

हिंदू नववर्ष 30 मार्च रोजी चैत्र प्रतिपदेला सुरू साजरा केला जाणार आहे. याला पाडवा असेही म्हणतात. तर महाराष्ट्रात या सणाला गुढी उभारली जाते. त्यामुळे याला गुढी पाडवा असेही म्हणतात. महाराष्ट्रात या दिवशी दारात, अंगणात, बाल्कनीत आणि हल्ली मेट्रो शहरांमध्ये जिथे जागा नाही तिथे खिडकी किंवा घरातच टेबलावर गुढी उभारली जाते. गुढी उभारून याची पूजा केली जाते. गुढी उभारण्याला आध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व आहे. जाणून घेऊया या पाठीमागील कथा, परंपरा आणि गुढी कशी उभारली जाते.
गुढी कशी उभारतात?
गुढी उंच बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र बहुधा नवी कोरी रेशमी साडी नेसवली जाते. त्यावर आंब्याची पान, फुले सर्वात महत्त्वाचे कडुलिंबाची डहाळी आणि सोबत साखरेच्या गाठी बांधल्या जातात. त्यानंतर त्यावर चांदी अथवा तांब्याचा कलश उलटा बसवला जातो त्याला गडू असेही म्हणतात.
गुढी उभारण्याचे महत्त्व
गुढी ही विजय, आनंद, प्रेम, स्नेह आणि मांगल्याचं प्रतिक मानली जाते. तर जुणे जाणते लोक संस्काराची नव संकल्पाची गुढी उभारावी असे म्हणतात. अनेक जण गुढी पाडव्याला नवीन वर्षाला नवीन संकल्प करतात. ही गुढी जीवनात नवीन आनंद घेऊन येते.
काय आहे गुढी उभारण्यामागील कथा?
गुढी हे विजयाचं प्रतिक आहे असं मानलं जातं. मात्र, ही गुढी नेमकं कोणत्या गोष्टीवरील विजयाचं प्रतिक आहे. हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर इथे त्याचे उत्तर आहे. चैत्र प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नवीन वर्षाला शालिवाहन शक म्हटले जाते. शालिवाहन या राजाने शकांवर मिळवलेल्या विजयानंतर चैत्र महिन्यापासून राजाने शालिवाहन शके ही नवीन कालगणना शालिवाहन राजाने सुरू केली.
शक हे मध्य आशियातील होते. तर त्यांनी प्राचीन भारतावर मोठे आक्रमण केले होते. यावेळी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश कर्नाटकातील काही भागात शालिवाहन राजाचे राज्य होते. अनेक इतिहासकार शालिवाहन राजा याचे कूळ सातवाहन राजांशी जोडतात. सातवाहन कुळातील राजा शालिवाहन असे अनेकांचे मत आहे. शालिवाहनाने शकांचा प्रचंड पराभव करून त्यांना संपूर्ण पश्चिम दिशेतून हुसकावून लावले. नवीन स्थापना केली. त्यामुळे त्याला शकारी असेही म्हणतात. याविजयाची आठवण म्हणून गुढी उभारली जाते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)