घरी डेअरीसारखे मलाईदार दही कसे लावावे? जाणून घ्या छोट्या-छोट्या ट्रिक्स

तुम्हाला घरी जर डेअरीसारखे मलाईदार दही लावायचे असेल तर या काही छोट्या-छोट्या ट्रिक्स इथे दिल्या आहेत.
घरी डेअरीसारखे मलाईदार दही कसे लावावे? जाणून घ्या छोट्या-छोट्या ट्रिक्स
You Tube - Masteer Recipes
Published on

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात दही खाणे हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. दह्यात व्हिटामिन B12 भरपूर मात्रेत असते. त्यामुळे व्हिटामिन B12 चे पोषण मिळवण्यासाठी प्रत्येकाने आहारात दह्याचा निश्चितच समावेश करावा. अनेकवेळा आपल्याला डेअरीसारखे घट्ट मलाईदार दही घरी लावायला आवडते मात्र ते तसे होत नाही. दह्यात पाणीच जास्त होते किंवा ते गोळे-गोळे दही होते. तुम्हाला घरी जर डेअरीसारखे मलाईदार दही लावायचे असेल तर या काही छोट्या-छोट्या ट्रिक्स इथे दिल्या आहेत.

दही लावताना सर्वप्रमथ चांगले घट्ट दूध असायला हवे. म्हशीच्या दुधाचे दही हे चांगले होते. गायीच्या दुधाचे दही सुद्धा करू शकता. दूध चांगले उकळून घ्या. दूध उकळत असताना ते मोठ्या चमच्याने अधून-मधून ढवळून घ्या.

उकळलेले दूध हे किमान ४०-४५ डिग्रीपर्यंत थंड व्हायला हवे. दूध थंड झाले की नाही हे दूधात बोट घालून तपासावे. म्हणजे जर तुम्हाला किमान चटका बसला नाही तर समजून घ्यावे की दूध थंड झाले आहे.

  • मातीच्या भांड्यात दही लावणार असाल तर मातीचे भांडे प्रथम चांगले धुवून वाळवून घ्या.

  • दही लागण्यासाठी किमान १० ते १२ तास लागतात.

  • दही लावावयाचे भांडे पसरट असेल याची काळजी घ्या. कारण पसरट नसलेल्या भांड्यात पाणी पसरायला जागा नसते.

  • चांगले मलाईदार दही घ्या आणि त्याचे विरजन लावा.

  • चमचाभर विरजन हे केवळ भांड्यात घालू नका तर संपूर्ण भांड्याला ते लावून घ्या.

  • नंतर त्यात दूध घाला.

  • दूध घालताना दूधाचा फेस भांड्याच्या वरच्या बाजूला येईल याची काळजी घ्या.

  • नंतर भांडे झाकून ठेवा.

  • सामान्यपणे ४ तासानंतर तुम्ही हे भांडे फ्रिजमध्ये हलक्या हाताने उचलून ठेवा.

  • सर्वात महत्वाचे भांडे झाकल्यानंतर त्याला सारखे सारखे उघडून पाहू नका.

  • १० ते १२ तासांनी छान मलाईदार दही तयार आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in