
लिंबू हे फळ उत्तम आरोग्यासाठी वरदान आहे. हे फळ बारमाही उपलब्ध असते. मात्र, उन्हाळ्यात एक छोटा लिंबू आपल्या आरोग्याला उत्तम राखण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो. लिंबाचा रस, लिंबाची साल, लिंबाच्या बिया सर्वच खूप उपयोगी असतात. सर्वात महत्वाचे उन्हामुळे त्वचेच्या होणाऱ्या आजारांपासून लिंबू सुटका तर देतोच तसेच तुमची त्वचा देखील चमकदार बनवतो. जाणून घेऊ कसे...
'क' जीवनसत्वयुक्त लिंबू
लिंबूत 'क' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. 'क' जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही नावाचा आजार होण्याची शक्यता असते. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा निर्माण होतो. रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो. रक्तवाहिन्या हाडांसंबंधित काही आजार होऊ शकतात. याशिवाय 'क' जीवनसत्वाच्या अभावाचा संबंध त्वचेच्या विविध समस्यांसोबतही असतो. लिंबू हा 'क' जीवनसत्वाचा मोठा स्रोत आहे. लिंबूच्या आहारात समावेश केल्याने 'क' जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते.
उन्हाळ्यात त्वचेसाठी लिंबू उपयुक्त
उन्हाळ्यात त्वचा काळवंडणे, त्वचेवर काळे डाग पडणे इत्यादी समस्या उद्भवतात. तर मुरुमांची समस्याही वाढते. या सर्वांवर एक छोटा लिंबू प्रभावी उपचार देतो. एक चमचा लिंबाचा रस त्वचेवरील काळ्या डागांवर लावल्यास हे डाग कमी होतात. बेसन पीठात दही आणि लिंबाचा रस एकत्रित करून त्याचा फेसपॅक बनवून लावल्यास उन्हामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळून निघतो आणि त्वचा चमकदार बनते.
काळ्या पडलेल्या ओठांसाठी लिंबूचा वापर
ओठ काळे पडल्यास लिंबाच्या सालने ओठांवर मसाज करावा. तसेच लिंबाच्या सालांची पावडर लिप बाम आणि क्लिन्जरमध्ये एकत्र करून वापरल्यास ओठांचा काळपटपणा कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवतो
उन्हाळ्यात अनेक कारणास्तव शरीरात पाण्याची कमतरता होते. त्याचे परिणाम त्वचा आणि ओठांवर होतो. चेहरा रूक्ष वाटायला लागतो. यासाठी तुम्ही लिंबू सरबत पिऊ शकता. लिंबू सरबतमुळे शरीर हायड्रेट होते तसेच लिंबातील अँटीऑक्सिडंट आणि 'क' जीवनसत्वाचे लाभ मिळतात. त्वचा चमकदार राहते.
पचनाची समस्या दूर होईल
अनेक वेळा अपचन झाल्याने पिंपल्स आणि अन्य समस्या निर्माण होतात. यासाठी अन्न व्यवस्थित पचन होणे गरजेचे असते. जेवणानंतर पाणी न पिता आधी एक चमचा लिंबाचा रस पिऊन नंतर दोन घोट पाणी प्यावे. लिंबाचा रस अन्न पचन होण्यासाठी मदत करतो. अन्न व्यवस्थित पचन झाल्यास पिंपल्स आणि अन्य समस्या निर्माण होत नाहीत.