तुमचे शौचाचे वेळापत्रक तुमच्या आरोग्याविषयी देते माहिती, कशी? जाणून घ्या

बदलत्या जीवनशैलीमुळे कॉन्स्टिपेशनची समस्या हा संपूर्ण जगातील एक सार्वत्रिक प्रश्न बनला आहे.
तुमचे शौचाचे वेळापत्रक तुमच्या आरोग्याविषयी देते माहिती, कशी? जाणून घ्या
Freepik
Published on

तुम्ही कधी एखाद्या आजाराच्या निदानासाठीची चाचणी करून घेतली असेल तर त्यात कदाचित तुम्हाला स्टूल टेस्ट अर्थात मलाच्या नमुन्याची टेस्ट करून घ्यायलाही सांगण्यात आले असेल. याचे कारण मलामधून तुमच्या शरीराचे कार्य कसे चालले आहे याविषयी मोलाची माहिती मिळू शकते. तुमचे शरीर जे बाहेर फेकते किंवा अनेक प्रकरणांमध्ये बाहेर फेकण्यास नकार देते, त्यावरून डॉक्टरांना तुम्ही योग्य आहार घेत आहात किंवा नाही हे समजून घेण्यास मदत होऊ शकते. शौचाचे नियमित वेळापत्रक जपणे हे आपल्या सर्वांगिण स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. पण कॉन्स्टिपेशन (बद्धकोष्ठता वा मलावरोध) या पचनाशी निगडित समस्येमुळे प्रत्येकालाच हे जमत नाही व ही गोष्ट अनियमित व वेदनादायी शौचास कारणीभूत ठरू शकते. याबद्दल धिक जाणून घेऊयात फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथील कन्सल्टन्ट-गॅस्ट्रोएंटेरोलॉजी डॉ. रोनक ताटे यांच्याकडून...

बदलत्या जीवनशैलीमुळे कॉन्स्टिपेशनची समस्या हा संपूर्ण जगातील एक सार्वत्रिक प्रश्न बनला आहे. पण, इथे आपण एक गोष्ट समजून घ्यायला हवी की काही आरोग्यसमस्या कितीही सार्वत्रिक झाल्या तरीही त्यांना सर्वसामान्य किंवा अघातक समजता येत नाही. अशा समस्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण त्यांच्यावर पुरेसे आणि वेळच्यावेळी उपचार होणे गरजेचे असते. लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींसह सर्वच प्रौढांना प्रभावित करणाऱ्या कॉन्स्टिपेशनच्या समस्येलाही ही बाब लागू होते. कॉन्स्टिपेशन ही निर्विवादपणे शौचास जाण्याची वारंवारता कमी होणे, शौचास जाताना त्रास होणे आणि शौचास खूप वेळ लागणे या अडचणींशी निगडित समस्या आहे हे खरेच आहे, पण त्याचबरोबर तिचा संबंध अपानवायू सरताना मोठा आवाज व दुर्गंध येण्याशी तसेच तितक्याच मोठ्याने ढेकर येण्याशीही आहे. हे सार्वजनिक ठिकाणी घडते तेव्हा ती व्यक्ती थट्टेचा विषय बनते व त्यामुळे तिच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो.

कॉन्स्टिपेशनच्या त्रासातून जाणाऱ्या प्रौढ व्यक्तींपैकी ३० टक्क्यांहून अधिक व्यक्तींच्या बाबतीत पार बालपणामध्येच या स्थितीला प्रारंभ झाल्याचे पण तिच्या नकारात्मक परिणामांविषयी जागरुकता नसल्याने तिच्यावर उपचार न झाल्याचे दिसून येते. तीव्र स्वरूपाच्या कॉन्स्टिपेशऩवर दीर्घकाळ उपचार न केल्यास त्याची परिणती पाइल्स (मूळव्याध), फिशर (गुदद्वाराला भेगा), फिस्टुला (भगंदर), हर्निया (अंतर्गळ) आणि रेक्टल प्रोलॅप्स (गुदाशय खाली येणे) या समस्यांमध्ये होऊ शकते, ज्यासाठी शस्त्रक्रियात्मक उपचार करावे लागतात. महिलांमध्ये गरोदरपणा आणि मासिक पाळीमुळे अंतर्स्त्रावांच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात व त्यामुळे त्यांच्या बॉवेल मूव्हमेंटवर परिणाम होऊ शकतो, पण बरेचदा थोड्याफार उपचारांनी हा प्रश्न सुटतो. त्यानंतरही कॉन्स्टिपेशन दूर झाले नाही तर मात्र लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.

सध्याच्या पाहण्यांतून असे दिसून आले आहे की, कॉन्स्टिपेशनसारख्या उदरांत्राच्या कार्यामध्ये अडथळा आणणाऱ्या समस्यांचा संबंध इन्फ्लेमेटरी बॉवेल डिजिज (IBD), पार्किन्सन्स डिजिज, डिप्रेशन (नैराश्य) व डिमेन्शिया (स्मृतीभ्रंश) यांच्याशीही असू शकतो. कॉन्स्टिपेशनची समस्या सुरू होणे हे कोलन (मोठ्या आतड्याच्या) कॅन्सरचेही चिन्ह असू शकते. जर जास्त संख्येने लोकांनी कॉन्स्टिपेशनवरील योग्य उपचार घेतले तर त्यांच्या जीवनमानाच्या दर्जामध्ये प्रचंड सुधारणा होऊ शकते आणि शस्त्रक्रियात्मक उपचारांचे प्रमाण कमी होईल; यातून अनेकांच्या बाबतीत मोठ्या आतड्याच्या कर्करोगांचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होऊ शकेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

बहुतांश वेळा कॉन्स्टिपेशन हे बैठ्या जीवनशैलीचे प्रतिक बनून गेलेले दिसते, ज्यात लोकांना बाहेरचे वाईट प्रकारे बनविलेले, निकस अन्न खाण्याची आवड असते. आहार, झोप, ताणतणाव, व्यायामाचा अभाव इत्यादी जीवनशैलीशी निगडित अऩारोग्यकारक सवयींचा संबंध अपचन, अॅसिडिटी, पोट फुगणे, अॅसिड रिफ्लक्स आणि छातीत दुखणे या लक्षणांशी असते. आपल्या आहारात फायबर आणि पुरेसे द्रवपदार्थ यांचा समावेश असणे गरजेचे असते, या दोन्ही गोष्टी पुरेशा प्रमाणात नसतील तर शौचाचे वेळापत्रक पाळणे अधिक कठीण जाते.

असे असले तरीही बरेचदा, कॉन्स्टिपेशनची समस्या एखाद्या अधिक खोलवर दडलेल्या समस्येकडे निर्देश करते व कॉन्स्टिपेशनविषयी जागरुकता निर्माण करण्यात न आल्यास ही समस्या उपचाराविना दुर्लक्षित राहून जाऊ शकते. कॉन्स्टिपेशनचा त्रास असलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी तथाकथित “लाइफस्टाइल मॅनेजमेंट”साठीचे उपाय सांगणारे कितीतरी व्हिडिओज आणि जाहिरातील सोशल मीडियावर पहायला मिळतात, पण त्यांनी दिलेले सल्ले फारशा गांभीर्याने न घेतलेलेच बरे. दीर्घकाळापासून असलेले कॉन्स्टिपेशन किंवा पोट व आतड्याच्या समस्यांवर लवकारत लवकर उपचार करायला हवेत. आपले शौचाचे वेळापत्रक आपल्या शरीराच्या कार्याविषयी बरेच काही सांगतात आणि ते सांगणे आपण ऐकायला हवे. ‘हेल्थ इज वेल्थ’ आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे वाक्य केवळ म्हणीपुरते मर्यादित राहता कामा नये.

logo
marathi.freepressjournal.in