Maharashtra Konkan Drink: सध्या देशभरात उष्णतेचा कहर झाला आहे. राज्यात गर्मीचा पारा ४० च्या पुढे गेला आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच दरम्यान आज राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. अशा स्थितीत या गर्मीत मतदान (Lok Sabha Elections 2024) करायला जात असताना तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका. या काळात शरीराला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध सोलकढी पेयाची रेसिपी घेऊन आलो आहोत. सोलकढीच्या सेवनाने तुमच्या शरीराला त्वरित थंडावा मिळतो. याची चव तर अप्रतिम लागतेच पण हे एक बेस्ट एनर्जी ड्रिंक कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
अर्धी वाटी कोकम
१ कच्चा खोबरे
६ ते ७ पाकळ्या लसूण
आल्याचा अर्धा तुकडा
२ हिरव्या मिरच्या
६ ते ७ काळी मिरी
२ चमचे जिरे
चिमूटभर हिंग
३ चमचे चाट मसाला
चवीनुसार मीठ
१ बीटरूट
काही बर्फाचे तुकडे
हिरवी कोथिंबीर
साखर २ चमचे (ऐच्छिक)
जाणून घ्या कृती
सोलकढी बनवण्यासाठी आधी अर्धी वाटी कोकम गरम पाण्यात भिजवा. आता यानंतर एक कच्चा नारळ घेऊन त्याचे छोटे तुकडे करा.
आता मिक्सरच्या भांड्यात खोबरे, ६ ते ७ पाकळ्या लसूण, अर्धा तुकडा आल्याचा तुकडा, २ हिरव्या मिरच्या, ६ ते ७ काळ्या मिरी, २ चमचे जिरे, चिमूटभर हिंग, ३ चमचे चाट मसाला, चवीनुसार मीठ १ बीटरूट, काही बर्फाचे तुकडे आणि भिजवलेल्या कोकमचे पाणी घेऊन त्यात १ कप पाणी घालून बारीक वाटून घ्या. (हवे असल्यास २ चमचे साखरही घालू शकता)
आता एक मोठे भांडे घेऊन हे मिश्रण मलमलच्या कपड्यात टाकून चांगले गाळून घ्या.
आता उरलेले मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्या आणि पुन्हा एकदा मलमलच्या कपड्यात घालून नीट गाळून घ्या.
तुमची चविष्ट सोलकढी तयार आहे.
गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बर्फाचे तुकडे घाला.
चवीनुसार मीठ घालून हे एनर्जी ड्रिंक प्या.