भावनिक जखम - अशी ही गुंतागुंत

बालपणात घडलेल्या अनेक घटना व्यक्तीच्या मनावर जखम करत असतात. या अशा भावनिक जखमांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्या आयुष्यभर आपले व्यक्तिमत्त्व कुरतडत राहतात. यातून व्यक्ती कधी संशयी बनते, तर कधी कठोर. या गुंत्यातून बाहेर पडत बरे होण्याचे बळही प्रत्येकात असते.
भावनिक जखम - अशी ही गुंतागुंत
नवशक्ति अक्षररंग
Published on

- हितगुज

- डॉ. शुभांगी पारकर

बालपणात घडलेल्या अनेक घटना व्यक्तीच्या मनावर जखम करत असतात. या अशा भावनिक जखमांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्या आयुष्यभर आपले व्यक्तिमत्त्व कुरतडत राहतात. यातून व्यक्ती कधी संशयी बनते, तर कधी कठोर. या गुंत्यातून बाहेर पडत बरे होण्याचे बळही प्रत्येकात असते.

एखादी व्यक्ती जगाकडे कसे पाहते, परिस्थितीचे आकलन कसे करते आणि वास्तवाची व्याख्या कशी करते, हे सर्व मुख्यतः त्याच्या/तिच्या बालपणात घडलेल्या गोष्टींवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीच्या विचारसरणीवर कौटुंबिक वातावरण, सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी, जीवनातील अनुभव आणि स्वभाव यांचा मोठा प्रभाव असतो. अनेकदा त्या व्यक्तीला याची जाणीवही नसते, पण बालपणीचे अनुभव प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम करतात आणि त्या व्यक्तीची वैचारिक जडणघडण घडवतात.

व्यक्तीच्या मनातील भावनिक जखमा या लहानपणीच तयार होतात. अगदी प्रेमळ असलेल्या आणि आपुलकीने जपणाऱ्या घरातही अशा जखमा निर्माण होऊ शकतात. जेव्हा आपण वेदना, भीती, एकटेपणा, राग, दु:ख यासारख्या तीव्र भावना अनुभवतो आणि त्या योग्य पद्धतीने हाताळू शकत नाही, तेव्हा त्या आपल्या मनात खोलवर रुजतात. अशा दुखऱ्या भावना व्यक्त न झाल्यास त्यांचे भावनिक जखमांमध्ये रूपांतर होते आणि त्याचा प्रभाव आपल्या वर्तणुकीवर, विचारसरणीवर आणि नातेसंबंधांवर उमटतो. जखमी होण्यापासून कोणीही वाचत नाही.

काही जखमा शारीरिक किंवा मानसिक अत्याचार, प्रियजनांचा मृत्यू किंवा इतर दु:खद घटनांमुळे होतात, तर काही जखमा बालसुलभ समजुतीतील अपूर्णतेतून, विशेषतः जेव्हा आपण परिस्थितीचे योग्य आकलन करू शकत नाही तेव्हा निर्माण होतात. आपण सर्वजण जखमी आहोत, मग ते शारीरिक रूपात असो, वा भावनिक, मानसिक किंवा आध्यात्मिक रूपात असो. प्रत्येक व्यक्तीच्या आत खोलवर एक जखम असते. ही जखम आपले ऐकले जावे, आपल्यावर कोणी प्रेम करावे आणि स्वीकारावे अशी इच्छा बाळगत असते. ती जखम, मनाच्या गाभ्यातून आक्रंदन करत असते. ती ओरडून सांगत असते, “मी अपूर्ण आहे, घायाळ आहे, मी जगायला पात्र नाही.”

मानसिक जखमा बाहेर पडायला वेगवेगळे मार्ग शोधतात. राग, द्वेषपूर्ण शब्द आणि कृती, अति आत्मविश्वास, थेट निर्णय जाहीर करणारी मते तसेच कृती करण्याचे इतर मार्ग यातून मानसिक, भावनिक जखमा व्यक्त होतात. आपल्याला भेटणारा प्रत्येकजण त्या व्यक्त आणि अव्यक्त जखमेतून बरा होत असतो किंवा बरा होण्याची आशा करत असतो. कधी कधी या प्रक्रियेची आपल्याला जाणीव असेल वा नसेल, पण एकदा का आपल्याला समजले की आपण आजवर वाहून नेलेल्या जखमा इतर अनेकांच्या जखमांसारख्याच आहेत, तेव्हा आपल्या मनात आपसूक सर्वांबद्दल खोल करुणा दाटून येईल. जसजशी आपली आंतरिक वाढ होते, तसतशा या जखमा बऱ्या तरी होतात किंवा अधिक चिघळत जातात वा खोलवर रुतत जातात. अशावेळी त्यांच्यापासून वाचण्यासाठी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे, टाळाटाळ करण्याचे अनेक मार्ग स्वीकारतो. मात्र, हीच टाळाटाळ आपली जखम अधिक हळवी करते. यातून भावनिक सुन्नता निर्माण होते आणि बरे होण्याचे मार्ग अधिक दूर जातात.

वेदना हा सर्वसामान्य अनुभव आहे. प्रत्येकाच्या मनात काही नव्याने झालेल्या जखमा असतात, तर काही वेदना इतक्या जुनाट असतात, की आपण त्या विसरूनही जातो. या वेदना मन:स्ताप, अपयश, अस्वीकृती, दुर्लक्षित प्रेम किंवा आतून पोखरणाऱ्या, व्यक्त न करता आलेल्या गोष्टींमुळे झालेल्या असतात. पण आपण या वेदनांना झाकून, चेहऱ्यावर हास्य ठेवून पुढे जात राहतो. लहानपणापासून आपल्याला सांगितले जाते की, कमकुवतपणा लपवावा, दु:ख दडवावे आणि आपण तुटलेलो असलो तरीही परिपूर्ण असल्याचे भासवावे. पण जर आपण हे सर्व भावनिक त्रास लपवायचे थांबवले तर? जर आपण आपल्या जखमांकडे दुर्बलतेच्या दृष्टिकोनातून न पाहता आपल्यातील सहनशक्तीचे प्रतीक म्हणून त्यांचा स्वीकार केला तर?

त्यागाची जखम

बालपणापासून आपली भावनिक गरज पुरेशी पूर्ण झाली नसेल, एकटेपणाची किंवा दुर्लक्षित राहिल्याची भावना निर्माण झाली असेल, तर ही जखम उघडते. असे लोक पुढे जाऊन इतरांकडून अधिक प्रेमाची अपेक्षा ठेवतात किंवा भावनिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून राहतात. तसेच कधी नात्यांमध्ये अंतर ठेवून किंवा कुठेही गुंतवून न घेता स्वतःला भावनिक इजा/दुखापत होण्यापासून वाचवतात.

अस्वीकृतीची जखम

बालपणी जर आपले विचार, भावना किंवा अस्तित्व स्वीकारले गेलेले नसेल, तर ही जखम तयार होते. अशा लोकांना सतत इतरांकडून मान्यता हवी असते आणि त्यांना नकार सहन करणे खूप अवघड जाते.

अपमानाची जखम

जर बालपणी एखाद्याला वारंवार टीका सहन करावी लागली, कमी लेखले गेले किंवा अविश्वास दाखवला गेला, तर ही जखम तयार होते. अशा लोकांचा आत्मविश्वास कमी असतो आणि ते स्वतःच्या प्रतिमेबद्दल संवेदनशील असतात.

विश्वासघाताची जखम

बालपणी जर पालकांनी किंवा जवळच्या लोकांनी दिलेले आश्वासन पाळले नसेल, विश्वासाला तडा जाईल असे वर्तन केले असेल, तर ही जखम तयार होते. त्यामुळे असे लोक पुढे जाऊन इतरांवर सहज विश्वास ठेवू शकत नाहीत आणि स्वत:वरील, इतरांवरील नियंत्रण गमावण्याची भीती वाटल्यामुळे ते अति-नियंत्रक बनतात.

अन्यायाची जखम

जर लहानपणी एखाद्यावर खूप कठोर शिस्त लादली गेली असेल आणि त्याच्या-तिच्या मतांचा विचाराच केला गेला नसेल, तर ही जखम तयार होते. अशा लोकांची विचारसरणी ही अतिशय कठोर असते. ते सतत परिपूर्णतेचा आग्रह धरतात. त्यांना इतरांचे दृष्टिकोन स्वीकारायला कठीण जाते.

भावनिक जखमा ओळखणे

भावनिक जखमा ओळखणे कठीण असते. कारण त्या उघड दिसत नाहीत, तर स्वभाववैशिष्ट्यातून किंवा विशिष्ट वर्तनातून दिसतात. मात्र या अशा जखमा असण्याचे काही ठळक संकेत दिसू शकतात.

लहानशा अपयशावर तीव्र प्रतिक्रिया देणे.

इतरांवर विश्वास ठेवण्यात अडचण येणे.

कायमस्वरूपी अपराधीपणाची किंवा अपूर्णतेची भावना मनात ठाण मारून बसणे.

जवळीक किंवा दीर्घ नातेसंबंधांची भीती वाटणे.

सतत चिंता किंवा नैराश्याने ग्रस्त असणे.

परिपूर्णतेची (परफेक्शनिझम) गरज भासणे, अपयशाची भीती वाटणे.

स्वतःच्या सीमा निश्चित करण्यात किंवा त्यांचे पालन करण्यात अडचण येणे.

या जखमा आपल्या दैनंदिन आयुष्यात व नातेसंबंधांत प्रकर्षाने जाणवतात. काही लोक कोणी जवळ येऊ नये म्हणून त्यांना दूर लोटतात किंवा कधी सतत इतरांकडून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्ती आपल्या गरजांपेक्षा इतरांच्या गरजांना अधिक प्राधान्य देतात. स्वतःच्या भावनिक जखमा ओळखण्यासाठी आत्मपरीक्षण (सेल्फ-रिफ्लेक्शन) करणे महत्त्वाचे ठरते. वेगवेगळ्या प्रसंगावरच्या आपल्या भावनिक प्रतिक्रिया लक्षात घ्या वा लिहून ठेवा. कोणत्या परिस्थितीत आपण सर्वाधिक अस्वस्थ होतो? कोणते प्रसंग आपल्याला जास्त दुखावतात किंवा असुरक्षित वाटायला लावतात? हे लक्षात घ्या. कारण हे सारे संकेत मनाच्या अंतर्गत जखमांकडे लक्ष वेधतात.

या जखमांचे अस्तित्व स्वीकारणे हे त्यांच्या उपचाराच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते. एखाद्या अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्यास जसे ती खोली स्पष्टपणे दिसते, तसेच आपल्या भावनिक जखमांचे अस्तित्व स्वीकारले की आपण त्याचा सामना करू शकतो. हे थोडे त्रासदायक वाटले, तरीही ते तुम्हाला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम बनवते.

भावनिक जखमांचा आपल्या दैनंदिन आयुष्यावरील प्रभाव

भावनिक जखमा केवळ आपल्या अंतर्मनावर परिणाम करत नाहीत, तर त्या आपल्या संपूर्ण जीवनावर खोल परिणाम करतात. त्या आपल्या निवडींवर, वर्तनावर आणि नातेसंबंधांवर प्रभाव टाकतात. मानसिक आरोग्य आणि एकूणच जीवनमान यावर या जखमा मोठा परिणाम करू शकतात. सतत चिंता, नैराश्य किंवा जीवनाबद्दल असंतोष वाटणे यामागे अनेकदा अशा दडपलेल्या भावनिक वेदना असतात. नकारात्मक विचारसरणी सतत मनात घर करून राहते. जसे की आपण आनंदास पात्र नाही किंवा आपल्याबाबत नेहमीच वाईट काहीतरी घडेल, आपल्या हाताला यशच नाही, अशा भावना निर्माण होतात.

व्यक्तिगत नातेसंबंधांवरही या जखमा खोल परिणाम करतात. पूर्वीच्या कटू अनुभवांमुळे अनेकांना इतरांशी मनमोकळेपणाने बोलणे कठीण जाते. त्यामुळे नवे संबंध टिकवणे अवघड होते. आपल्याच मनातील भीती आपल्याला इतरांपासून दूर ठेवते. काहीजण नकळत असे नकारात्मक नातेसंबंध शोधतात, जे त्यांच्या जुन्या जखमांना अधिक गडद करतात. व्यावसायिक क्षेत्रातही भावनिक जखमा आपल्याला मागे खेचू शकतात. पूर्वीच्या नकारात्मक अनुभवांमुळे अपयशाची भीती मनात घर करून बसते. त्यामुळे जोखमीचे निर्णय घेण्यास आणि नवीन संधी स्वीकारण्यास आपण कचरतो किंवा दुसऱ्या बाजूने इतरांकडून मिळणाऱ्या स्वीकृतीसाठी सतत झटत राहणे, स्वतःला जास्त कामाच्या ओझ्याखाली दडपून टाकणे आणि परिणामी मानसिक थकवा जाणवणे, हे प्रकारही होऊ शकतात.

दीर्घकाळ अशा जखमा दुर्लक्षित केल्यास त्याचा आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयांवर परिणाम होतो. करिअर, नाती आणि वैयक्तिक वाढ यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे या जखमांना ओळखून त्यावर उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. ते जितक्या लवकर केले जाईल, तितके चांगले!

तुटलेले असूनही, आपण केवळ आपल्या वेदनेचे बळी ठरत नाही. कारण आपल्यात बरे होण्याची ताकद आहे. एक दयाळू शब्द, ऐकणारा कान, समजून घेण्याची एक साधी सवय हे असे औषध आहे जे आपण सगळे आपल्या आत बाळगत असतो. आपल्याला ते नेहमीच कळते असे नाही, परंतु ज्या प्रकारे आपण दुःखी मित्राचे, मैत्रिणीचे सांत्वन करतो, ज्या प्रकारे आपण कोणताही न्यायनिवडा न करता, चूक-बरोबर न ठरवता त्यांना आधार देतो, त्यातून आपण एकमेकांना बरे करण्यास मदत करत असतो.

जरी आपल्याला भावनिक जखमा झालेल्या असल्या तरी आपण प्रेम करण्यास, तुटलेल्या गोष्टी पुन्हा निर्माण करण्यास सक्षम आहोत हे ओळखणे महत्त्वाचे आहे.

मनोचिकित्सक व अधिव्याख्याता

logo
marathi.freepressjournal.in