कडकडीत उन्हात जर डोळ्यासमोर लिंबू पाणी दिसलं तर ते पिण्याचा मोह आवरता येत नाही. हे लिंबू पाणी शरीराला गारवा देत. लिंबू पाणी फक्त उन्हाळ्यातच नाही तर इतरही दिवसांमध्ये प्यायल्यास आरोग्यासाठी उत्तम फायदे देते. आज आपण लिंबू पाणी प्यायल्याने काय फायदे होतात हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
1. रोग प्रतिकारशक्ती वाढते
लिंबु हे व्हिटॅमिन-सी समृद्ध फळ असल्यामुळे याचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे लिंबाच्या रसाचे मधासह सेवन केलात तर आजारपण कमी येईल हे तुमच्या निदर्शनास येईल. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर रहायचे असेल तर आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचे सेवन करा.
2. ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात
उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त असाल तर फक्त लिंबू आणि पाण्याचे सेवन करा. याशिवाय लेमन टी पिणे देखील फायदेशीर राहील. कारण लिंबू पोटॅशियम समृद्ध आहे. यामुळे लिंबाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाबची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते.
3. पचन प्रणालीत सुधार
लिंबाचा रस पचन प्रणाली बळकट करतो. यामुळे १ ग्लासभर लिंबाचे सरबत प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि पोट संबंधित अनेक आजार दूर होतात. ज्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते.
4. रक्त शुद्धीकरण
लिंबामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट शरीरातील रक्त शुद्धी करण्याचे कार्य करत असतात. यामुळे जेवणानंतर १ ग्लास वा १ वाटी लिंबू पाणी प्यायल्यास फायदा होतो.
5. वजन कमी होते
सकाळी उपाशी पोटी लिंबू सरबत प्यायल्याने वजन नियंत्रित राहते. यासाठी सकाळी लिंबाचे ६ ते ७ थेंब कोमट पाण्यातून घ्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. परिणामी शरीर निरोगी राहते.
6. ताप होईल दूर
व्हायरल इन्फेक्शनमूळे ताप आल्यास लिंबू आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. कारण लिंबातील व्हिटॅमिन सी हे जीवाणू नष्ट करण्यात मदत करते आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते. ज्यामुळे ताप अथवा किरकोळ संसर्ग होणारे आजार टाळता येतात.
7. त्वचेच्या समस्यांपासून सुटका
लिंबाच्या रसातील नैसर्गिक अँटी सेप्टिक गुणधर्म त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करते. सनबर्नची वेदना असो वा मधमाशीच्या डंकांपासून होणारी जळजळ अशा प्रत्येक समस्येपासून लिंबू आराम देतो. तसेच लिंबातील अँटी एजिंग गुणधर्म चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि ब्लॅकहेड्स दूर करतात.
आरोग्यदायी फायद्यांसाठी लिंबू पाणी कधी आणि कसे प्यावे ?
लिंबू पाणी बनविताना साखर मिठाचा अतिवापर करू नये. शक्यतो विना मीठ विना साखर हे पेय प्यावे आणि लिंबू पाण्यासाठी वापरले जाणारे पाणी अति थंड किंवा अति गरम असू नये. तज्ञ सांगतात कि, आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता दिवसातून दोनदा लिंबू पाणी पिऊ शकता. हे आरोग्यासाठी अधिक लाभदायक आहे. त्यामुळे एकवेळ सकाळी आणि एकवेळ दुपारी या पेयाचे सेवन करावे.
सकाळी – नियमित सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्या. यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय पचन प्रणाली सुधारण्याते.
दुपारी – विशेष करून उन्हाळ्यामध्ये शरीरात उर्जा प्रस्थापित होण्यासाठी दुपारी लिंबू पाणी प्या. यामुळे तहान भागेल आणि ताजेतवाने वाटेल.
Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.