आजची दुर्गा : अडथळे ओलांडणारा साहित्यिक प्रवास; नैराश्याच्या काळोखातून उजेडाकडे केलेली वाटचाल

हाजराचे अनाथपण तिला वयाच्या पाचव्या वर्षी लखनौमधून काश्मीरमध्ये घेऊन आले. काश्मीरमधल्या बालगृहातून शिक्षण पूर्ण करत हाजराने युनिसेफची लिफ्ट फेलोशिप मिळवली आणि तिच्यासारख्या विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी काम सुरू केले.
आजची दुर्गा : अडथळे ओलांडणारा साहित्यिक प्रवास; नैराश्याच्या काळोखातून उजेडाकडे केलेली वाटचाल
Published on

आजची दुर्गा : हाजरा बानो

गायत्री पाठक-पटवर्धन/पुणे

हाजराचे अनाथपण तिला वयाच्या पाचव्या वर्षी लखनौमधून काश्मीरमध्ये घेऊन आले. काश्मीरमधल्या बालगृहातून शिक्षण पूर्ण करत हाजराने युनिसेफची लिफ्ट फेलोशिप मिळवली आणि तिच्यासारख्या विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी काम सुरू केले. आयुष्यात आलेल्या संकटांनी तिला नैराश्याच्या काळोखात लोटले. पण त्यावर मात करत, त्या काळातल्या अनुभवांचे शब्दांकन करत तिने लेख लिहिले. त्याचे पुस्तकही आता प्रकाशित झाले आहे. आता हाजराच्या डोळ्यांत स्वप्न आहे ते मोठी साहित्यिका व्हायचे.

हाजरा बानो ही काश्मीरची एक जिद्दी मुलगी. लखनौमधून काश्मीरमध्ये स्थलांतरित झालेली. हाजरा तिच्या कुटुंबातील दुसरी मुलगी असून तिला एक धाकटा भाऊ आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी तिच्या आयुष्यात शोककळा ओढवली. तिच्या वडिलांचे न्यूमोनियामुळे निधन झाले आणि कुटुंब गंभीर आर्थिक अडचणीत सापडले. यामुळे हाजराला तिच्या संगोपनासाठी काश्मीर येथील बालगृहात ठेवण्यात आले, तर तिचा धाकटा भाऊ मुलांच्या संस्थेत दाखल झाला. हाजरा आणि तिचा भावाला लखनौमधली गोजरी समाजाची ‘गोजरी’ भाषा येत होती. सुरुवातीला तिला काश्मीरी भाषा अजिबात येत नव्हती. त्यामुळे बालगृहात दाखल झाल्या झाल्या लहानग्या हाजरासमोर पहिला अडथळा आला तो भाषेचा. काही काळातच हाजराला कमी ऐकू येत आहे, हेही लक्षात आले. कुटुंबाची साथ सुटलेली होती आणि सगळ्या अडचणी समोर होत्या. पण लहानगी हाजरा न डगमगता हळूहळू काश्मिरी व हिंदी भाषा शिकू लागली. आज ती त्या दोन्ही भाषांमध्ये पारंगत झाली आहे. शालेय शिक्षण संपल्यावर हाजराने नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले. हा प्रवासही अनेक कठीण प्रसंगांनी भरलेला होता. याच दरम्यान तिला नैराश्याचे, चिंतेचे (Depression and Anxiety) झटके येऊ लागले. उपचारांच्या दरम्यान तिला स्किझोफ्रेनिया असल्याचे निदान झाले. मायेने समजून घेणारे जवळचे असे कोणीच नव्हते. सगळा कुटुंबाशिवायचा एकाकी प्रवास होता. पण मानसोपचार व औषधोपचारांच्या मदतीने हाजराने आपल्या आजाराशी लढा दिला. या काळात तिला तिच्या मित्र-मैत्रिणींचे व कॉलेजातील शिक्षकांचे पाठबळ लाभले. तिच्या चिकाटीने व निर्धाराने तिने अखेर नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले.

याच दरम्यान हाजरा ‘उदयन केअर’ या संस्थेसोबत काम करु लागली. तिची युनिसेफ अंतर्गत लिफ्ट फेलोशिपसाठी निवड झाली. ही फेलोशिप अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्या व विशेष गरज असलेल्या तरुणांसाठी काम करण्याकरिता आहे. हाजराला स्वत:ला नीट ऐकू येत नाही. तिला मानसिक आजाराचा त्रासही आहे. स्वत: एक विशेष गरजा असलेली मुलगी असल्याने अशा विशेष गरजा असलेल्या मुलांमुलींसाठी काम करणे, तिलाही आवश्यक वाटत होते. तिने या व्यासपीठाचा उपयोग करून अनाथ असलेल्या, शिवाय काहीतरी शारीरिक मर्यादा असलेल्या, अशा दोन्हीही समस्या भेडसावणाऱ्या मुलामुलींच्या प्रश्नांवर आपल्या या शिष्यवृत्तीसाठी केलेल्या अभ्यासात प्रकाश टाकला. शिवाय स्वतंत्रपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ब्लॉगमध्ये या प्रश्नांच्या संदर्भात प्रभावीपणे मते मांडली. संकटे आहेतच, पण त्यांना ओलांडून पुढे जायला हवे, हेच हाजरा आपल्या उदाहरणातून सांगत आहे.

जर्नी फ्रॉम डार्कनेस टू लाईट

आपण ज्या समस्यांवर लिहितोय त्याची समाजाला जाणीवही नाही, हे ओळखून हाजराने आपले लेख एकत्र करून एक पुस्तक प्रकाशित केले. विशेष म्हणजे, हाजरा नैराश्याच्या झळा सोसत असतानाच्याच काळात तिचे ‘जर्नी फ्रॉम डार्कनेस टू लाईट’ (Journey from Darkness to Light) हे पहिले पुस्तक एप्रिल २०२२ मध्ये प्रकाशित झाले. हाजराला मोठी लेखिका व्हायचे आहे. स्वत:च्या अनुभवांवर आधारित ‘हू ॲम आय? ब्रेकिंग बॅरिअर्स’ हे पुस्तकही तिने लिहिले आहे. ती सध्या सातत्याने वेगवेगळ्या माध्यमांमध्ये विशेष गरजा असलेल्या अनाथ मुलांच्या प्रश्नांवर व त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन करते. तिच्या अनेक कविताही काश्मीरमधल्या विविध मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in