‘इंटरनेट’ वापरताय, तर ही सावधगिरी बाळगाच; अपडेट राहाल तरच मिळेल धोकादायक वेबसाइटपासून संरक्षण

सुरक्षित ब्राऊझिंग म्हणजे ‘इंटरनेट’ वापरताना तुमची माहिती सुरक्षित ठेवणे. यात सुरक्षित कनेक्शन वापरणे, मालवेअर, फिशिंग हल्ल्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे आणि ओळख लपवण्यासारख्या ऑनलाइन धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दक्षता बाळगणे तसेच तुमच्या ब्राऊझरची गोपनीयता सेटिंग्स योग्यरीत्या सेट करणे आदी बाबींचा समावेश होतो. ते सायबर जोखीम कमी करते.
‘इंटरनेट’ वापरताय, तर ही सावधगिरी बाळगाच; अपडेट राहाल तरच मिळेल धोकादायक वेबसाइटपासून संरक्षण
Published on

मुंबई : सुरक्षित ब्राऊझिंग म्हणजे ‘इंटरनेट’ वापरताना तुमची माहिती सुरक्षित ठेवणे. यात सुरक्षित कनेक्शन वापरणे, मालवेअर, फिशिंग हल्ल्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे आणि ओळख लपवण्यासारख्या ऑनलाइन धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दक्षता बाळगणे तसेच तुमच्या ब्राऊझरची गोपनीयता सेटिंग्स योग्यरीत्या सेट करणे आदी बाबींचा समावेश होतो. ते सायबर जोखीम कमी करते.

असुरक्षित ब्राऊझिंगमध्ये सायबर गुन्हेगारांसाठी माहिती सहजपणे उपलब्ध असते आणि वापरकर्ते विविध सायबर हल्ल्यांना बळी पडू शकतात. सुरक्षित ब्राऊझिंगचे अनेक महत्वाचे फायदे आहेत जे वापरकर्त्याच्या ऑनलाइन अनुभवाला अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवतात. जुने सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन वापरण्याऐवजी ब्राऊझर, प्लगइन्स, ऑपरेटिंग सिस्टिम आणि वेब ॲप्लिकेशन नियमितपणे अपडेट न केल्यास त्यामध्ये सुरक्षा त्रुटी राहतात. या त्रुटींचा फायदा घेऊन हल्लेखोर तुमच्या सिस्टिममध्ये प्रवेश करू शकतात. जुन्या सॉफ्टवेअर डेटा ब्रीचसारख्या विविध हॅकसाठी मार्ग मोकळा होतो. म्हणून तुमच्या ब्राऊझरच्या सेटिंगमध्ये जाऊन सुरक्षित ब्राऊझिंग पर्याय सुरू करा. त्यामुळे तुम्हाला धोकादायक वेबसाइट आणि डाऊनलोडपासून संरक्षण मिळेल. काही वेबसाइटवर जास्त पॉप अप्स आणि स्कॅरवेअर दिसणे हे धोक्याचे लक्षण असू शकते. स्कॅरवेअर हे असे पॉप अप्स असतात जे तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये व्हायरस असल्याची खोटी भीती दाखवतात आणि तुम्हाला बनावट अँटीव्हायरस किंवा व्हीपीएन डाऊनलोड करण्यास सांगतात. असे सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यास तुमचे डिव्हाईस हॅक होऊ शकते. थर्ड पार्टी कुकीज ब्लॉक करा, त्यामुळे वेबसाइट्सना तुमच्या ऑनलाइन व्यवहारांचा मागोवा घेणे कठीण होते.

मोफत उपलब्ध आहे म्हणून शॉपिंगसाठी गेल्यावर तुम्ही पब्लिक वायफायचा वापर करत असाल तर सावधान. कारण असे केल्याने फसवणूक होऊ शकते. तेव्हा पब्लिक वायफायचा वापर करून झाल्यावर अकाऊंट लॉगआऊट करायला विसरू नका. लक्षात ठेवा, इंटरनेट सुरक्षितपणे वापरणे ही केवळ तंत्रज्ञानाची जबाबदारी नाही तर प्रत्येक वापरकर्त्याची वैयक्तिक जबाबदारी आहे.

काय कराल?

  • सुरक्षित ब्राऊझर वापरा : नेहमी अपडेटेड, सुरक्षित ब्राऊझरसह ब्राऊझ करा आणि साइट्स HTTPS वापरत असल्याची खात्री करा.

  • अँटीव्हायरस टाका : विश्वासार्ह अँटीव्हायरस सॉफ्टवेअरसह तुमचे डिव्हाइस संरक्षित करा.

  • URL तपासा : संवेदनशील माहिती प्रविष्ट करण्यापूर्वी वेबसाइट लिंक्स तपासा.

  • फायरवॉल सक्षम करा : सुरक्षिततेच्या अतिरिक्त थरासाठी फायरवॉल वापरा.

काय टाळाल?

  • अज्ञात लिंक्सवर क्लिक करणे टाळा : संशयास्पद लिंक्सपासून दूर राहा.

  • सार्वजनिक वाय-फायवर सावधगिरी बाळगा : संरक्षणाशिवाय असुरक्षित सार्वजनिक वाय-फाय वापरू नका.

  • सार्वजनिक डिव्हाइसवर पासवर्ड सेव्ह करू नका : सामायिक किंवा सार्वजनिक संगणकांवर लॉगिनचा तपशील ठेवणे टाळा.

  • असुरक्षित साइट वगळा : ब्राऊझर इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका आणि असुरक्षित वेबसाइटना भेट देणे टाळा.

logo
marathi.freepressjournal.in