होळीच्या रंगांमुळे केस खराब होण्याची भीती वाटते? केसांचे आरोग्य जपण्यासाठी 'अशी' घ्या काळजी
होळीचा सण आयुष्यात अनेक रंग घेऊन येतो. विविध रंग खेळल्यानंतर आंघोळ करूनही रंग निघत नाही. रंगांमध्ये अनेक वेळा केमिकल्स असतात. त्यामुळे हे रंग सहजासहजी सुटत नाही. विशेष करून केसांमध्ये गेलेला रंग सहजासहजी निघत नाही. परिणामी होळी खेळल्यानंतर केस रूक्ष होऊ शकतात. तसेच केस गळण्याची समस्या, केसांमध्ये कोंडा वाढीस लागणे, अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. होळी खेळल्यानंतर रंगांमुळे निर्माण होणाऱ्या केसांच्या समस्या सोडवण्यासाठी 'या' काही खास टिप्स.
प्रथम केसांना धुण्यासाठीचे जेल लावा
अलोवेरा जेल, जास्वंद जेल हे केसांसाठी आरोग्यदायी असतात. यामुळे केस मऊ होतात. त्यामुळे होळीचा रंग खेळल्यानंतर साध्या पाण्याने केस धुवून नंतर तुम्हाला सूट होणाऱ्या जेलने केसांच्या मुळाशी मालिश करा. तसेच हे जेल केसांना लावा. साधारण १५ मिनिटे जेल केसांना लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने केस धुवा. त्यानंतर तुम्हाला सुट करणारा शॅम्पू आणि कंडिशनर लावून केस धुवू शकता.
केस कसे पुसावे?
केस धुतल्यानंतर ओले केस लगेच पुसू नये. केसांना टॉवेल घट्ट बांधून ठेवावा. ओले केस नाजूक असतात. त्यामुळे लगेच पुसल्याने केसांच्या मुळ्यांना इजा होते. त्याऐवजी केसांना २० मिनिटे टॉवेल बांधून ठेवा. नंतर हलक्या हाताने केसांना मसाज द्या.
रात्री झोपण्यापूर्वी तेल लावा
केसांना रात्री झोपण्यापूर्वी तेल कोमट करून घ्या. तेलाने केसांना हलक्या हाताने मालीश करा. केसांचा यामुळे केस धुताना न निघालेला रंगही सुटेल. केस छान बांधून ठेवा.
शिकाकाईच्या पाण्याने केस धुवा
दुसऱ्या दिवशी शिकाकाई, आवळा, रिठा, इत्यादी आयुर्वेदिक घटक पाण्यात उकळून घ्या. हे पाणी बारीक कपड्याने गाळून घ्या. पाणी थोडे कोमट होऊ द्या. नंतर या पाण्याने केस धुवा. रिठा तुमच्या केसांना स्वच्छ करतो आणि अनावश्यक तेल केसांमधून काढून टाकतो. शिकाकाई केसांना नरम करते. बहुगुणी आवळा केसांना पोषण देईल. यामुळे केसांमधील रंग निघून जाईल. केस कोरडे पडणार नाही. केस मऊ आणि छान होईल.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)