
ऑटोरिक्षा चालक हे अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. कोणी आपल्या रिक्षात आकर्षक संदेश लिहितात, तर कोणी प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करतो. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात मुंबईतील एक ऑटोरिक्षा चालक आपली रिक्षा चालवताना आपल्यातील संगीत प्रतिभाही दाखवत आहे. या ऑटोरिक्षा चालकाने आपल्या रिक्षालाच एक छोटासा 'म्युझिक स्टेज' बनवला आहे. मुंबईत वाहतूक कोंडी नित्याचेच आहे. या वाहतूक कोंडीत अडकल्यावर तो आपला गाणी गाण्याचा छंद जोपासतो. सुमधूर आवाजातील त्याचे गाणे आसपासच्या लोकांनाही मंत्रमुग्ध करते. वाहतूक कोंडीत आपला छंद जोपासण्याची त्याची ही आइडिया अनेकांना आवडली आहे.
हा व्हिडिओ मुंबईतील जुहूच्या रस्त्यावरचा आहे. या ऑटोरिक्षा चालकाने आपल्या ऑटोरिक्षात कराओके सिस्टीम लावली आहे. मुंबईत जेव्हा वाहतूक कोंडीत ऑटोरिक्षा थांबवलेली असते तेव्हा ऑटोरिक्षा चालक सरळ माइक हातात घेऊन गाणे गायला सुरुवात करतो. व्हिडिओमध्ये तो पांढरे कपडे घालून, हातात माइक घेऊन गाणे गाताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओत तो १९७९ मधील 'घर' चित्रपटातील 'फिर वही रात है' हे प्रसिद्ध गाणे गात आहे. त्याच्या आसपासचे लोकही मंत्रमुग्ध होऊन गाणे ऐकत आहे.
सत्यवान गीते असे या ऑटोरिक्षा चालकाचे नाव आहे. मनोज बाडकर नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला सात लांखांहून अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत. त्याच्या ऑटोरिक्षावर 'कराओके ऑटोरिक्षा' आणि 'सत्यवान गीते' सर्च करा असे लिहिले आहे. सत्यवान हे संगीतप्रेमी रिक्षाचालक आहेत आणि अमिताभ बच्चन यांनीही त्याच्या रिक्षेतून प्रवास केला आहे, असे बोलले जात आहे.
नेटकऱ्यांनी या ऑटोरिक्षा चालकाच्या कामाप्रती असलेल्या प्रेमाचे खूप कौतुक केले आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले, "काम आणि आवड यात balance कसा करायचा हे यांच्याकडून शिका." तर दुसऱ्याने म्हटले, "आपली आवड जपा आणि रिक्षा चालवा, कारण फक्त आवडीतून पैसे मिळत नाहीत, यांना अधिक शक्ती मिळो." या इंस्टाग्राम रीलला 70 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि ती प्रचंड व्हायरल झाली आहे.