गीतेच्या विविध अर्थछटा

ज्या भगवद्गीतेला एकेकाळी धर्ममार्तंडांनी नाकारलं होतं त्याच गीतेला अलीकडच्या काळात हिंदूंचा प्रमुख धर्मग्रंथ म्हणून मान्यता मिळाली. आता तर भगवद्गीतेचा समावेश जागतिक वारसा म्हणून मान्यता असलेल्या हस्तलिखितांच्या यादीत करण्यात आला आहे. गीतेतील आशयाने अनेक तत्त्वज्ञांना, लोकप्रिय नेत्यांना भूरळ घातली आणि प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने गीतेचा अर्थ लावला.
गीतेच्या विविध अर्थछटा
नवशक्ति अक्षररंग
Published on

- शब्दरंग

- ह.भ.प. देवदत्त परुळेकर

ज्या भगवद्गीतेला एकेकाळी धर्ममार्तंडांनी नाकारलं होतं त्याच गीतेला अलीकडच्या काळात हिंदूंचा प्रमुख धर्मग्रंथ म्हणून मान्यता मिळाली. आता तर भगवद्गीतेचा समावेश जागतिक वारसा म्हणून मान्यता असलेल्या हस्तलिखितांच्या यादीत करण्यात आला आहे. गीतेतील आशयाने अनेक तत्त्वज्ञांना, लोकप्रिय नेत्यांना भूरळ घातली आणि प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने गीतेचा अर्थ लावला.

भारतीय प्राचीन तत्त्वज्ञानाचा वारसा असलेला भगवद्गीता हा ग्रंथ जागतिक वारसा म्हणून घोषित झाला आहे. पण आपल्याला माहीत आहे का? आपल्या इतिहासात दीर्घकाळपर्यंत गीतेला धर्ममार्तंडांकडून स्वीकारलं गेलं नव्हतं. अनेक कर्मठ ब्राह्मण कुटुंबात गीता पठणाला चक्क मनाई होती. गीता आणि वेदप्रामाण्य यात एक संघर्ष होता. अलीकडच्या काळात गीता आणि आधुनिक नीतिमूल्य यातही संघर्ष उभा राहिलेला दिसतो. भगवद्गीता ही वेद-उपनिषदांचा सारगर्भ गाभा मानली जाते. परंतु याच भगवद्गीतेतील काही श्लोकांचा विपरीत अर्थ लावून जन्मजात चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि पुढे जातिव्यवस्था यांचं समर्थन करण्यात आलं, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर माऊलींपासून गांधी-विनोबांपर्यंत अनेकांनी तिचा उपयोग कुळ, जात, वर्ण, लिंग यातील भेद नाकारून समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी केला. अगदी परस्परविरोधी विचारसरणीच्या लोकांनी आपल्या विचारांच्या समर्थनार्थ भगवद्गीतेचा उपयोग केलेला दिसून येतो.

भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर तो एक गहन तत्त्वज्ञानाचा, जीवनधर्माचा संवाद आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात युद्धभूमीवर झालेला. प्रत्येक काळात, विविध संप्रदायांतील थोर संत, तत्त्वज्ञ, विचारवंत आणि क्रांतिकारकांनी आपल्या विचारप्रणालीप्रमाणे गीतेचे अर्थ लावले. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, संत ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक, श्री अरविंद, श्रील प्रभुपाद, विनोबा भावे आणि महात्मा गांधी या सर्वांनी वेगवेगळ्या अंगांनी गीतेवर भाष्य केले आहे.

आदि शंकराचार्य: अद्वैत वेदांताचे प्रतिबिंब

आदि शंकराचार्य (८ वे शतक) हे गीतेचे सर्वात जुने भाष्यकार मानले जातात. त्यांनी गीतेकडे अद्वैत वेदांत या द्वैत नाकारणाऱ्या (नॉन-ड्युअल) विचारधारेतून पाहिलं.शंकराचार्यांच्या दृष्टीने मोक्ष हे जीवनाचं अंतिम ध्येय असून ज्ञानयोग हे मोक्षप्राप्तीचं सर्वोच्च साधन आहे. कर्म हे केवळ मन:शुद्धीसाठी आवश्यक आहे; अंतिम सत्य फक्त ज्ञानाने प्राप्त होतं.

ब्रह्म सत्य असून जग मिथ्या म्हणजे मायिक आहे, हा प्रमुख सिद्धांत आदि शंकराचार्यांनी सांगितला आहे. संन्यास (कर्मत्याग) हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, जीवन हे माया आहे, त्यातून सुटका हीच खरी दिशा, असं ते सांगतात. म्हणूनच त्यांनी प्रतिपादन केलेली गीता ही निवृत्त जीवनासाठी आहे. ध्यान, वैराग्य आणि ब्रह्मज्ञान या अर्थाने त्यांनी गीतेचा अर्थ लावलेला आहे. त्यांनी वर्णाश्रमधर्माचा पुरस्कार केला असून स्त्रिया व शूद्र यांना मोक्षाचा अधिकार नाकारला.

रामानुजाचार्य: विशिष्टाद्वैत (गुणात्मक अद्वैत)

रामानुजाचार्य (११वे शतक) यांनी आदि शंकराचार्यांच्या अद्वैतात काही बदल केले आणि ‘विशिष्ट अद्वैत’ मांडले. त्यांच्या दृष्टीने भक्ती हे मोक्षाचं मुख्य साधन आहे. आत्मा हा ईश्वराचा अंश आहे, पण तो पूर्णपणे ईश्वरात विलीन होत नाही. रामानुचार्यांच्या मते मोक्ष म्हणजे विष्णूच्या वैकुंठात अनंत सेवा करणं. यामुळेच रामानुजांची गीता ही वैयक्तिक, भावनिक आणि भक्तिप्रधान आहे. शूद्रांनाही मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी ते प्रयत्नशील होते. भक्तीमध्ये ते समावेशकता मानत होते. पण वर्णाश्रम त्यांना मान्य होता.

मध्वाचार्य: द्वैत वेदांत

मध्वाचार्य (१३वे शतक) यांनी द्वैतवाद मांडला. ईश्वर आणि जीव यांच्यातील फरक कायमचा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या दृष्टीने ईश्वर आणि आत्मा यांचं एकत्व अशक्य आहे. विष्णूच सर्वोच्च सत्ता आहे आणि भक्ती हेच अंतिम साधन आहे. मोक्ष म्हणजे भगवंताच्या चरणी शरण जाणं. त्यांची गीता स्पष्टपणे भगवतभक्तीवर आधारित असून शंकराचार्यांच्या अद्वैताचा त्यांनी जोरदार विरोध केला आहे.

मध्वाचार्यांनी वर्णव्यवस्थेलाही नैसर्गिक मानलं. जन्मसिद्ध फरक मान्य केला. मोक्षाच्या पात्रतेमध्ये वर्गभेद मान्य केले. समाजातील वर्गभेद साक्षात्काराने नाहीसे होत नाहीत, असा विचार ते मांडतात.

संत ज्ञानेश्वर: चिद्विलासवाद

संत ज्ञानेश्वरांनी (१३वे शतक) ‘ज्ञानेश्वरी’ या ओवीबद्ध भाष्याद्वारे गीतेचं मराठीकरण केलं. त्यांनी गीतेला चिद्विलासवाद म्हणजे ‘साक्षात चैतन्याचा आनंदमय खेळ’ म्हणून उलगडलं. ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने आत्मा, परमात्मा आणि विश्व हे सगळं चैतन्याचं नृत्य आहे. त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केलेला असला तरी शंकराचार्यांचा मायावाद नाकारला. अहंकाररहित कर्म म्हणजेच मुक्तीचा मार्ग हे सांगितलं. मोक्ष ही मृत्यूनंतर मिळायची गोष्ट नसून ‘याच जीवनामध्ये याच देही’ सिद्ध करायची गोष्ट आहे, असंही स्पष्ट केलं.

जीवनाचं अंतिम ध्येय मोक्ष प्राप्ती नाही तर भक्ती हेच आहे, असं ज्ञानेश्वरी सांगते. प्रपंच सोडून संन्यास घेण्याची आवश्यकता नाही. निष्काम कर्म आणि भक्ती यांच्या आचाराने जीवनमुक्ती साध्य करता येते. मुक्तीनंतरही भक्तीचाच आचार चालू ठेवावा, यावर ज्ञानेश्वरी भर देते.

ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून एक क्रांती केली होती. त्यांनी गीतेचा आशय लोकांच्या भाषेत म्हणजेच मराठीत आणला. सर्वसामान्यांना समजेल अशा रूपात अनेक उदाहरणं देऊन तो स्पष्ट केला. धर्माचं ज्ञान संस्कृत भाषेत गठित करण्याची परंपरा ज्ञानेश्वरांनी मोडली. ज्ञानेश्वरीपूर्वी भगवद्गीतेवर कोणीही संस्कृत सोडून अन्य भाषेत भाष्य केलेलं नव्हतं. ज्ञानेश्वरांची गीता ही भक्ती आणि आत्मज्ञान यांचा सुंदर संगम आहे. त्यांची प्रत्येक ओवी ही भक्तांशी संवाद साधणारी आहे.

ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ लावताना समतेचा जोरदार पुरस्कार केला. त्यांच्या दृष्टीने विश्वातील सर्वच जण ईश्वर स्वरूप असल्याने भेदाभेदाला काहीही स्थान नाही. भक्तिमार्गात कुळ, जात, वर्ण व लिंग यावरून भेद करता येत नाही. सर्वांनाच भक्तीचा आणि मोक्षाचा अधिकार आहे. लिंग-जात-धर्म-पंथ यांच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक समता प्रस्थापित करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्यांच्या गीता भाष्याचा म्हणजेच ज्ञानेश्वरीचा उपयोग केला.

समतेला पोषक असा गीतेचा अर्थ लावता येऊ शकेल, हा धोका सनातनी कर्मठ ब्राह्मणांना माहीत होता. त्यामुळेच वेदप्रामाण्य आणि त्याआधारे वर्णजातवर्चस्व मानणाऱ्या अनेकांचा गीतेला विरोध होता. कित्येक ब्राह्मण कुटुंबांमध्ये गीता पठणालाच बंदी होती. तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई आणि कचेश्वर ब्रह्मे यांनी तसे स्पष्ट उल्लेख केलेले आहेत. यावरून ज्ञानेश्वर माऊलींचं गीतेचा समतावादी अर्थ लावण्याचं कार्य किती मोलाचं आहे हे लक्षात येईल.

लोकमान्य टिळक: कर्मयोग व राष्ट्रीय कर्तव्य

लोकमान्य टिळकांनी ‘गीता रहस्य’ या ग्रंथात गीतेवर भाष्य केलं आहे. त्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत गीतेचा अर्थ लावला. त्यांच्या दृष्टीने ‘निष्काम कर्म’ हेच गीतेचं मूळ तत्त्व आहे. संन्यास नव्हे, तर कर्तव्य आणि धर्मासाठी लढणं हे श्रेष्ठ आहे. कृष्ण म्हणजे योग्य वेळेस योग्य निर्णय घेणारा मार्गदर्शक. टिळकांची गीता ही क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरली. ‘फळाची अपेक्षा न करता कर्तव्य करा,’ हे त्यांनी लोकांसमोर मांडलं. आदि शंकराचार्यांचा कर्म संन्यासाचा मार्ग टिळकांना मान्य नसला तरी शंकराचार्यांचे अद्वैत व मायावाद हे सिद्धांत टिळकांना मान्य आहेत. त्यांनी अनेकदा सामाजिक सुधारणांना विरोध केला आणि वर्णाश्रम, जातिव्यवस्था टिकून राहिली पाहिजे, असा आग्रह धरला.

श्री अरविंद: संपूर्ण योग व आत्म्याचा उत्क्रांतिवाद

श्री अरविंद यांनी गीतेचं अत्यंत आधुनिक व वैश्विक तत्त्वज्ञान मांडलं. संपूर्ण योग या दृष्टीने ते गीतेकडे पाहतात. त्यांच्या दृष्टीने गीता ही तीन योगांचा समन्वय करते. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग. आत्म्याचं उत्क्रांत स्वरूप म्हणजे पृथ्वीवर दिव्यता प्रकट करणं, असं ते सांगतात.

युद्ध हे केवळ बाह्य नाही, तर अंतर्मनातील द्वंद्वही आहे, अशी मांडणी करणारी त्यांची गीता ही ध्यान, कर्म आणि भक्ती या योगांचा समन्वय साधून समग्र अनुभव देणारी आहे. अरविंदांनी वर्णभेद नाकारणारी वैश्विक मानवतावादाची भूमिका मांडली.

जात, धर्म, राष्ट्र या सीमा मनुष्याच्या विकासामध्ये अडथळा आणत आहेत, असं ते सांगतात. गीतेतून ‘दिव्य जीवन’ साकार करणं हे लक्ष्य ते समोर ठेवतात.

श्रील प्रभुपाद: कृष्णसाक्षात्कार आणि भक्तियोग

श्रील प्रभुपाद (२०वे शतक) यांनी ‘भगवद्गीता ॲज इट इज’ (Bhagavad-gita As It Is) या नावाने गीतेचं भक्तिप्रधान भाष्य केलं आहे. त्यांच्या दृष्टीने कृष्ण हे परमेश्वराचं साक्षात स्वरूप आहेत. गीतेचा हेतू म्हणजे भक्तीतून कृष्णप्रेम जागवणं. हरिनाम संकीर्तन, साधना आणि भक्ती हेच मोक्षाचे मार्ग आहेत, असं ते सांगतात. त्यांची गीता ही जागतिक भक्ती चळवळीचा केंद्रबिंदू बनली आहे. ते वर्णव्यवस्था स्वीकारतात, पण ती गुणांवर आधारित असावी, जन्मावर नव्हे, अशी मांडणी करतात.

मात्र अस्पृश्यता किंवा जातीय विषमता यावर त्यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही.

विनोबा भावे: अंतःकरणातील युद्ध

विनोबा भावे यांनी गीतेवर तब्बल १८ वर्षं चिंतन केलं. गीता ही कृष्णाने अर्जुनाला युद्धाच्या प्रसंगी सांगितली. विनोबा गीतेकडे ‘अंतःकरणातील युद्ध’ या दृष्टीने पाहतात. त्यांनी गीतेचा ‘गीताई’ हा मराठी अनुवाद केला व गीतेवरती धुळ्याच्या तुरुंगात प्रवचनंही दिली. ती साने गुरुजींनी लिहून घेतली.

विनोबांच्या दृष्टीने अर्जुनाचं मानसिक युद्ध हे प्रत्येकाच्या मनात चालणारं द्वंद्व आहे.

कर्मयोग हा प्रेमाने आणि सेवाभावाने केला पाहिजे. गीतेचा उद्देश संपूर्ण समाजकल्याण आहे. विनोबांची गीताई ही अध्यात्म व समाजकार्य यांचा मिलाफ आहे.

महात्मा गांधी: अहिंसा आणि आत्मशुद्धीचा धर्म

महात्मा गांधींसाठी गीता म्हणजे त्यांची ‘आई’, ‘गुरू’ आणि ‘अंतरात्मा’ होती. त्यांच्या दृष्टीने ‘निष्काम कर्म’ हा गीतेचा आत्मा आहे. कोणतीही आसक्ती न धरता कर्म करत राहावं, हा ‘अनासक्ती योग’ हाच गीतेचा संदेश आहे, असं महात्मा गांधी सांगतात. संन्यासाचा खरा अर्थ इच्छांचा त्याग हा आहे, कर्तव्याचा त्याग हा नाही, हेही ते अधोरेखित करतात. कृष्ण म्हणजे आपला अंतरात्मा, जो सदैव आपल्याला मार्ग दाखवतो, असंही गांधीजी सांगतात. गांधीजींसाठी गीता म्हणजे सत्य, अहिंसा आणि कर्मधर्मसंस्थापन याची घोषणा होती.

अस्पृश्यता निर्मूलन, हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्रीसन्मान यासाठी त्यांनी गीतेचा वापर केला. गीता म्हणजे आत्मबल, नैतिकता आणि समाजक्रांतीचा आध्यात्मिक स्रोत असं ते मानत. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण गीतेशी एकरूप होता.

गीता हा केवळ ग्रंथ नसून अभ्यासाची एक दिशा, कृतीचा आरसा आणि अंतःकरणातील प्रकाश आहे. ती प्रत्येक युगात नवे अर्थ उलगडते. काहींसाठी ती निवृत्तीचा मार्ग आहे, काहींसाठी सेवा आहे, काहींसाठी युद्ध आहे आणि काहींसाठी प्रेम. केवळ भारतीयच नव्हे, तर जगभरच्या अनेक विद्वानांना गीता आकर्षित करत आली आहे.

गीता म्हणजे एक अजब आरसा आहे, ज्यात आपण आपलं खरं रूप पाहू शकतो. आपल्यासाठी गीता काय आहे? आजच्या जीवनात गीता आपल्याला काय सांगते? याचा शोध प्रत्येकाने स्वतःच घ्यावयाचा आहे.

कीर्तनकार व ज्ञानेश्वरीचे अभ्यासक.

logo
marathi.freepressjournal.in