Healthy Drink Recipe: एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा अनुभवल्या नंतर आता मे महिन्यातही तशीच काहीशी परस्थिती आहे. सध्या देशात उष्णता शिगेला पोहोचली आहे. कडक उन्हामुळे अनेकांना त्रास होत आहे. अशावेळी आपल्याला सतत काही तरी थंड खावंसं,प्यावंसं वाटतं. उन्हामुळे अनेकदा डिहायड्रेशन होतं. अशावेळी शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी सगळेच वेगवेगळ्या पद्धतीची पेयांचे सेवन करत असतो. मग यावेळी जर तुम्ही चविष्ट आणि आरोग्यदायी पेय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही कैरीचं पन्ह तयार करून पिऊ शकता. कैरीचं पन्ह फक्त चवीलाच चांगलं आहे असं नाही तर ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही हे कैरीचं पन्ह १ महिन्यासाठी स्टोअर करू शकता. चला कैरीचं पन्ह कसं बनवायचं हे जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
२ कैरी, ४ टेबलस्पून बडीशेप, पुदिन्याची काही पाने, ३ चमचे जिरे, चवीनुसार काळे मीठ, चवीनुसार गूळ
जाणून घ्या कृती
> सर्वप्रथम कैरी छान धुवून घ्या आणि त्यांना कुकरमध्ये उकडून घ्या.
> कैरी उकडली की थंड पाण्याने धुवा. त्यानंतर कैरीची साल काढून घ्या.
> आता कैरीचा पल्प कापून एका भांड्यात ठेवा. हा पल्प नीट स्वच्छ करून घ्या.
> आता हा पल्प, ४ टेबलस्पून बडीशेप, काही पुदिन्याची पाने, ३ चमचे जिरे, दीड टीस्पून काळे मीठ, अर्धा ग्लास पाणी, चवीनुसार गूळ घाला. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये खूप बारीक वाटून घ्या.
> आता कैरीचं पन्ह बनवण्यासाठी एक ग्लास थंड पाणी घ्या. त्यात ३-४ बर्फाचे तुकडे घाला. या पाण्यात २ चमचे तयार पल्प टाका छान मिक्स करा आणि तुमचं कैरीचं पन्ह तयार आहे.
स्टोअर कसं करायचं?
बनवलेलं मिश्रण तुम्ही काचेच्या एअर टाईट डब्यात काढून घ्या. हा डब्बा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)