
आंतरराष्ट्रीय आनंद दिन दरवर्षी २० मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो.यामध्ये केवळ वैयक्तिक आनंदाला महत्त्व नसते तर संपूर्ण समाज आणि राष्ट्र किती आनंदी आहे याचा यामध्ये समावेश केला जातो. हा दिवस आनंदाला मानवांच्या सर्वात महत्त्वाच्या गरजांपैकी एक म्हणून ओळखतो आणि त्यावर चर्चा करण्याची गरज अधोरेखित करतो. जाणून घेऊया याचे उद्दिष्ट, महत्त्व आणि थीम काय आहे.
आंतरराष्ट्रीय आनंद दिनाचे उद्दिष्ट
आंतरराष्ट्रीय आनंद दिनाचे उद्दिष्ट आनंदाचे महत्त्व आणि लोकांच्या जीवनात त्याची महत्त्वाची भूमिका सांगणे आहे. या खास प्रसंगी, त्याचा इतिहास, महत्त्व, थीम आणि बरेच काही एक्सप्लोर करण्यासाठी थोडा वेळ काढूया.
आनंद आणि दीर्घायुष्य यांच्यातील सहसंबंध
आनंदी व्यक्ती या जास्त काळ जगतात असे अनेक अभ्यास सांगतात. तसेच या लोकांना आरोग्य समस्या देखील कमी असतात. त्यामुळे आनंद आणि दीर्घायुष्य यांच्यात फार जवळचा संबंध आहे. काही अभ्यासानुसार आनंदाचा कमी मृत्यूदराशी लक्षणीय संबंध आहे. तर काही अभ्यासानुसार, उच्च पातळीचे आशावादी लोकही दीर्घायुषी ठरतात.
अद्याप तरी आनंद आणि दीर्घायुष्य या दोन्हींमधील अचूक संबंधांची यंत्रणा पूर्णपणे स्पष्ट नाही. तरी देखील असे दिसून आले आहे की आनंदी व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते. अशा लोकांचा जीवनाबद्दल पाहण्याचा दष्टिकोन फार सकारात्मक असतो. तसेच हे लोक त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या विचारांवरही प्रभाव टाकू शकतात.
कशी झाली सुरुवात?
भूतान या देशाने सर्वप्रथम राष्ट्रीय आनंदाची संकल्पना मांडली. १९७० पासून भूतान हा देश सकल राष्ट्रीय आनंदाच्या संकल्पनेवर आधारित "राष्ट्रीय आनंद अहवाल" प्रकाशित करत आहे. हा दृष्टिकोन सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा सकल राष्ट्रीय आनंदावर भर देतो. १२ जुलै २०१२ रोजी ठराव संयुक्त राष्ट्रांनी याविषयी ठराव मंजूर केला. याचा प्रस्ताव भूतानकडून सादर करण्यात आला होता. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
आंतरराष्ट्रीय आनंद दिन २०२५ ची थीम
या वर्षी, आंतरराष्ट्रीय आनंद दिनाची थीम 'काळजी घेणे आणि सामायिकरण' ही आहे. या वर्षीची थीम आपल्याला आठवण करून देते की एकमेकांची काळजी घेतल्याने, एकमेकांशी जोडलेले वाटल्याने आणि एखाद्या मोठ्या गोष्टीचा भाग असल्याने चिरस्थायी आनंद मिळतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)