होळीला मनसोक्त रंग खेळायचाय पण केसांच्या आरोग्याची चिंता वाटते? अशी घ्या काळजी

केसांच्या आरोग्याच्या चिंतेमुळे तुम्ही होळीला रंग खेळणे टाळणार असाल तर तुम्हाला हे वाचायलाच हवे. योग्य ती काळजी घेतली तर रंग खेळल्यानंतरही केसांचे आरोग्य जपता येते. जाणून घ्या कशी घ्यावी काळजी.
होळीला मनसोक्त रंग खेळायचाय पण केसांच्या आरोग्याची चिंता वाटते? अशी घ्या काळजी
प्रातिनिधिक छायाचित्र - Freepik
Published on

लाल, हिरवा, पिवळा, निळा, जांभळा विविध रंग घेऊन होळीचा सण आला आहे. होळीत मनसोक्त रंग खेळायला अनेकांना आवडते मात्र त्वचा आणि विशेष करून केसांच्या आरोग्याची चिंता वाटते? या चिंतेमुळे तुम्ही होळीला रंग खेळणे टाळणार असाल तर तुम्हाला हे वाचायलाच हवे. योग्य ती काळजी घेतली तर रंग खेळल्यानंतरही केसांचे आरोग्य जपता येते. जाणून घ्या कशी घ्यावी काळजी.

रंग खेळण्यापूर्वी केस कोरडे ठेवा

रंग खेळण्यापूर्वी तुमचे केस कोरडे असायला हवे. कोरड्या केसांमध्ये लागलेला रंग केस धुतल्यानंतर चटकन बाहेर पडतो.

रंग खेळताना केस मोकळे सोडू नये

रंग खेळताना केस मोकळे सोडू नये. केस मोकळे सोडल्यास रंग केसांच्या मुळापर्यंत जातो. केसांची मुळे हा केसांच्या आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. रंगामुळे केसांच्या मुळांना इजा पोहोचल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे होळी खेळताना केसांची घट्ट वेणी घाला किंवा आंबाडा बांधून ठेवा.

रंग खेळण्यापूर्वी तेल लावावे की लावू नये

अनेक जण रंग खेळण्यापूर्वी तेल लावण्यासाठी सुचवतात. मात्र, रंग खेळताना काही रंग हार्ड असतात. तर काही रंग सॉफ्ट असतात. तसेच कोण केव्हा कसे रंग लावेल हे सांगता येत नाही. सिंथेटिक रंग ते ही पाण्यात कालवलेले रंग जर वापरले गेले तर त्यांचा संपर्क केसांसोबत आल्यानंतर केसातील तेलामुळे ते अधिक पक्के होतात. परिणामी केस धुताना केसांमधील रंग लवकर निघत नाही. मात्र, साधे नैसर्गिक कोरडे रंग खेळले तर ते रंग केसांमध्ये तितकेसे पक्के होत नाही. ते रंग केसांमधून लवकर सुटतात. त्यामुळे रंग खेळताना शक्यतो तेल न लावणेच योग्य असू शकते.

हेअर सेटिंग जेल वापरू नका

तेला प्रमाणेच रंग खेळण्यापूर्वी हेअर सेटिंग जेलचा वापर केसांसाठी नुकसानदायक ठरू शकतो. केसांना लावलेले हेअर सेटिंग जेलमुळे रंग केसांमध्ये अधिक पक्के होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केसांना हेअर सेटिंग जेल होळी खेळण्यापूर्वी लावू नये.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in