
झोप ही शरीरासाठी अतिशय महत्त्वाची आहे. मात्र, झोपण्याचे काही नियम आहेत. निसर्गचक्र हे सांगते की रात्री लवकर झोपावे आणि पहाटे लवकर उठावे. मात्र, आता हल्लीच्या जीवनशैलीमुळे सगळ्याच गोष्टी उलट-सुलट होत आहे. अनेक जण रात्री उशिरापर्यंत जागतात तसेच सकाळी लवकर उठतात. त्यामुळे त्यांना दिवसा झोप येते. काही जणांना दिवसा झोपणे हा शारीरिक आरामासाठी गरजेचा वाटतो तर काहींच्या मते दिवसा झोपण्याचे गंभीर परिणाम होतात. तर आयुर्वेदानुसार दिनचर्या ठरवाताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. चला जाणून घेऊया दिवसा झोपणे हे आरोग्याला चांगले असते की वाईट...
काय सांगते आयुर्वेद?
आयुर्वेद सामान्यपणे ऋतुनुसार दिनचर्या ठरवावी असे सांगते. भारतीय उपखंडात जवळपास सहा ऋतू असतात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे ते सहा ऋतू आहेत. या प्रत्येक ऋतूत वात, पित्त आणि कफ प्रवृत्ती वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे काही ऋतूंमध्ये दिवसा झोपणे फायदेशीर ठरते तर काही ऋतूंमध्ये त्याचे दुष्परिणाम होतात. वसंत, वर्षा आणि शरद या ऋतुंमध्ये दिवसा न झोपण्याचा सल्ला दिला जातो. तर ग्रीष्म ऋतूत दिवसा झोप काढणे चांगले मानले जाते.
कामाप्रमाणेही विभाजन
दिवसा झोपणे चांगले की वाईट याचे विभाजन कामाप्रमाणे देखील केले जाते. तुम्ही अति शारीरिक परिश्रमाची कामे करत असाल तर दिवसा झोपल्यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळतो. मात्र, तुमचे कार्य शारीरिकदृष्ट्या परिश्रमाचे नसेल तर दिवसा खूप जास्त वेळ झोपू नये.
मानसिक थकवा दूर करण्यासाठी
तुम्ही बौद्धिक कार्य करत असाल तर दुपारी २० मिनिटे ते ३० मिनिटे मेंदूला विश्रांती देण्यासाठी झोप घेऊ शकता. परिणामी तुमचा मानसिक थकवा तर जातोच तसेच तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक क्रियाशील होता.
दिवसा फार जास्त वेळ झोपण्याचे दुष्परिणाम
तुम्ही रात्री जास्त वेळ जागे राहता आणि दिवसा झोप घेत असाल तर आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
वजन वाढते
दिवसा खूप जास्त झोपल्याने वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.
कफजन्य परिस्थिती असेल तर दिवसा झोपल्याने ही प्रवृत्ती आणखी वाढू शकते.
दिवसा झोपल्याने डोके जड पडते. त्याचा दैनंदिन कामावर परिणाम होतो.
दिवसा झोपल्याने भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असते. तर मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसा झोपू नये. कारण यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होऊ शकते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)