Healthy Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता करणे फार महत्त्वाचे असते. नाश्तामुळे रात्रीच्या जेवणानंतरचा मोठा उपवास तोडला जातो. सकाळी नाश्त्यात चांगले पदार्थ खाल्ल्याने दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा मिळते. नाश्त्यात नेहमी चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे आहे. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी. हा पराठा जेवढा टेस्टी आहे तेवढाच हेल्दीसुद्धा आहे. चला तर मग जाणून घेऊयात पनीर पराठा बनवण्याची सोपी पद्धत.
लागणारे साहित्य
पीठ - २ कप
पनीर - २०० ग्रॅम किसलेले
कांदा - १ बारीक चिरून
हिरव्या मिरच्या - २-३ बारीक चिरून
कोथिंबीर - १/४ कप बारीक चिरून
पुदिना - १/४ कप बारीक चिरून
आले-लसूण पेस्ट - १ टीस्पून
लाल मिर्च पावडर - १/२ टीस्पून
गरम मसाला- १/४ टीस्पून
चवीनुसार मीठ
तेल - पराठे भाजण्यासाठी
पीठ कसं मळायचे?
एका भांड्यात पीठ, मीठ आणि थोडे पाणी एकत्र करून मऊ मळून घ्या. हे तयार पीठ आता १० मिनिटे झाकून ठेवा.
जाणून घ्या पराठा बनवण्याची सोपी कृती
एका भांड्यात पनीर, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, आले-लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ एकत्र करून मिक्स करा.
मळलेल्या पिठाचे गोळे करून ते छोटे लावून घ्या.
या चपातीमध्ये १-२ चमचे पनीरचं स्टफिंग घाला.
चपाती व्यवस्थित बंद करा आणि हलक्या हाताने लाटून घ्या.
तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा आणि त्यावर पराठा घाला.
पराठा दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान खरपूस भाजून घ्या.