
मीठाशिवाय जेवण जात नाही. आपल्याला अळणी जेवण करण्याची सवय नाही. मीठाशिवाय जेवण रूचकर लागत नाही. मीठ जेवणात असणे खूप आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे शरीरात चक्कर येणे, रक्तदाब कमी होण्यासारखे प्रकार होतात. मात्र, आपली जीवनशैली आणि चुकीच्या आहारपद्धती यामुळे आपण नकळतपणे आहारात मोठ्या प्रमाणात मीठाचे सेवन करत असतो. मात्र, याचे मूत्रपिंडासह, हृदय, पोट आणि अन अवयवांवर गंभीर परिणाम होतात. तसेच रक्तदाबावरही परिणाम होतो. जाणून घ्या आहारात मीठ किती असावे?
आहारात मीठ किती असावे?
WHO च्या मते एका प्रौढ व्यक्तीने २००० मिलीग्रॅम अर्थात पाच ग्रॅमपेक्षा कमी इतकेच मीठ खावे. सामान्यपणे एक चमचा मीठ व्यक्तीने दररोज खावे. तर २ ते १५ वर्षा पर्यंतच्या मुलांनी त्यांच्या ऊर्जेच्या आवश्यकतेप्रमाणे मीठ खावे.
मीठाचे प्रमाण कसे वाढते?
आताच्या जीवनशैलीत आपण अनेक वेळा बाहेरचे जेवण जेवतो. यामध्ये फास्टफुड आणि जंक फुडचे प्रमाण खूप जास्त असते. अनेक वेळा स्नॅक्समध्ये हलका फुलका पदार्थ म्हणून आपण खारे शेंगदाणे, चिप्स इत्यादी मोठ्या प्रमाणात खातो. यामध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपल्या नकळत पणे आपल्या शरीरात मीठाचे प्रमाण जास्त होते. याशिवाय आहारात भाज्यांमध्ये मीठ टाकलेले असताना पुन्हा चव म्हणून वरून आणखी मीठ घेतले जाते. हे शरीराला खूप हानिकारक असते.
मीठाचे प्रमाण वाढल्याने कोणकोणते दुष्परिणाम होतात?
मुत्रपिंडाचे विकार
आहारात मीठाचे प्रमाण जास्त झाले तर मुत्रपिंडाचे वेगवेगळे विकार होऊ शकतात. काही परिस्थिती मुत्रपिंड निकामी होण्याची वेळ देखील येते.
उच्च रक्तदाब
मीठाचा आणि रक्तदाबाचा थेट संबंध आहे. मीठाच्या अतिरिक्त सेवनामुळे रक्तातील सोडियमचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तदाब वाढतो.
हृदयाचे विकार
रक्तदाब वाढल्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मीठाच्या अति प्रमाणामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, अशा परिस्थितीत हृदयविकाराचा धोका संभवतो.
याशिवाय डोकेदुखी, डिहायड्रेशन, लठ्ठपणा इत्यादी त्रास देखील होऊ शकतात. त्यामुळे आहारात मीठाचे प्रमाण नियंत्रित पातळीत असावे जेणेकरून भविष्यातील त्रास टाळता येतात. त्यासाठी शक्य तितके जंक फूड खाणे टाळा. जसे की चिप्स, खारे शेंगदाणे इत्यादी.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)