गुढीपाडव्याचा सण, आला बंधुजी पावणा

गुढी उभारण्याच्या परंपरेची वेगवेगळी ऐतिहासिक कारणं दिली जातात. पण या कारणांच्या पलीकडे निसर्गातील बदलांचं स्वागत करणारा सण म्हणूनही लोकमानसात गुढीपाडव्याचं महत्त्व आहे. निसर्ग बदलतो तेव्हा सभोवतालचे रंग, गंध, रस, रूपही बदलते. त्याचे स्वागत लोकमानसाने जसे गुढी उभारून केले तसेच विविध पंचपक्वान्न बनवूनही केले.
गुढीपाडव्याचा सण, आला बंधुजी पावणा
Published on

- लोकवाङ्मयातली खाद्यसंस्कृती

- डॉ. मुकुंद कुळे

गुढी उभारण्याच्या परंपरेची वेगवेगळी ऐतिहासिक कारणं दिली जातात. पण या कारणांच्या पलीकडे निसर्गातील बदलांचं स्वागत करणारा सण म्हणूनही लोकमानसात गुढीपाडव्याचं महत्त्व आहे. निसर्ग बदलतो तेव्हा सभोवतालचे रंग, गंध, रस, रूपही बदलते. त्याचे स्वागत लोकमानसाने जसे गुढी उभारून केले तसेच विविध पंचपक्वान्न बनवूनही केले.

चैत्रमासातली रंगाची-गंधाची-चवीची नोकझोंक वेगळी खरीच नि याची सुरुवात होते गुढीपाडव्यापासून. गुढीपाडवा, वर्षातला पहिला मराठी सण. मराठी नववर्षाला आणि चैत्राला सुरुवात होते ती याच दिवसापासून. अंगणात गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत करण्याची परंपरा आपल्याकडे शेकडो वर्षं आहे. या परंपरेमागचं एरव्हीचं कारण काहीही असो, मला मात्र गुढी उभारणे म्हणजे निसर्गातल्या बदलाचं स्वागत करणे असंच वाटतं. कारण लोकपरंपरेतील निसर्गाला या चैत्रापासूनच सर्जनाचे खरे डोहाळे लागतात. मग चैत्राच्या या रंगाढंगाचं वर्णन करायला शब्दही अपुरेच पडतात. पुरे तरी कसे पडणार, निसर्ग काय शब्दांत पकडायची गोष्ट आहे? तो अनुभवण्याचाच विषय... त्यात चैत्रमास असेल, तर निसर्ग म्हणजे केवळ अनुभवणं नव्हे, तर उपभोगणंही त्यात समाविष्ट होतं आणि मग चैत्रमास अंगात भिनत जातो...

याची सुरुवात खरंतर वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे गुढीपाडव्यापासूनच होते. आंबट-गोड-तिखट-तुरट अशा सगळ्या चवीढवी चैत्रातल्या या पहिल्याच दिवशी अनुभवायला मिळतात. म्हणजे दारात गुढी उभारून तिची पूजा करून झाली की प्रत्येकाच्या हातावर कडुलिंबाच्या पाल्याची वाटलेली गोळी ठेवली जाते. अलीकडे शहरांतून कडुलिंबाची पानं गूळ-साखरेसह मिक्सरवर एकत्र फिरवून, आंबटपणासाठी त्यात लिंबू पिळून त्याची केलेली छोटी गोळी परंपरेचा उपचार म्हणून हातावर ठेवली जाते. परंतु पूर्वी कडुलिंबाची पानं, आंब्याच्या फोडी, गूळ, भिजवलेली चणाडाळ पाट्यावर वाटून त्याचा मोठा गोळा घरातील प्रत्येकाच्या हातावर ठेवला जायचा. मराठवाड्यासारख्या ठिकाणी तर कडुलिंबाचा मोहोर (स्थानिक भाषेत- तोर), आंब्याच्या कैरीच्या फोडी, खवलेला ओला नारळ, गूळ, भिजवलेली चणाडाळ, चिंचेचं बोटूक... हे सारं एकत्र करून त्यात थोडं पाणी टाकून हातानेच कालवलं जाई आणि प्रत्येकाला अर्धी-अर्धी वाटी खावं लागे; जेणेकरून वर्षाच्या पहिल्याच दिवशी चैत्रातल्या सगळ्या चवी पोटात जाव्यात. गंमत म्हणजे चैत्रातल्या नवरात्रात कैरीपासून बनवलेल्या पेयाला ‘पन्हं’ म्हटलं जातं. मात्र मराठवाड्यात नांदेडकडे गुढी उभारल्यावर प्रसाद म्हणून वाटल्या जाणाऱ्या या मिश्रणालाही ‘पन्हं’च म्हटलं जातं, तर सोलापूरकडे याच प्रकाराला ‘घोळाणा’ असं म्हणतात. घोळाणा म्हणजे एकप्रकारची कोशिंबीरच. अर्थात गुढी उभारल्यावर द्यायचा हा प्रसाद म्हणजे एक उपचार. आपल्या मनमनात गुढीपाडवा जपला जातो तो त्या दिवशी घराघरांत बनणाऱ्या पक्वान्नांसाठीच. अर्थात पूर्वी स्वतः खपल्याशिवाय काहीच मिळत नसे. मग एखाद्या नवविवाहितेला या पहिल्याच सणाला हटकून माहेराची आठवण यायची आणि ती म्हणायची,

“आला पाडव्याचा सण, गुढी उभारली दारी

माझ्या ग माहेरी, पक्वान्नांच्या नाना परी...”

अर्थात अलीकडच्या काळात पक्वान्नांच्या या नाना परी अगदी सहज विकत मिळतात. गंमत म्हणजे गेल्या कित्येक वर्षांत कुठल्या सणाला कोणता गोड पदार्थ करायचा ते ठरून गेलं आहे. म्हणजे दसऱ्याला श्रीखंड, संक्रांतीला गूळपोळी, होळीला पुरणपोळी आणि पाडव्याला पुन्हा श्रीखंड किंवा बासुंदी. आता हे असं पदार्थांचं एकसाचीकरण झालेलं आहे. म्हणजे एखाद्या सणाला कोणाच्याही घरात जेवायला गेलात तर तुम्हाला तेच-तेच पदार्थ-पक्वान्नं खायला मिळतात. मात्र पूर्वी असं नव्हतं. पूर्वी त्या-त्या काळात जिथे जे-जे पिकतं त्यापासूनच बनवलेली पक्वान्न जेवणात असायची. म्हणजे सण होळी किंवा गुढीपाडव्याचा असला तरी प्रत्येक भागात बनणारी पक्वान्नं वेगवेगळी असायची. कधी पुरणपोळी, कधी शेवयांची खिर, कधी उकडीच्या करंज्या, तर कधी शेवया आणि गुळवणी. म्हणून तर लोकवाङ्मयात गुढीपाडव्याला केल्या जाणाऱ्या या पदार्थांचेही दाखले मिळतात -

“बापाजी माझा वड, माय माझी वडाबाई

दोघांच्या सावलीची, काय सांगू मी बढाई

गुढीपाडव्याचा सण, आला बंधुजी पावणा

त्याच्या भोजनाला, शेवया रांधिते बहिणा”

आज जरी गुढीपाडव्याला शेवया करत नसले तरी, लोकपरंपरेत गुढीपाडव्याच्या सणाला बनवल्या जाणाऱ्या शेवयांचा उल्लेख हमखास येतो. विशेषतः कोकणात गुढीपाडव्याला त्यावर्षी शेतात पिकलेला भात वाह्यनात कांडून ते तांदूळ जात्यावर दळले जायचे आणि मग त्या पिठाची उकड करून त्याच्या शेवया केल्या जायच्या. जेवताना या शेवया गूळ टाकलेल्या नारळाच्या दुधात (याला गुळवणी किंवा रस असं म्हटलं जातं.) मुरवून खाल्ल्या जायच्या. विशेष म्हणजे मराठवाड्याच्या काही भागांत गुढीपाडव्याला खास बोटव्याची न्याहारी केली जाते. बोटवे म्हणजे एकप्रकारच्या शेवयाच. मात्र या शेवया तांदळाच्या नसतात, तर गव्हाची सोजी काढून नंतर ती पाण्यात भिजवून-मळून बोटांच्या पेरावर केलेल्या या शेवया (बारीक निमुळते तुकडे) असतात आणि म्हणूनच त्यांना ‘बोटवे’ असं म्हणतात. कोकणातल्या तांदळाच्या शेवया या लांबलचक असतात, तर बोटवे म्हणजे छोटे-छोटे गव्हाच्या किंवा तांदळाच्या आकाराचे तुकडे. यांनाच काही ठिकाणी गव्हले, नखुल्या, मालत्या अशी प्रदेशपरत्वे वेगवेगळी नावं आहेत. असाच गुढीपाडव्याचा एक वेगळा पदार्थ म्हणजे तेलची आणि गुळवणी! पूर्वी नगर परिसरात गुढीपाडवा म्हटला की घरोघरी तेलची आणि गुळवणीचाच बेत असायचा. तेलची म्हणजे एकप्रकारे मैदा किंवा रवा भिजवून केलेल्या पुऱ्याच. मात्र तेलच्या नेहमीच्या पुऱ्यांपेक्षा मोठ्या आकाराच्या असतात आणि त्या पुरीप्रमाणे टम्म फुगवल्या जात नाहीत. उलट त्यांचे पापुद्रे न सुटता ते एकमेकांना चिकटूनच राहतील असं बघितलं जातं. कारण तरच मग या तेलच्या गुळवणीबरोबर खायला मजा येते. अर्थात कोकणातलं गुळवणी हे प्रामुख्याने नारळाच्या रसाचं असलं, तरी नगर किंवा इतरत्र मात्र पाणी टाकून गूळ उकळवून गुळवणी केलं जातं. विदर्भातही गुढीपाडव्याला काही भागात म्हणजे चंद्रपूरकडे खास गहू, ज्वारी, हरभरे आणि तुरी दाणे एकत्र शिजवून त्या घुगऱ्या तिखट-आंबट चटण्यांसह खायची पद्धत आहे. म्हणजेच गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत पूर्वी वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ केले जायचे. आज मात्र आपण उच्च वर्णाच्या अनुकरणातून त्यांची खाद्यसंस्कृती स्वीकारत चाललो आहोत. परिणामी खाद्यसंस्कृतीचं सपाटीकरण होत चाललं आहे.

अर्थात गुढीपाडव्यापासून चैत्र सुरू झाला, की उन्हाचा तडका जाणवू लागतो. पण सूर्यालाही रसपान करायला लावणारा हा महिना, मग तो आपल्याला नाराज कसा करेल? उलट सूर्याचा ताप आपल्याला सहन करता यावा म्हणून तो निसर्गात आल्हाददायक बदल घडवतो. रस, रंग, रूप, गंध आणि चव... अशा पंचसंवेदनांची अनुभूती देणाऱ्या सगळ्याच आस्वाद-इंद्रियांना तो साद घालतो. फुलझाडं फुलतात, फळझाडं बहरतात, सृष्टीचा एकच उत्सव सुरू होतो - चैत्रोत्सव!

असा हा चैत्रोत्सव म्हणजे लोकसंस्कृतीचा अपार जिव्हाळ्याचा विषय. तसे तर सारेच महिने लोकसंस्कृतीला प्यारे... पण तरीही चैत्रमास लोकसंस्कृतीसाठी खासच! कारण हा नवनिर्माणाचा, नवसर्जनाचा महिना... म्हणून तर अनेक लोकगीतांत म्हटलंय -

“आला चैत्रमास उन्हाळा

हवा खाऊ चला, आंबेवना...”

आणि हे खरंच आहे, आमराईत गारवा असल्यामुळेच पूर्वीच्या काळी उन्हाळ्याच्या दिवसांत आंबेवनात म्हणजेच आमराईत खास सहलींचं आयोजन केलं जायचं... नि आमराईत गेल्यावर कैरीचं पन्हंही हमखास मिळायचं. गुढीपाडव्याच्या पाचव्या दिवसापासून चैत्रातलं नवरात्र सुरू होतं, या नवरात्राचं आकर्षण म्हणजे कैरीचं पन्हच. ते उन्हाळ्यातही शरीराला गारवा देतं.

खरंतर एकूणच चैत्रमास म्हणजे मानवी भावभावनांना नैसर्गिक साद घालणारा मास. त्याशिवाय का त्याला ‘मधुमास’ असा सुरेख शब्द वापरला जातो? मधू म्हणजे मकरंद-मध. चैत्रमासात, वसंत ऋतूत संपूर्ण निसर्गच फुलून येतो. फुलं फुलतात, तरू-वेली मोहरतात... मग संपूर्ण वातावरणात मधाचा एक ओढाळ-वेल्हाळ गंध भरून राहतो. हा गंध एकदा का नाकात शिरला, की तो आपलं शरीरच बधिर करून टाकतो. मधुमासातील मधाचा असा चढलेला कैफ सहजासहजी उतरत नाही. मग चंद्राचं चांदणं ताप वाढवतं, शरीराला शीतलता मिळावी म्हणून लावलेला चंदनाचा लेपही, ताप कमी करण्याऐवजी उलट तो वाढवतो. म्हणून तर एखादी अवखळ नायिका म्हणते-

“पिठुर चांदणी रात राया, फुलांची केली शेज

मधुमास चालला सरुनी, येईना मजला नीज”

या अर्थाने चैत्र काहीसा छंदीफंदीच म्हणायला हवा. पण चैत्र जेवढा कामुक, तेवढाच सात्त्विकही आहे. म्हणून तर देवांच्या यात्रा-जत्रा सर्वाधिक याच महिन्यात असतात. विशेषतः लोकदेवतांच्या. कारण चैत्र म्हणजे लोकरहाटीतला काहीसा विसाव्याचा महिना. शेतीची कामं आटोपलेली असतात, नव्या कामांना सुरुवात करायला थोडा अवकाश असतो. अशाच वेळी गावोगावच्या यात्रा-जत्रांना रंग चढतो. भोसल्यांचं कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरच्या जत्रेला तर गुढीपाडव्यापासूनच सुरुवात होते. एकमेकांवर रुसलेल्या शिव-पार्वतीचं मनोमीलन शिखर-शंगणापूरलाच झाल्याचं म्हटलं जातं. म्हणून तर गावोगावच्या आयाबाया भक्तिभावाने म्हणतात-

“शिखर शिंगणापूर, दुरून दिसतं पारवं

गिरिजा नारीच्या न्हाणीवर, झाड बेलाचं हिरवं

देव सांब भोळा, तशी पारबती मायबाय

तिच्या हातच्या अन्नासाठी, देव सुकून जाय..”

म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होणारा चैत्रमास केवळ प्रेमभाव घेऊन येत नाही, तो भक्तिभावही घेऊन येतो. अर्थात शहरात चैत्रमास आणि वसंत ऋतू येतो कधी नि जातो कधी, काहीच कळत नाही. त्याच्या आगमनाचे-निर्गमनाचे सारेच दरवाजे आपण बंद करून टाकलेत. चैत्र मासारंभी पाडव्याला गुढी उभारली की चैत्र सुरू झाल्याचं तेवढं कळतं. पण चैत्राचं चैत्रपण, केवळ गुढी उभारण्यात नाही, ते रंगाने-गंधाने-चवीने न्हाऊन-माखून निघण्यात आहे.

लोकसाहित्याचे अभ्यासक - mukundkule@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in