सकाळची गडबड, ऑफिसची धावपळ आणि नाश्त्यासाठी मिळणारा कमी वेळ… अशा वेळी काहीतरी झटपट, हेल्दी आणि चविष्ट पदार्थ मिळणं म्हणजेच मोठा दिलासा! म्हणूनच फक्त १०-१५ मिनिटांत तयार होणारा हा व्हेज सँडविच एकदम बेस्ट पर्याय ठरतो. साध्या भाज्या, मेयो आणि ब्रेड वापरून झटपट तयार होणारा हा सँडविच प्रोटीन, व्हिटॅमिन आणि फायबरने समृद्ध आहे. तुम्हाला दिवसाची सुरुवात चवदार आणि पौष्टिक करायची असेल, तर हा व्हेज सँडविच नक्की ट्राय करा. जाणून घ्या सोपी रेसिपी.
साहित्य :
८ ब्रेड स्लाइस
१/२ कप बारीक चिरलेली काकडी
१/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१/२ कप बारीक चिरलेली ढोबळी मिरची
१/४ कप किसलेले गाजर आणि बारीक चिरलेली कोबी
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
४ मोठे चमचे मेयोनीज आणि हिरवी चटणी
चवीनुसार मीठ
१/४ छोटा चमचा काळी मिरी पावडर
१/२ छोटा चमचा चाट मसाला
२–३ मोठे चमचे बटर (ब्रेडवर लावण्यासाठी)
कृती :
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात काकडी, टोमॅटो, ढोबळी मिरची, गाजर, कोबी आणि कांदा घाला. त्यात मेयोनीज आणि हिरवी चटणी मिसळा. आता यामध्ये मीठ, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला घालून मिश्रण चांगले मिक्स करुन घ्या. यानंतर, ब्रेडचे दोन स्लाइस घ्या. सँडविच टोस्ट करायचे असल्यास बाहेरील बाजूला बटर लावा. तयार झालेलं भाज्यांचं मिश्रण एका स्लाइसवर समान पसरवा आणि दुसरा स्लाइस ठेवून सँडविच बंद करा.सँडविच ग्रिलर किंवा टोस्टरमध्ये ब्रेड ठेवा आणि ते दोन्ही बाजूंनी कुरकुरीत, सोनेरी होईपर्यंत ग्रिल करा. तयार झालेले गरमागरम सँडविच टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही डिश नक्की ट्राय करा.
टीप : भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास त्यांना पाणी सुटत नाही.