
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे नुकतेच लग्न झालेल्या जोडप्यांसाठी लग्नानंतरची पहिलीच होळी असणार आहे. भारतीय कुटुंबपद्धतीत लग्नानंतरच्या पहिल्या सणाला एक वेगळेच महत्त्व असते. त्यातल्या त्यात नववधूंसाठी हा सण खूप खास असतो. तसेच तिच्याकडून पहिल्या सणानिमित्त उत्तम स्वयंपाकाची कुटुंबीयांकडून अपेक्षा असते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात होळीला पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे. त्यामुळे स्वादिष्ट पुरणपोळी बनवून कुटुंबीयांची मने जिंकण्याचा नववधूचा प्रयत्न असतो. मात्र, अनेक वेळा अशा वेळी चुकून गडबड होण्याची शक्यता असते. मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी 'या' काही खास टिप्स
अचूक प्रमाण
तुमच्या कुटुंबात किती सदस्य असणार आहे. त्यानुसार तुम्हाला किती पुरणपोळी बनवायच्या आहेत याची नोंद घ्या. त्यानुसार किती साहित्य लागणार हे समजून घेऊन अचूक प्रमाण ठरवा. अनेक वेळा प्रमाण चुकले तर पुरणपोळी बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाण अचूक ठेवा.
चाळणीने गव्हाचे पीठ चाळून घ्या
गव्हाच्या पीठात काही प्रमाणात कोंडाही असतो. तसे पाहता हा कोंडा आरोग्यासाठी चांगला असतो. मात्र, यामुळे पुरणपोळी मऊ होत नाहीत. त्यामुळे बारीक चाळणीतून गव्हाचे पीठ चाळून घ्या. कारण पीठ मऊ असेल तर पुरणपोळी मऊ होतील.
थोडा मैदा मिक्स करा
गव्हाच्या पीठात थोडा मैदा मिक्स केल्यास पुरणपोळी मऊ होण्यास मदत होते. मात्र, मैद्याचे प्रमाण हे कमी असायला हवे. उदाहरणार्थ तुम्ही ३ वाटी गव्हाचे पीठ घेतल्यास मैदा फक्त १ वाटीच असू द्या.
पुरणासाठी डाळ शिजवण्याआधी 'या' गोष्टी करा
पुरणासाठी डाळ शिजवण्याआधी चन्याची डाळ साधारण १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे डाळ व्यवस्थित शिजते. चन्याची डाळ व्यवस्थित शिजली तर पुरणपोळी बिघडणार नाही.
पुरणासाठी डाळ शिवजण्याआधी पीठ योग्य पद्धतीने मळून घ्या. पीठ घट्ट मळू नये. तसेच पीठ मळून झाल्यानंतर थोडेसे तेल लावून झाकून ते डाळ शिजेपर्यंत भिजू द्यावे. यामुळे पोळीत पुरणाचे सार भरल्यानंतर लाटताना फायदा होतो.
डाळ मिस्करमधून बारीक करावे
पुरणासाठी डाळ शिजल्यानंतर अतिरिक्त पाणी गाळून काढून टाकावे. पुरण चांगले होण्यासाठी शिजलेली डाळ मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यावी.
गुळ-साखर योग्य प्रमाणात घालणे
प्रत्येक ठिकाणी पुरण बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही ठिकाणी फक्त गुळाच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. तर काही ठिकाणी साखरेचे पुरण बनवण्यात. काही जण गुळ-साखर मिक्स करून पुरण बनवतात. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने बनवताना गुळ आणि साखरेचे प्रमाण योग्य असल्याची खात्री करून घ्या.
जायफळ आणि वेलची पूड
पुरणपोळी स्वादिष्ट होण्यासाठी पुरणात वेलची पूड आणि जायफळ घाला. यामुळे पुरणपोळीला उत्तम चव येते. तसेच जायफळचे आरोग्यदायी फायदे देखील होतो.