिएटर ऑप्शनवर जाऊन तिथे योग्य प्रॉप्म्ट अर्थात कमांड द्यायची आहे.
त्यासाठी प्रथम तुम्हाला जो फोटो Ghibli स्टाईलमध्ये तयार करायचा आहे. तो फोटो तिथे अपलोड करा.
त्यानंतर ChatGPT ला योग्य प्रॉम्प्ट अर्थात कमांड द्या.
उदाहरणार्थ, Can You turn this into a Ghibli style Photo? किंवा Show me This Photo in Studio Ghibli Style अशी योग्य कमांड द्या.
काही सेकंदात तुमचा Ghibli स्टाईल फोटो तयार होईल.
हा ट्रेंड लोकांमध्ये का प्रसिद्ध होत आहे?
लोकांना रिॲलिस्टिक वाटणाऱ्या या इमेजेसचा आनंद घेता येतो.
लोकांना आपले जुने फोटो नवीन स्टाईलमध्ये करून पुन्हा एकदा ते क्षण नव्याने जगता येतात.
तर लोकांना राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचे मिम्स तयार करता येतात.
काही जण जुन्या हिंदी चित्रपटातील लोकप्रिय दृश्यांचे कार्टून बनवून ते पोस्ट करत आहेत. यामध्ये त्यांना मजा वाटते. डीडीएलजे चित्रपटातील शाहरूख काजोलचा ट्रेनमध्ये हात देऊन घेतो त्या दृष्याचे Ghibli फोटो मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग होत आहेत.
Studio Ghibli काय आहे?
Studio Ghibli हा जपानमधील ॲनिमेशन चित्रपट बनवणारा एक प्रसिद्ध स्टुडिओ आहे. हयाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता या दिग्गज दिग्दर्शकांनी मिळून १९८५ मध्ये केली होती. या स्टुडिओद्वारे तयार केलेले ॲनिमेशनपट प्रचंड प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले आहे. निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या हातांनी काढलेल्या सुंदर कला चित्रांचे हे अॅनिमेशन आहेत. आज त्याच नावाने हा ट्रेंड प्रसिद्ध झाला आहे.