अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता घरातच कंपोस्ट खत; कुंड्यांमधील झाडांसाठी होईल उपयोगी

कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यामुळे अनेक समाजसेवी संस्था, पर्यावरण प्रेमी ओला कचरा घरातच जिरवून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सातत्याने मोहिम चालवत असतात. फावल्या वेळेत आपण घरातच अतिशय सोप्या पद्धतीने कंपोस्ट खत तयार करू शकता. मोबाईलवरील स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी हा देखील एक उपक्रम होईल. चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप...
अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता घरातच कंपोस्ट खत; कुंड्यांमधील झाडांसाठी होईल उपयोगी
प्रातिनिधिक छायाचित्र - Freepik
Published on

कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यामुळे अनेक समाजसेवी संस्था, पर्यावरण प्रेमी ओला कचरा घरातच जिरवून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सातत्याने मोहिम चालवत असतात. फावल्या वेळेत आपण घरातच अतिशय सोप्या पद्धतीने कंपोस्ट खत तयार करू शकता. मोबाईलवरील स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी हा देखील एक उपक्रम होईल. तसेच आपला परिसर स्वच्छ राहून कुंड्यांमधील किंवा घरात जर छोटीशी बाग असेल तर खूप उपयोगी पडेल. चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप...

ओला कचरा-सुका कचऱ्याचे वर्गीकरण

सर्व प्रथम घरातील ओला कचरा-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून घ्या. ओल्या कचऱ्यात प्रामुख्याने भाज्यांच्या काड्या, फळांच्या साली, इत्यादींचा समावेश तुम्ही करू शकता. तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक वेगळे करा. कागदाचे कपटे, धूळ, अन्य सुका कचरा वेगळा करा.

कंपोस्ट बिन

कंपोस्ट खत बनवण्यासाठी कंपोस्ट बिन बनवावे लागते. अनेकजण हे बाजारातूनही तयार कंपोस्ट बिन घेऊन येतात. मात्र, तुम्ही घरातील जुन्या वस्तूंनी हे बनवू शकता. त्यामुळे पुनर्वापरासह वेस्ट टू बेस्ट केल्याचे समाधानही मिळेल, सोबत पैसेही वाचतील.

असे बनवा घरातच कंपोस्ट बिन

साहित्य

प्लास्टिकची जुनी बादली, ड्रम, जुने झालेले डस्ट बिन, मातीचा हंडा (बादली आणि हंड्यासाठी झाकण वेगळे लागेल. तर ड्रम आणि जुने डस्ट बिन याला झाकण असतेच), सुकं गवत किंवा लाकडी भुसा, कागदाचे तुकडे

स्क्रू ड्रिल / गरम सळई (छिद्र पाडण्यासाठी)

कंपोस्ट बिन बनवण्याची कृती

ड्रम किंवा बादली किंवा हंडा जे तुम्ही निवडले असेल त्याला खाली आणि बाजूंनी छोटी छिद्रं (२–३ मिमीची) पाडा, तसेच आजुबाजूलाही छिद्र तयार करून घ्या. जेणेकरून हवेचा वावर होईल आणि नमी साचणार नाही. आता या कंपोस्ट बिनमध्ये पुढीलप्रमाणे कचरा टाका.

कंपोस्ट बिनमध्ये कचरा टाकण्याची योग्य पद्धत

कंपोस्ट बिनच्या तळाशी सुकं गवत, भुसा किंवा कागदाचे तुकडे पसरवा. यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जातो.

आता यामध्ये स्वयंपाक घरातील ओला कचरा टाका. ओल्या कचऱ्यात भाज्यांच्या काड्या, फळांच्या साली, भाज्यांची देठे, घरात उरलेले शिळे अन्न (यामध्ये मांस, हाडे, मांसाचे तुकडे नसावे, तसेच हे ओले नसावे)

आता यावर वरच्या थरात थोडी माती आणि भुसा किंवा कागदाचे कपटे टाका. यामुळे दुर्गंधी येत नाही आणि विघटन नीट होतं.

कंपोस्ट खत तयार होण्यासाठी लाकडी काठीने दोनदा ढवळावे. यामुळे ऑक्सिजन पोहोचतो आणि कंपोस्टिंग जलद गदीने होते.

तुमच्या ड्रमला किंवा डस्ट बिन निवडले असेल तर त्याला झाकण असतेच हे झाकण हलकेच लावा. बादली किंवा मातीचे भांडे घेतले असेल तर त्यावर जाडसर असे झाकण वेगळे ठेवावे लागेल. झाकण ठेवणे गरजेचे आहे कारण यामुळे दुर्गंध येणार नाही. तसेच उंदरं किंवा घुशी आतमध्ये जाणार नाही.

काय काळजी घ्याल?

कंपोस्ट बिनमध्ये कचरा टाकताना दररोजचा कचरा एकदाच साठवून टाका, सारखे सारखे टाकू नका

कधी कधी कोरडं वाटलं, तर थोडंसं पाणी फवारू शकता

ओला कचरा जास्त झाला की त्यावर सुकं थर द्या

एकाचवेळी दोन बिन वापरा – एक भरताना दुसऱ्यात खत तयार होईल

खत कधी तयार होते?

सामान्यपणे २-३ महिन्यांनंतर खत तयार होते. जेव्हा बिनमध्ये काळसर, मृदू, मातीसारखा वास असलेलं मिश्रण दिसू लागलं की तुमचं कंपोस्ट तयार आहे. हे खत तुम्ही तुमच्या घरातील कुंड्यांमधील झाडांना देऊ शकता. तसेच जर तुमच्या घरात एखादी छोटी बाग असेल तर तिथेही हे खत वापरू शकता.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in