Irregular Menstruation: अनियमित मासिक पाळीमुळे होऊ शकतो कर्करोगाचा धोका!

Periods Care: महिलांनी त्यांच्या मासिक पाळीकडे नीट लक्ष द्यायला पाहिजे कारण अनियमित मासिक पाळीमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
Irregular menstruation can lead to cancer risk
Freepik

Cancer Risk Because of Irregular Menstruation: मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनातील एक मूलभूत पैलू आहे. दर महिन्याला, प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी येते. महिलांनी त्यांच्या मासिक पाळीत होणारे कोणतेही बदल दुर्लक्ष न करता त्याच्यावर लक्ष दिले पाहिजे, कारण अनियमित मासिक पाळीमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. सामान्यतः, एक निरोगी स्त्रीला १२ ते १४ वर्षाच्या वयोगटात मासिक पाळी सुरू होते तर, मेनोपॉज विशेषत: ४५ ते ५० वर्षे वयाच्या दरम्यान येतो. सामान्य मासिक पाळी २८ दिवसांपर्यंत असते ज्या मध्ये रक्तस्त्राव ३ ते ७ दिवसांपर्यंत असतो. चक्राचा अवधी, रक्तस्त्रावाचा कालावधी किंवा जास्त रक्तस्त्राव यामधील कोणतेही अनियमित मासिक पाळीचे कारण असू शकते. याबद्दल अधिक जाणून घेऊयात एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर (HCGMCC) अँड हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्व्हिसेस प्रमुख प्रा. डॉ. राज नगरकर यांच्याकडून....

मासिक पाळीच्या अनियमिततेची कारणे

मासिक पाळीची अनियमितता हार्मोनल असंतुलन, तणाव, लठ्ठपणा, PCOS, थायरॉईड विकार किंवा अनुवांशिक मूत्र प्रणालीशी संबंधित काही कर्करोग यांसारख्या विविध कारणांमुळे उद्भवू शकते म्हणून मासिक पाळीची अनियमितता आणि कर्करोगाचा धोका यांच्यातील परस्परसंबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे. काही संशोधनानुसार असे सूचित होते की अनियमित मासिक पाळी कर्करोग होण्याच्या जोखमीशी संबंधित आहे. ह्या अनियमित चक्रामुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा जसे एंडोमेट्रियल कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग चा धोका वाढू शकतो. हे स्पष्ट आहे कि हार्मोन्सच्या प्रभावामुळे होणारे कर्करोग मासिक पाळीत अनियमितता असलेल्या स्त्रियांमध्ये होण्याची शक्यता जास्त असते, या परिस्थितीत हार्मोनल असंतुलनाची भूमिका महत्वाची होते.

अनियमित मासिक पाळी आणि इतर काही कर्करोग यांच्यात थेट संबंध सूचित करणारे मर्यादित पुरावे असले तरी, अन्ननलिका, पोट किंवा आतड्यांवर परिणाम करणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांना या परिस्थितीमुळे गंभीरपणे ऍनिमिया असल्यास त्याचा मासिक पाळीच्या रक्तप्रवाहात घट होऊ शकतो. त्याचप्रमाणे, रक्त किंवा लिम्फॅटिक प्रणालीशी संबंधित कर्करोग, जसे की ल्युकेमिया किंवा लिम्फोमा मासिक पाळीवर परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, जर बोनमॅरो वर परिणाम झाला असेल आणि प्लेटलेटची संख्या कमी किंवा पांढऱ्या रक्त पेशी (WBC) ची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असेल, तर स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. हा असामान्य रक्तस्त्राव रक्त कर्करोग किंवा इतर रक्ताशी संबंधित विकार दर्शवू शकतो.

काय उपाय करावेत?

मासिक पाळीच्या अनियमिततेशी संबंधित इतर घटकांमध्ये आनुवंशिकता, काही पर्यावरणीय घटक आणि जीवनशैली निवडी यांचा समावेश होतो. सुव्यवस्थित आणि सुनिश्चित मासिक पाळी याची खात्री करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमितपणे व्यायाम करणे, संतुलित आहार राखणे, वजन नियंत्रित ठेवणे आणि तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे.

शेवटी, मासिक पाळीतील अनियमितता हा आरोग्यविषयक समस्यांचा संभाव्य संकेत आणि कर्करोगाचा धोका म्हणून ओळखणे महत्त्वाचे आहे. महिलांना त्यांच्या मासिक पाळीत सतत अनियमितता येत असल्यास त्यांना वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कर्करोग लवकर ओळखण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणीवर भर दिला पाहिजे, कारण महिला प्रजनन प्रणालीशी संबंधित अधिकांश कर्करोग लवकर ओळखले जाऊ शकतात. लवकर निदान आणि योग्य उपचार उत्कृष्ट परिणाम देऊ शकतात.

logo
marathi.freepressjournal.in