

होळी विविध रंग घेऊन आयुष्यात आनंद घेऊन येणारा सण आहे. होलिका दहनानंतर रंग खेळण्यासाठी सर्वजण उत्सूक आहेत. रंगांचा हा सण जगण्याची नवी दृष्टी देतो. मात्र हीच दृष्टी जाऊ शकते. रंग खेळताना योग्य ती काळजी न घेणे तसेच रासायनिक रंगांमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. यामध्ये डोळ्यांना जळजळ होणे, डोळे लालसर पडणे इत्यादी त्रास संभवू शकतात. डोळ्यांना कोणतीही इजा न होऊ देता रंग खेळण्याचा आनंद घेण्यासाठी अशी काळजी घ्या.
नैसर्गिक रंगांचा वापर
होळी खेळताना शक्य तितके नैसर्गिक रंग वापरा. रासायनिक रंगांमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. त्याला सर्वोत्तम पर्याय नैसर्गिक रंग हाच आहे. तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक रंग बनवू शकता. घरच्या घरी नैसर्गिक रंग कसे बनवावे यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्वस्त किंवा बनावट रंग वापरू नका
होळी खेळताना नेहमीच नैसर्गिक आणि दर्जेदार रंग वापरा. स्वस्त आणि रासायनिक रंग डोळ्यांना हानी पोहोचवू शकतात.
कॉन्टॅक्ट लेन्स काढा
तुम्ही डोळ्यांना कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर ते ताबडतोब काढून टाका. रंगाचे कण लेन्स आणि डोळ्यांमध्ये अडकू शकतात, ज्यामुळे जळजळ आणि संसर्गाचा धोका वाढतो.
डोळ्यांमध्ये चुकून रंग गेल्यास काय कराल?
स्वच्छ पाण्याने धुवा
जर रंग डोळ्यांत गेला तर प्रथम डोळे स्वच्छ आणि थंड पाण्याने चांगले धुवा. यासाठी वारंवार डोळे मिचकावा आणि डोळ्यांवर पाणी घाला. लक्षात ठेवा की पाण्याचा प्रवाह थेट डोळ्यांवर पडू नये, तर हलक्या हातांनी ते धुवावेत.
...तर डॉक्टरांकडे जा
डोळ्यांमध्ये तीव्र वेदना किंवा जळजळ होत असल्यास, त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काय करू नये?
डोळे चोळू नका
जर रंग तुमच्या डोळ्यात गेला तर त्यांना चोळू नका. यामुळे रंगाचे कण डोळ्यांत खोलवर जाऊ शकतात आणि जळजळ वाढू शकते.
रंगाच्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळा
होळीच्या वेळी हातांवर रंग असतो, म्हणून त्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)