
जेवणानंतर तुमचे पोट एकदम जड होते का? पोट जड होऊन पोट फुगत आहे का? जेवण जास्त करा की कमी प्रमाणात ब्लोटिंगचा त्रास होतोय? असे असेल तर तुम्हाला तुमची आहारशैली बदलावी लागेल. मसालेदार, चमचमीत पदार्थ, अतितळलेले पदार्थ, फास्टफूड, सातत्याने जंक फूड खाणे इत्यादींमुळे पोटफुगीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आहारात बदल केल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. जाणून घ्या कसा असावा आहार?
दहीचे प्रमाण वाढवणे
आहारात दह्याचे प्रमाण वाढल्यास पोटफुगीच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. दह्यामध्ये शरिराला आवश्यक बॅक्टेरिया असतात. यामुळे तुमचे पोट संतुलित राहते. सक्रिय प्रोबायोटिक्स असलेले बिना साखरेचे दही आहारात घेतल्यास पोट शांत राहते. पचन चांगले होते. त्यामुळे ब्लोटिंग नियंत्रणात येते.
काकडी
काकडी हे पाणीदार फळ आहे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. काकडी शरिरातील अतिरिक्त मीठ शरिराबाहेर काढण्याचे काम करते. त्यामुळे पचनक्रिया सुलभ होते. अन्नाचे नीट पचन झाल्यामुळे पोटफुगीचा त्रास कमी होतो. नियमित सेवन केल्याने हा त्रास कायमस्वरुपी निघून जाऊ शकतो.
आलं
तसं तर स्वयंपाक घरात आलं कायमंच असतं आणि आल्याचा जवळपास अनेक पदार्थांमध्ये उपयोग केला जातो. पोटफुगी किंवा ब्लोटिंगची समस्या पचनक्रियेचे कार्य सुरळीत होत नसल्यामुळे होते. पचनक्रिया सुरळीत नसल्यामुळे पोटात गॅस तयार होतात. यामुळे आल्याचा एक छोटा तुकडा चावून चावून खाल्ल्यास किंवा चहामध्ये त्याचा उपयोग केल्यास पचनतंत्र झटपट सुधारते. त्यामुळे पोटातील गॅस नियंत्रणात येतात आणि ब्लोटिंगची समस्या दूर होते.
पुदीना
पुदीना हे अत्यंत औषधी आहे. पुदीना हा पाचक असून पचनक्रिया सुधारण्यात मोठी मदत मिळते. तसेच पुदिन्यामुळे पचनक्रिया करणाऱ्या अवयवांना आरामदेखील मिळतो. ब्लोटिंगची समस्या असेल तर आहारात पुदिन्याच्या चटणीचा समावेश अवश्य करावा.
पपई
पपई ही पोटासह केस आणि त्वचेच्या विकारांमध्ये तसेच महिलांना पीसीओडीच्या समस्यांमध्ये खूप गुणकारी असते. पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते. हे अन्न पचवण्यासाठी मदत करते. त्यामुळे पपईचा आहारात नियमित समावेश केल्यास पोटफुगी नियंत्रणात येऊन पोटाला देखील आराम मिळतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)