
काळ कोणताही असो मासिक पाळी हा महिलांसाठी महत्त्वाचा विषय. काळ बदलतोय तसा मासिक पाळीत वापरावयाची साधनेही बदलत चालली आहेत. नवीन पर्याय अधिकाधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहेत. जुन्या काळात मासिक पाळी दरम्यान महिला जुने कापड वापरायच्या. काळ बदलला महिला घराबाहेर जॉबसाठी पडल्या. नोकरीच्या ठिकाणी कापड वापरणे कठीण जात होते. त्यावर सॅनिटरी पॅडचे पर्याय आले. मात्र, काही काळातच यामुळे देखील अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या. जाणून घेऊया सॅनिटरी पॅडच्या समस्या आणि त्यावर उपाय...
सुविधांच्या अभावामुळे सॅनिटरी पॅडची व्हिलेवाट लावण्याचा प्रश्न
सॅनिटरी पॅड वापरण्यासाठी सोयीस्कर असले तरी वारलेल्या सॅनिटरी पॅडची व्हिलेवाट कशी लावायची हा एक गंभीर प्रश्न नोकरदार महिलांसमोर उभा ठाकलेला असतो. आजही अनेक ठिकाणी कामाच्या ठिकाणी महिलांसाठी व्यवस्थित सुविधा असलेले वॉशरूम्स नसतात. काही ठिकाणी तर महिला आणि पुरुष कॉमन वॉशरूम शेअर करतात. तसेच अनेक ठिकाणी डस्टबिन देखील नसतात. परिणामी वापरलेले सॅनिटरी पॅड टाकायचा कुठे हा भीषण प्रश्न महिलांसमोर उभा ठाकलेला असतो.
सॅनिटरी पॅडमुळे होणारे प्रदूषण (sanitary pad pollution)
सॅनिटरी पॅडचा कचरा ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. कारण या पॅड्समध्ये प्लास्टिक आणि पॉलिमर्सचा वापर असल्याने सॅनिटरी पॅड सहजासहजी जाळता येत नाही. मातीत टाकले तर या पॅडचे व्यवस्थित विघटन होत नाही. काही सर्व्हेनुसार भारतात दरवर्षी एक लाख १३ हजार टन सॅनिटरी पॅडचा कचरा निर्माण होतो. सॅनिटरी पॅडचे विघटन होण्यासाठी किमान ८०० वर्ष लागतात. त्याचबरोबर कचराकुंडीवर काम करणाऱ्या कामगारांना या वापरलेल्या पॅडमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अलीकडील काही काळात सॅनिटरी पॅड बर्नर मशीन आले असले तरी अनेक सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी याची सुविधा नसते. तसेच या मशीन दुरुस्ती देखभालींचा खर्च आणखी वेगळा.
पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड खर्चिक
सॅनिटरी पॅडमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा विचार करून अनेक संस्थांनी कापडी पॅड किंवा पर्यावरणपूरक विघटन होणारे सॅनिटरी पॅड बाजारात आणले. मात्र, हे पॅड तुलनेने खर्चिक असतात. त्यामुळे ते सर्वसामान्य महिलांना न परवडणारे असतात. कापडी पॅड पुन्हा वापरता येत असले तरी तो धुण्याचा प्रश्न समोर असतोच कारण अनेक महिला अशा ठिकाणी काम करतात जिथे शौचालयांची सुविधाही नसते. अशा परिस्थितीत कापडी पॅड चेंज करणे कठीण जाते. शिवाय पाण्याचा भीषण दुष्काळ असलेल्या ठिकाणी देखील हा पर्याय उपयुक्त नाही.
सॅनिटरी पॅडचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
काही महिलांना सॅनिटरी पॅडमुळे खाज येणे, त्वचा लाल पडणे, रॅशेश येणे, असे आजार संभवतात.
मेंस्ट्रुअल कप (menstrual cup) सॅनिटरी पॅडला उत्तम पर्याय
सॅनिटरी पॅडला सर्वोत्तम पर्याय (sanitary pad alternative) म्हणजे 'मेन्स्ट्रूअल कप'. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक संस्थांनी मेंस्ट्रुअल कप बाजारात आणला आहे. तसेच गेल्या ८ ते ९ वर्षांच्या काळात सोशल मीडियामुळे याचा चांगलाच प्रचार होत आहे. मेंस्ट्रुअल कप हा त्वचेला उत्तम असणाऱ्या टॉप क्लास सिलिकॉनपासून बनवण्यात येतो. हे वापरण्यासाठी सोपे असल्यामुळे पाळीच्या काळातील आपल्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन चांगले करता येते.
सॅनिटरी पॅडच्या तुलनेत खर्च नगण्य
पॅडच्या तुलनेत हा खर्च अगदीच नगण्य ठरतो. कारण उत्तम प्रतिच्या सॅनिटरी पॅडसाठी महिलांना वर्षाकाठी १५०० ते २००० रुपये खर्च करावा लागतो. तर मेंस्ट्रुअल कपचा खर्च १५०-२००-५०० च्या घरात असतो. हा कप एकदा खरेदी केल्यानंतर किमान ५ ते ६ वर्ष चालतो. तर काही कंपन्या १० वर्ष उत्तम टिकेल असाही दावा करतात. हा कप वापरण्यासाठी अगदी सहज असतो. वापरानंतर स्वच्छ धुवून नंतर पर्समध्ये अगदी सहज कॅरी करता येतो. त्यामुळे सॅनिटरी पॅडसाठी मेंस्ट्रुअल कप हा एक उत्तम पर्याय ठरत आहेत.