Gudi Padwa 2025 : काय आहे गुढी पाडव्याचं निसर्गाशी नातं? बदललेला ऋतूचा देतो संदेश

कडुलिंबाचा पाला आणि गुळ किंवा खडीसाखर खाण्यासाठी या दिवशी खूप महत्त्व असते. जाणून घेऊया गुढी पाडव्याचा निसर्गाशी काय नाते आहे? बदललेल्या ऋतूंचा काय संदेश देतो.
Gudi Padwa 2025 : काय आहे गुढी पाडव्याचं निसर्गाशी नातं? बदललेला ऋतूचा देतो संदेश
X- @arvindvarchaswi
Published on

हिंदू चांद्र कालगणनेनुसार ३० मार्च रोजी हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढी पाडवा म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या शेजारील राज्यांमध्येही उगाडी नावाने हा सण साजरा केला जातो. विशेष म्हणजे या सर्व भागात कडुलिंबाचा पाला आणि गुळ किंवा खडीसाखर खाण्यासाठी या दिवशी खूप महत्त्व असते. जाणून घेऊया गुढी पाडव्याचा निसर्गाशी काय नाते आहे? बदललेल्या ऋतूंचा काय संदेश देतो.

वसंत ऋतू

हिंदू कालगणना ही चांद्र आणि सौर दिवसांचा योग्य तो ताळमेळ बसवून केली जाते. चैत्र, वैशाख असे सर्वच महिने त्या-त्या नक्षत्रांच्या नावे आहेत. या कालगणनेत २८ किंवा २९ दिवसांचेच महिने असतात. हे महिने नक्षत्र, चंद्राचे भ्रमण आणि सौर चक्राप्रमाणे बदलेल्या ऋतूनुसार असतात. या ऋतूंमध्ये निसर्ग जसा बदलतो तसे सणांना महत्त्व असते. गुढी पाडवा देखील असाच निसर्गाशी जवळचे नाते सांगणारा आहे.

गुढी पाडवा चैत्र महिन्यात अर्थात मार्चमध्ये येतो. यावेळी वसंत ऋतूचे आगमन होऊन नुकतेच काही दिवस झालेले असतात. वसंत ऋतू हा फुलांचा ऋतू मानला जातो. या दिवसांमध्ये फुलांना मोठा बहर आलेला असतो. गुढी पाडव्याला गुढी उभारताना झेंडूच्या फुलांचे हार बांधले जातात.

झाडांना नवी पालवी

वसंतपूर्वी झाडांची नुकतीच पानगळ झालेली असते. त्यामुळे सगळी झाडे शुष्क वाटतात. मात्र, वसंतला बहार येताच झाडाला नवीन पालवी फुटलेली असते. झाडांना नवीन येणारा कोवळा पाला आरोग्यासाठी उत्तम असतो. त्यामुळे या दिवसात कडक उन्हाळ्यातही झाडांच्या खाली गारवा मिळतो.

कडुलिंबाच्या पानाचे महत्त्व

गुढी उभारताना कडुलिंबाची डहाळी त्याला बांधण्यात येते. कडुलिंब हा भारतीय उपखंडाला मिळालेले एक वरदान आहे. जे अनेक आजारांवर गुणकारी आहे. कडुलिंबाची पाने गुढी पाडव्याला खडी साखरेसोबत किंवा गुळासोबत खातात. आयुष्य हे कडू, गोड अशा सर्वच घटनांनी भरलेले असते. त्यामुळे दोघांची आवश्यकता त्यात सांगितलेली असते. तर कडुलिंब हे उन्हाळ्यात गारवा देणारे असते. यामुळे रक्तशुद्धीकरण होते. त्यामुळे कडुलिंबाचा थोडा पाला या दिवसापासून चावून चावून खावा, असा संदेश यामध्ये देण्यात येतो.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in