

नवी दिल्ली : देशात लठ्ठपणा वाढत आहे. लठ्ठपणा ही भारतातील शांत त्सुनामी आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष पुरवायला हवे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
'द लँसेट' मध्ये भारतातील संभाव्य लठ्ठपणाबाबत एका संशोधनात प्रसिद्ध झाले आहे. येत्या २०५० पर्यंत भारतात ४४९ दशलक्ष लोक लठ्ठ असतील. त्यात पुरुषांचे प्रमाण २१८ दशलक्ष व २३१ दशलक्ष महिला असतील. लठ्ठपणा वाढल्यास त्याचा परिणाम 'टाईप-२' मधुमेह, हृदयाशी संबंधित विकार, हॉर्मोनचे परिणाम आणि विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाला निमंत्रण देतो. भारतात सध्या जगात सर्वाधिक मधुमेहग्रस्त लोक राहत आहेत. भारतात १०१ दशलक्ष मधुमेहग्रस्त आहेत.
तरुणांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण
विशेष म्हणजे २० ते ३० वयोगटातील काम करणाऱ्या तरुणांना मधुमेह होत आहे. कारण तरुणांच्या वजनात मोठी वाढ होत आहे, असे 'एम्स'च्या मेडिसीन विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल यांनी सांगितले. लठ्ठपणाच्या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण भारताच्या आरोग्य पायाभूत सुविधेला हा लठ्ठपणाचा आजार परवडणारा नाही. कारण त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची आपल्याकडे कमतरता आहे.
मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे पोटविकार तज्ज्ञ डॉ. राजेश उपाध्याय म्हणाले की, लठ्ठपणामुळे आरोग्यता धोका वाढतो. हा आजार देशासमोरील मोठा धोका आहे. लठ्ठपणा हा सौंदर्यप्रसाधनाचा मुद्दा नाही. तो क्लिनिकल मुद्दा आहे. त्यामुळे फॅटी लिव्हर, मधुमेह, हृदयविकार व पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. मी या आजाराचे परिणाम रोज पाहत आहे. आपल्या केवळ जनजागृतीपेक्षा दीर्घकालीन काम यावर केले पाहिजे. शाळा, कार्यालय, रुग्णालय व वैद्यकीय अभ्यासक्रमात याचा अभ्यास केला पाहिजे, असे ते म्हणाले.
सर गंगाराम हॉस्पिटलचे वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मोहसीन वली म्हणाले की, लठ्ठपणाचा आजार छुप्या पद्धतीने वाढत आहे. त्याचे परिणाम भयानक असतील. ही भारतातील शांत त्सुनामी असेल. लठ्ठपणाचे परिणाम हे रुग्णालयात आल्यानंतर विविध आजारांमुळे जाणवतात. भारताने राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती पाहून या आजारावर उपचार केले पाहिजेत. आपण शाळा व रुग्णालयांच्या कँटीनमध्ये कोणते पदार्थ देतो. आम्ही तरुण डॉक्टरांना शिकवतो. आपण मोबाइल किती वेळ पाहतो, या सर्व बाबी बदलणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.