आला सण मोठा, गुढी उभारू चला...

गुढीपाडवा. हिंदू नवं वर्षदिन. नवीन प्रकल्पांना, संकल्पांना सुरुवात करण्याचा दिवस. म्हणूनच सिने-नाट्य क्षेत्रात या दिवसाचे खास महत्त्व आहे. तसाच मालिकेच्या सेटवर सुद्धा गुढी पाडवा साजरा होतो. काही सेलिब्रेटींशी गुढीपाडव्याबद्दल गप्पा मारल्या आणि हा सण ते कसा साजरा करतात, नववर्षाच्या पहिल्या दिनी काही संकल्प वगैरे करतात का, हे जाणून घेतले. यातल्या काही निवडक प्रतिक्रिया.
आला सण मोठा, गुढी उभारू चला...
Published on

- विविधरंग

- संजय कुलकर्णी

गुढीपाडवा. हिंदू नवं वर्षदिन. नवीन प्रकल्पांना, संकल्पांना सुरुवात करण्याचा दिवस. म्हणूनच सिने-नाट्य क्षेत्रात या दिवसाचे खास महत्त्व आहे. अनेकदा यादिवशी नवं नाटक, चित्रपट आणि मालिकेचा मुहूर्त केला जातो. शिवाय घराघरात जसा गुढी उभारून पाडवा साजरा केला जातो तसाच मालिकेच्या सेटवर सुद्धा तो साजरा होतो. कारण सगळे सेलिब्रेटी डेली सोपच्या चित्रीकरणात इतके बिझी असतात, की त्यांना घरी सण साजरा करायला उसंतच मिळत नाही. साहजिकच सणही सेटवरच साजरे केले जातात. म्हणूनच काही सेलिब्रेटींशी गुढीपाडव्याबद्दल गप्पा मारल्या आणि हा सण ते कसा साजरा करतात, नववर्षाच्या पहिल्या दिनी काही संकल्प वगैरे करतात का, हे जाणून घेतले. त्यांच्या बोलण्यातून या दिवसाबद्दलचा उत्साह आणि आनंद दिसला. यातल्या काही निवडक प्रतिक्रिया.

तोरण, रांगोळी, गुढी आणि अमृत

मृण्मयी गोंधळेकर (लाखात एक आमचा दादा)

गुढीपाडव्याच्या दिवशी जर चित्रीकरण असेल तर सेटवरच गुढीपाडवा साजरा करायला नक्कीच आवडेल. कारण सेट हेच माझं दुसरं घर आहे. मी पुण्याची असल्यामुळे आम्ही गुढीपडावा पुण्यालाच घरी साजरा करतो. कुटुंबासोबत हा सण साजरा करायला मज्जा येते. आम्ही पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने आणि साधेपणाने पाडवा साजरा करतो. सकाळी उठून दाराला तोरण बांधतो, घराच्या अंगणात छानपैकी रांगोळी काढली जाते. देवाची पूजा करून नवीन पंचांगाची पूजाही केली जाते. गुढी उभारली जाते. कडुलिंब, मीठ, साखर याचं मिश्रण अमृत म्हणून त्याचा नैवेद्य देवाला दाखवून ते तीर्थ प्रत्येकाला प्यायला दिलं जातं. दुपारी गोडधोड जेवणाचा बेत असतो.

बाप्पाचं लाडकं व्हायचंय

विशाखा सुभेदार (महाराष्ट्राची हास्यजत्रा)

संकल्प असं काही नाही. थोडं स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, त्याकडेच जरा नीट पाहणार आहे. अनेक नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. ध्यान-जप करायचं आहे. मला ना, बाप्पाचं लाडकं व्हायचंय. पाहू या, कितपत जमतंय. गुढीपाडवाच नाही, तर सगळेच सण आम्ही सेटवरच साजरे करतो. त्यामुळे त्यात विशेष असं काहीच नाही.

नवीन नाटकाचे लेखन

डॉ. श्वेता पेंडसे (३८ व्हिला, परफेक्ट मर्डर)

मी दरवर्षी गुढीपाडव्याला नवा संकल्प करते. यावर्षी ठरवलंय, की जे वाचन अपूर्ण राहिलंय ते पूर्ण करायचं. मनात जे विषय घोळताहेत त्यांना फक्त एक विषय म्हणून मर्यादित न ठेवता त्याचे संहितेत रूपांतर करायचे आहे. यावर्षी या कामाकडे मी अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. वर्षभरात एक नवीन भाषा, मग ती भारतीय असेल किंवा परदेशी, शिकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे उत्तम आहार घेण्याला प्राधान्य देत नियमित व्यायाम करण्याकडेही विशेष लक्ष देणार आहे. नागपूरला आमचं स्वतःचं राम मंदिर आहे. गुढीपाडव्यापासून रामाच्या नवरात्राला सुरुवात होते. रामाच्या मंदिरात गुढीपाडव्यापासून भजन, कीर्तन आणि गीत रामायणाचे कार्यक्रम होतात. लहानपणापासून मी ते पाहिलेले आहेत. मुंबईत आम्ही आमच्या घरी गुढी उभारतो. त्यादिवशी देवदर्शनाला जातो. घरात गोडधोड करतो. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात त्या दिवशी करतो. मी नवीन नाटकाचं लेखन गुढीपाडव्याला आवर्जून सुरू करते. गेली सात वर्षे हा पायंडा मी पाडलेला आहे.

शोभायात्रा पाहायला आवडते

शाश्वती पिंपळकर (पिंगा ग पोरी पिंगा)

गुढीपाडव्याला मी पुण्याला माझ्या घरी जाते. घरी आम्ही गुढी उभारतो. सकाळी शोभायात्रा असते ती पाहण्यास जातो. तो माहोल पाहून मन उल्हासित होतं. घरी जेवणाचा बेत म्हणजे श्रीखंड-पुरीच. या दिवशी आम्ही आई-बाबांकडे जातो. आजी-आजोबांचा आणि आई-बाबांचा आशीर्वाद घेतो. या दिवसाचे वातावरण मस्तच असते. गेल्यावर्षी मी माझ्या तब्येतीकडे नीट लक्ष दिलं नाही. यावर्षी मात्र आरोग्याकडे नीट लक्ष देणार आहे. हाच माझा या नव्या वर्षाचा संकल्प असेल.

बत्ताशाच्या माळेचा गोडवा

रसिका वखारकर (अशोक मा. मा.)

मी मूळची अलिबागची आहे. तिथे आम्ही पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करतो. गुढी उभारतो. सकाळी लवकर उठून हार-तोरण बनवतो. गुढीला सजवतो. त्याला बत्ताशाची माळ घालतो. नंतर त्याची पूजा करतो. एक लहानपणीची आठवण आहे. सायंकाळी गुढी काढल्यानंतर त्या बत्ताश्याच्या माळेवर आम्ही सगळी लहान मंडळी अगदी तुटून पडायचो. गेल्या वर्षी काही संकल्प केला होता. तो अपूर्ण राहिला. यावर्षी मी तो संकल्प पूर्ण करणार आहे. यंदा ही संधी मला दवडायची नाही.

माणुसकी जपण्याचा संकल्प

प्रियांका तेंडोलकर (ठरलं तर मग, प्रिया)

गावाला गुढी उभारत असल्यामुळे घरी गुढी उभारत नाही. पण गोडाचे जेवण करून घरी देवाला नैवेद्य दाखवतो. यावर्षी गुढीपाडवा बहुधा सेटवरच साजरा करावा लागणार असं दिसतंय. सणाच्या दिवशी काम करणं मला फारच आवडतं. मी दरवर्षी एकच संकल्प करते. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी जपायची.

माहोल

रामायणाचा

विदिशा म्हसकर (पिंगा ग पोरी पिंगा)

मी महाडची आहे. गुढीपाडव्याला आम्ही सर्वजण भेटतो. आमच्या घरीच पाहुण्यांची वर्दळ असते. आम्ही घरी गुढी उभारतो आणि पूजा करतो. दुपारी गोड जेवणाचा बेत असतो. मला श्रीखंड आवडत असल्यामुळे आई श्रीखंड बनवते. आमच्या घरी गुढीपाडव्याच्या दिवशी अखंड दिवस सुधीर फडके यांचं गीत रामायण लावलेलं असतं. माहोल अगदी रामायणाने फुलून गेलेला असतो.

लेखक नाट्य समीक्षक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in