
केस गळणे, केसात कोंडा होणे, केस पांढरे होणे या समस्यांनी तुम्ही त्रस्त आहात का? केसांना वेगवेगळ्या प्रकारचे कलर केल्याने केस रूक्ष झाले आहेत? केसांना सातत्याने फाटे फुटत आहेत का? या समस्यांवर तुम्ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने केसांच्या सर्व समस्यांसाठी आयुर्वेदिक तेल बनवू शकता. ज्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. त्यासाठी खालील साहित्य लागेल.
250 मिली नारळ तेल
150 मिली एरंडेल तेल
मूठभर कढीपत्ता
एक मोठा चमचा मेथी दाणे
एक मोठा चमचा कलोंजीच्या बिया
एक छोटी वाटी कापलेला कांदा
खोबरेल तेल - कोणतेही आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी खोबरेल तेल हाच बेस असतो.
एरंडेल - एरंडेल तेल हे केसांच्या वाढीसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.
मेथी दाणे - केसात कोंडा झाल्यास केस गळण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे केसांमध्ये कोंडा झाल्यास त्यावर मेथी दाणे हे प्रभावी उपाय ठरतात.
कलोंजी बिया - कलोंजीच्या बिया या दिसायला काळ्या असतात. याचा वापर बंगाली खानपानाच्या पदार्थांमध्ये अधिक आढळतो. काही जण त्याला मराठीत काळे तिळ बिया किंवा कांद्याच्या बिया असा एक गैरसमज आहे. त्यामुळे मार्केटमधून या बिया आणताना कलोंजीच्या बिया असेच म्हणावे. या बिया केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहेत असे मानले जाते.
मूठभर कढीपत्ता - कढीपत्ता हे केस गळतीवर अतिशय प्रभावी आहे. नैसर्गिक शाम्पू बनवताना देखील त्याचा उपयोग होतो. कढीपत्त्यात A,B,C, आणि E अशी चार जीवनसत्वे असतात. त्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि मॅग्नेशियम यासारख्या खनिजांनी कढीपत्ता समृद्ध आहे.
कांदा - कांद्यामुळे केसांची वाढ होते. अनेक वेळा कांद्याचा रस केसांमध्ये लावून केस धुतले जातात.
कृती
सर्वप्रथम मेथी दाणे भाजून घ्या. नंतर कलोंजीच्या बिया भाजून घ्या. दोन्ही एकत्रित करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता पॅनमध्ये पहिले खोबरेल तेल गरम करून घ्या. तेल गरम होत आले की त्यात एरंडेल तेल घाला. दोन्ही तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक केलेले मेथी दाणे आणि कलोंजीची पावडर टाका. हे मिश्रण उकळू द्या. त्यानंतर त्यात कढीपत्ता टाका. कढीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेला असावा. लक्षात घ्या कढीपत्त्यावर कोणतेही ठिपके पडलेले नसावे. कढीपत्त्याची हिरवीगार पाने असावी. ही पाने तेलात टाकून मिश्रण उकळू द्या. सर्वात शेवटी चिरलेला कांदा टाकून मिश्रण उकळू द्या. हे उकळलेले तेल गार झाल्यानंतर बारीक गाळणीने गाळून बोटलमध्ये भरून ठेवा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला मालिश केल्याने केसांना निश्चितच फायदा होईल.