
फूड मार्क
श्रुती गणपत्ये
जगातील वेगवेगळ्या प्रांतातील लोक वेगवेगळे अन्न खातात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागात, जमातींमध्ये विशिष्ट अन्न निषिद्ध मानलं जातं. अन्न बंदीची ही परंपरा आणि आधुनिक काळातील विशिष्ट अन्न बंदीमागचं राजकारण या दोन्ही बाबी समजून घेणं आवश्यक आहे.
खाद्या गोष्टीवर बंदी घालण्यात काय गंमत असू शकते? बंदीचा उद्देश, राजकारण, इतिहास समजला की ती किती पोकळ संकल्पना आहे हे सहज समजतं. मात्र ते लक्षात न घेता बंदीच्या नावाने हिंसाचारापर्यंत लोकांची मजल जाते. आजचा विषय अन्न बंदीचा आहे आणि जगातील अनेक देश, समाज यांच्यामध्ये विशिष्ट अन्न न खाण्याबद्दल नियम आहेत. पण त्यात मेख अशी आहे की, जेव्हा अन्नाशी संबंधित व्यावसायिक हितसंबंध गुंतलेले असतात आणि नफा कमवायचा असतो तेव्हा हे कडक निकष किंवा बंदी हुशारीने बाजूला ठेवली जाते. अगदी परिस्थितीनुसार, उपलब्धतेप्रमाणेही त्यांच्यामध्ये बदल केला जातो.
मुस्लिम शिया परंपरेत, फक्त खवले असलेल्या माशांना (समक) खाण्याची परवानगी आहे. याचा अर्थ असा की शिया लोक सहसा शार्क, सागरी सस्तन प्राणी, ऑक्टोपस, स्क्विड (सेफॅलोपॉड्स), खेकडे, क्रॉफिश, लॉबस्टर (क्रॅस्टेशियन्स) आणि क्लॅम, शिंपले, ऑयस्टर, स्कॅलॉप्स (मॉलेक्स) खात नाहीत. असं असतानाही आज शिया मुस्लिम बहुसंख्यांक असलेला इंडोनेशिया हा देश जगातील सर्वात मोठे शार्क मासे पकडणाऱ्यांपैकी एक आहे. त्या देशाच्या पूर्वेकडील भागांतील मुस्लिम मच्छिमार हे स्थानिक अन्न आणि ब्लबर (सागरी प्राण्याच्या त्वचेखालचा चबरीचा तुकडा ज्यातून तेल मिळतं) हा फायदेशीर स्रोत मिळविण्यासाठी व्हेल मारतात. शिया परंपरेमध्ये, स्टर्जन मासा आणि त्याची कॅविआर (माशाची खारवलेली अंडी) हे दोन्ही 'हराम' मानलं जात होतं. १९७९ मध्ये इराणमधील क्रांतीनंतर स्टर्जन मासेमारी आणि कॅव्हिआर निर्यातीमधील आर्थिक गणितं, सोव्हिएत मत्स्यपालनाशी स्पर्धा या गोष्टी लक्षात घेता मूळचा बंदीचा नियम तपासण्याची गरज निर्माण झाली. त्यावर शिया धर्मगुरूंनी असा निकाल दिला की, स्टर्जनच्या अंगावर असलेला चकचकीत, जाडसर त्वचेचा भाग हेच खवले आहेत. त्यामुळे १८८३ मध्ये अयातुल्ला खोमेनी यांनी स्टर्जन आणि त्याच्या कॅविअरला हलाल घोषित करणारा फतवा जारी केला. थोडक्यात, अन्नाबद्दलचे धार्मिक नियम अंतिम नाहीत. पश्चिम बंगाल, काश्मिरमधले ब्राह्मण मांस खातात, पण इतर ठिकाणचे ब्राह्मण मांस खात नाहीत. हे असे विरोधाभास जगभर सर्व धर्म आणि पंथांमध्ये आढळतात.
आता आणखी एक उदाहरण बघा, २०११ मध्ये सोमालियातील अतिरेक्यांनी समोशावर बंदी घातली. त्यांच्या मते, समोसा या पदार्थाला तीन टोकं आहेत, त्यामुळे ते ख्रिश्चन धर्माच्या पवित्र ट्रिनिटीचं प्रतीक आहे आणि म्हणून इस्लाम त्याला परवानगी देऊ शकत नाही. परंतु अतिरेकी हे विसरले की समोशाचं मूळ मध्य पूर्व भागात आढळतं, जिथे इस्लाम प्रभावी आहे. हा मूळ समोसा मांसाचं सारण भरून केला जातो. पण भारतात आल्यावर त्यात बटाटा टाकून तो प्रचंड लोकप्रिय केला गेला.
स्पार्टन संस्कृतीमधल्या उच्च वर्गात सामूहिक जेवणावळींचं म्हणजेच पार्ट्यांचं प्रस्थं इतकं जास्तं होतं की, अति अन्न खाण्यावर आणि अशा पार्ट्यांवर बंदी घालणारा कायदा करण्यात आला. अन्नाची नासाडी होऊ नये, असा कदाचित उद्देश असेलही. तो युरोपमधला अन्नावर बंदी घालणारा पहिला कायदा मानला जातो. पण रोमन्सना हे मान्य नव्हतं. असं म्हटलं जातं की, त्यांचे पाहुणे “वोमिटोरियम”मध्ये जाऊन आधी खाल्लेलं अन्नं उलटीतून काढून टाकून द्यायचे आणि मग नवीन अन्नं खाण्यासाठी पोटात जागा करायचे. कारण भरपूर, विविध प्रकारचं अन्नं खाणं, पार्ट्या करणं हे त्या संस्कृतीत सातत्याने केलं जात असे. अर्थात या वोमेटोरियमच्या सत्यतेबाबत वाद आहेत. पण त्यावरून जुन्या काळातल्या अन्न संस्कृतीचा अंदाज येतो.
लॅटिन अमेरिकेचं मुख्य पीक असलेला मका हा उत्तर अमेरिकन लोकांना मान्य नव्हता. अनेक शतकं मका अमेरिकन समाजाने स्वीकारला नाही. कारण त्यांच्या दृष्टीने मका हे रेड इंडियन्स या त्यांच्या शत्रूचं अन्नं होतं. त्यासाठी त्यांनी समाजातील खालच्या स्तरातील लोकंच मका खातात, असा प्रचारही केला. पण आज सिनेमा, टीव्ही बघताना पॉपकॉर्नने भरलेले मोठाले डब्बे हे अमेरिकेचं प्रतीक बनलं आहे. त्यांच्या जेवणातल्या अनेक पदार्थांमध्ये मका किंवा मक्याचं पीठ सहज वापरलं जातं. कारण त्याची उपयुक्तता अमेरिकनांना कळली आणि मक्याला असलेला विरोध गळून पडला.
धर्माच्या नावाने बंदी घातली की त्याला विरोध होत नाही आणि फारसे प्रश्न विचारले जात नाहीत. हिंदुत्ववादी ज्याप्रमाणे गोमांस खाण्याला विरोध करतात, तसेच ज्यू धर्मीयांमध्ये मांस खाण्यासाठीचे नियम आहेत. ज्यू आणि इस्लाम धर्मीय डुकराचं मांस निषिद्ध मानतात. ज्यूंमध्ये ‘कोशर’ मांसच खाल्लं जातं. ज्या प्राण्यांना दोन खूर आहेत आणि जे आपलं अन्न रवंथ करून खातात त्यांचं मांस हे ‘कोशर’ समजलं जातं. उदाहरणार्थ, गाय, बकरा, मेंढा. कल्ले व खवले असलेले मासे खायला परवानगी आहे, पण इतर नाही. डुकराच्या मांसावरील बंदी कदाचित ज्यू धर्मातून इस्लाममध्ये आली असावी. कारण तो रवंथ करून खात नाही. पण तशी बंदी ख्रिश्चन धर्मात नाही. हे तिन्ही धर्म एकाच भागामध्ये उगम पावले, पण अन्नाच्या बाबतीतले त्यांचे नियम वेगवेगळे आहेत. डुकराच्या मांस बंदीचं स्पष्टीकरण देताना मानववंश शास्त्रज्ञ मार्विन हॅरिस म्हणतात की, “नेगेव, जॉर्डन व्हॅली आणि बायबल आणि कुराणच्या इतर प्रदेशांमध्ये उष्ण, कोरड्या हवामानाशी डुक्कर जुळवून घेऊ शकत नाही...त्याच्या अंगावर संरक्षक केसांची कमतरता आणि त्याला घाम येत नसल्याने डुकराला बाह्य आर्द्रतेने आपली त्वचा ओलसर ठेवणं गरजेचं होऊन बसतं. त्यामुळे चिखलात लोळून वगैरे डुक्कर आपली त्वचा आर्द्र ठेवतो. पण तेही उपलब्ध नसल्यास, डुक्कर स्वतःच्या मूत्र आणि विष्ठेमध्येच लोळतो. तापमान जितकं जास्त तितका तो अधिक ‘घाणेरडा’ राहतो.” आता अशा घाणेरड्या प्राण्याला खायला अनेकांना आवडणार नाही. तरीही ख्रिश्चन धर्मात डुकराचं मांस खाल्लं जातंच. डुकराला घाम येत नसला तरी इंग्रजीमध्ये म्हण आहे “स्वेट लाइक अ पिग.”
सगळ्या धर्मगुरू, धर्म संस्थापक, धर्म प्रचारक यांच्यामध्ये येशू ख्रिस्तांनी अन्न बंदीबाबत एकदम पुरोगामी भूमिका घेतली आहे. ते म्हणतात, “तोंडात काय (अन्नं खाल्लं) जातं यावरून माणूस अपवित्र होत नाही तर त्याच्या तोंडातून काय बाहेर येतं (हे महत्त्वाचं), (मॅथ्यू १५:११).” असं असतानाही ख्रिश्चन धर्मामध्येही दीर्घकाळपर्यंत टाेमॅटोवर बंदी होती. कारण त्याचं रोप हे मँड्रेक्स नावाच्या रोपाशी मिळतंजुळतं दिसतं आणि ते रोप लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी वापरलं जातं म्हणून. त्यामुळे किमान १५० वर्षं तरी ख्रिश्चनांनी टोमॅटोचा स्वीकार केला नाही आणि १७०० मध्ये पहिल्यांदा इटलीमध्ये अन्न सजवण्यासाठी टोमॅटो प्युरी वापरण्यात आली. अमेरिकेने तर सर्वात शेवटी सॉसचा वापर सुरू केला. मात्र आज टोमॅटो सॉसची मोठी इंडस्ट्रीच अमेरिकेमध्ये आहे.
धर्म आणि देव या नावाखाली सगळ्या बंदी खपून जातात आणि त्यापुढे तर्क मागे पडतो. एखाद्या गोष्टीच्या पावित्र्याला प्रश्न विचारला जाऊ शकत नाही आणि जो विचारतो त्याला समाजाच्या बाहेर काढलं जातं. मानववंश शास्त्रज्ञ मेरी डग्लसने म्हटल्याप्रमाणे, “पवित्र असणं म्हणजे परिपूर्ण, अखंड असणं, पावित्र्य म्हणजे एकता, एखाद्या व्यक्तीची परिपूर्णता. अन्नाच्या नियमांमध्ये मात्र पावित्र्याचं केवळ मिथक वापरलं जातं.”
थोडक्यात, इतिहासात घातलेल्या बंदी या आज हास्यास्पद वाटतात. कारण त्या बंदीचा उद्देशच संपून गेला आहे. अन्नामध्ये माणसं तोडण्यापेक्षा जोडण्याचं कसब जास्त आहे.
मुक्त पत्रकार, shruti.sg@gmail.com