
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, योगासन, आहाराचे नियमन करणे, काही पदार्थ आहारातून वर्ज्य करणे इत्यादी... बऱ्याच वेळा याचा फायदा होतो. मात्र, या प्रयत्नात त्वचेवर स्ट्रेच मार्क्स येतात. ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे. तुम्हालाही असे स्ट्रेच मार्क्स होत आहेत का? असल्यास काळजी करू नका. साध्या सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही हे स्ट्रेच मार्क्स् घालवू शकतात. पाहा या खास टिप्स
वजन कमी करण्याचा ताण घेऊ नका
वजन झटपट कमी होण्यासाठी अनेक जण खूप जास्त ताण करून घेतात. कधी कधी तर गरजेपेक्षा जास्त व्यायाम करतात. त्यामुळे असे स्ट्रेच मार्क्स लवकर वाढतात. त्याऐवजी वजन कमी करताना ते हळूहळू कमी करा. त्यासाठी ओढाताण करू नका. संथ गतीने व्यायाम करणे अनेकवेळा फायदेशीर ठरते. खूप पटकन वजन घटवले जात असेल तर त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते. कारण त्वचेच्या वरच्या थरातील कोलेजन फायबर्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे वजन हळूहळू कमी करा.
जीवनसत्त्वयुक्त आहार
जीवनसत्त्व अ, क आणि ई हे त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे वजन कमी करण्यसााठी केल्या जाणाऱ्या डाएटमधून तुम्हाला या जीवनसत्त्वांची पूर्तता होईल याची काळजी घ्या. जीवनसत्त्व ए मुळे त्वचेचे टिशू सुधारतात. तर जीवनसत्त्व क मुळे कोलेजनची निर्मिती वाढते.
आवश्यक प्रमाणात पाणी प्या
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असायला हवे. त्यामुळे योग्य त्या प्रमाणात पाणी प्या. कारण शरीर डिहायड्रेट झाले तर त्वचा कोरडी होते. त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते परिणामी स्ट्रेच मार्क्स येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक त्या प्रमाणात पाणी पिणे हा चांगला उपाय आहे.
क्रीम आणि लोशन
डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते क्रीम आणि लोशनचा वापर करा. शक्यतो कोलेजनचे प्रमाण वाढेल अशा प्रकारचे क्रीम किंवा लोशन वापरावे.
व्यायाम केल्यानंतर स्ट्रेचिंग करा
व्यायाम केल्यानंतर स्ट्रेचिंग करणे महत्त्वाचे असते. यामुळे रक्तप्रवास सुधारतो. तसेच व्यायामामुळे शरीरावर आलेला अतिरिक्त ताण दूर होतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)