
निरोगी आयुष्य जगण्यासाठी यकृताचे आरोग्य टिकवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. यकृत जर चांगल्या स्थितीत नसेल तर तुमच्या एकूण स्वास्थ्यावर खूप वाईट परिणाम होतात. यकृताच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १९ एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन (जागतिक यकृत दिन २०२५- World Liver Day 2025 ) साजरा केला जातो. या दिवशी लोकांना यकृताच्या आरोग्याबद्दल आणि त्याच्याशी संबंधित आजारांबद्दल जागरूक केले जाते. यकृत निरोगी राहण्यासाठी आपल्याला कोणते अन्नपदार्थ खायला हवे आणि कोणत्या अन्नपदार्थ टाळायला हवे याविषयी जाणून घेणे फायदेशीर राहते.
यकृतासाठी काय हानिकारक आहे ?
यकृताचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर तुम्हाला खालील अन्नपदार्थ टाळावे लागतील.
मिठाचा अतिप्रमाणात वापर
मीठ हे शरिरासाठी आवश्यक आहे. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास यकृताच्या आरोग्यासाठी ते खूप हानिकारक असते. जास्त मीठ खाल्ल्याने यकृतामध्ये पाणी साचू शकते, ज्यामुळे सूज येते.
अल्कोहोल
अल्कोहोल हे तसे तर एकूणच आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. मात्र, याचा सगळ्यात जास्त परिणाम यकृतावर होतो. यामुळे लिव्हर सिरोसिर आणि फॅटी लिव्हर हे आजार होऊ शकतात.
प्रक्रिया केलेले अन्न
यामध्ये पॅकिंगचे अन्न, फास्ट फूड, तळलेले स्नॅक्स यांचा समावेश होतो. यामध्ये ट्रान्स फॅट असते. जे यकृताला हानी पोहोचवातात.
सॉफ्ट ड्रिंक्स
सॉफ्ट ड्रिंक्स किंवा साखरयुक्त पेये जसे कोल्ड्रिंक्स आणि पॅक केलेले ज्यूस हे हानिकारक असतात. यामध्ये फ्रुक्टोज कॉर्न सिरपचे प्रमाण जास्त असते.
यकृताच्या आरोग्यासाठी कोणते अन्न चांगले असते?
कच्चे लसूण
कच्चे लसूण हे यकृताच्या आरोग्यासाठी उत्तम असते. लसणात सेलेनियम आणि अॅलिसिन सारखे घटक आढळतात, जे यकृताला डिटॉक्सिफाय करण्यास आणि संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज किमान दोन पाकळ्या कच्च्या लसणाचे सेवन करणे यकृता निरोगी राहण्यासाठी फायदेशीर ठरते.
हळद
आयुर्वेद सांगते हळद हे सर्वोत्तम औषधी आहे. केवळ यकृतच नव्हे तर एकूणच आरोग्यासाठी हळदीचा आहारात समावेश असणे फायदेशीर ठरते. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे सक्रिय संयुग असते, जे यकृताची जळजळ कमी करते आणि त्याच्या दुरुस्तीस मदत करते.
क्रूसिफेरस भाज्या
कोबी, फुलकोबी, ब्रोकोली यासारख्या अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरपूर असणाऱ्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. हे युकृताला विषमुक्त ठेवतात तसेच यकृताची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करतात.
लिंबू आणि संत्री
व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले लिंबू आणि संत्रं यकृताला विषमुक्त करण्यास मदत करतात. सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने यकृत निरोगी राहते.
सफरचंद आणि अॅव्होकाडो
सफरचंदांमध्ये पेक्टिन फायबर असते, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. अॅव्होकाडो ग्लूटाथिओन अँटीऑक्सिडंट असते, जे यकृताचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेले अन्न
ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेले अन्न यकृतासाठी चांगले असते. यकृतामध्ये साठलेली चरबी कमी करतात आणि ते निरोगी ठेवतात. अक्रोड, जवस, चिया बियाणे आणि फॅटी मासे (जसे की सॅल्मन आणि मॅकरेल) मध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)