नजरअंदाज करू नकात 'ही' लक्षणं असू शकतो किडनी कॅन्सर, जाणून घ्या आहार आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती

आजार पहिल्या टप्प्यात, लवकरात लवकर लक्षात आला तर रुग्ण पाच वर्षांपर्यंत जगू शकण्याचा दर ९३% आहे.
नजरअंदाज करू नकात 'ही' लक्षणं असू शकतो किडनी कॅन्सर, जाणून घ्या आहार आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती
Published on

किडनी कॅन्सर झाला आहे हे समजणे हा कोणाही व्यक्तीसाठी प्रचंड मोठा धक्का ठरू शकतो पण त्यातही दिलासादायक बाब अशी की, आजार पहिल्या टप्प्यात, लवकरात लवकर लक्षात आला तर रुग्ण पाच वर्षांपर्यंत जगू शकण्याचा दर ९३% आहे. लघवीमध्ये रक्त, कोणतीही दुखापत झालेली नसताना कमरेच्या खालच्या भागात वेदना होणे, गाठ होणे, थकवा वाढणे, भूक न लागणे, कोणतेही विशेष कारण नसताना वजन कमी होणे, संसर्ग झालेला नसताना सतत ताप येणे आणि ऍनिमिया ही लक्षणे दिसत असतील तर तातडीने डॉक्टरना दाखवा. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लक्षणे दिसून न येण्याची शक्यता असते, त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी चुकवू नका. नियमित आरोग्य तपासणीमध्ये किडन्या व ब्लॅडरचे अल्ट्रासाउंड केलेच पाहिजे, त्यामुळे लक्षणे दिसून न येणाऱ्या किडनी कॅन्सरचे देखील लवकरात लवकर निदान करण्यात मदत मिळते. याबद्दल अधिक जाणून घेऊयात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथील कन्सल्टन्ट आणि हेड, नेफ्रॉलॉजी, डॉ शरद शेठ यांच्याकडून...

कॅन्सरवरील उपचार आजार कोणत्या टप्प्यात पोहोचला आहे त्यावर अवलंबून असतात. त्यामध्ये सर्जरी, रेडिओफ्रिक्वेन्सी अब्लेशन, इम्युनोथेरपी आणि औषधांचा समावेश असू शकतो. त्याबरोबरीनेच आहार आणि जीवनशैलीमध्ये माहितीपूर्ण बदल घडवून आणल्यास तुमच्या एकंदरीत आरोग्यामध्ये सुधारणा होते, उपचारांना हातभार लागतो व आजारातून बरे व्हायला मदत होते.

आरोग्य चांगले राखण्यात आणि आजारातून बरे होण्यात आहाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. संतुलित आहारामध्ये विविध पोषकांचा समावेश असतो जी मजबुती आणि ऊर्जा कायम राखण्यात मदत करतात, रोगप्रतिकार शक्तीसाठी पूरक ठरतात व उपचारांचे साईड इफेक्ट होऊ देत नाहीत. आहार पोषक शाकाहारी असावा, त्यामध्ये फळे व कोशिंबिरींचा समावेश असावा. किडनीसाठी सौम्य ठरतील आणि एकंदरीत आरोग्य चांगले राखतील अशा खाद्यपदार्थांवर भर द्यावा. सोडियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचे प्रमाण खूप जास्त असलेले खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत. ही खनिजे फिल्टर करण्यात किडनीची भूमिका मोठी असते, त्यामुळे त्यांना खूप जास्त खाऊ नये. मिठाचे प्रमाण कमी केल्यास रक्तदाब नियंत्रणात राखण्यात मदत होते. किडनी कॅन्सर रुग्णांसाठी ही खूप मोठी चिंतेची बाब असते. मिठाच्या ऐवजी ताजे हर्ब्स आणि मसाले यांचा वापर केल्यास पदार्थाचा स्वाद वाढतो आणि आरोग्य देखील चांगले राहते.

पदार्थामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवल्यास पुढील गुंतागुंत टाळता येते. केळी, संत्री आणि बटाटे यासारख्या पदार्थांमध्ये पोटॅशियम खूप जास्त असते, ते प्रमाणात खावेत, प्रक्रिया केलेल्या किंवा रेडी-टू-ईट पदार्थांमध्ये सोडियम आणि फॉस्फरस जास्त असते, ते खाणे टाळावे. ताजी फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्ये, लीन प्रोटीन यांचा समावेश आहारामध्ये असला पाहिजे. या अन्नपदार्थांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे शरीराला कॅन्सरच्या विरोधात लढण्यात व उपचारांनंतर बरे होण्यात मदत मिळते. तळलेले, फॅटी अन्नपदार्थ, अल्कोहोल आणि तंबाखू यांचे सेवन अजिबात करू नये.

किडनी कॅन्सरवरील उपचारांमध्ये हायड्रेशन हा आणखी एक आवश्यक पैलू असतो. पुरेसे पाणी प्यायले जात असेल तर किडन्यांना टॉक्सिन्स बाहेर टाकण्यात आणि आपले कार्य नीट करण्यात मदत होते. किडनीची काही समस्या असल्यास व्यक्तीच्या गरजांनुसार द्रव पदार्थ तयार केले गेले पाहिजेत. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

जीवनशैलीमध्ये पूरक बदल घडवून आणल्यास किडनी कॅन्सर रुग्णांच्या एकंदरीत आरोग्यावर लक्षणीय प्रभाव पडतो. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नियमितपणे शारीरिक कसरत केल्यास शरीरातील ऊर्जा वाढते, मूड सुधारतो आणि एकंदरीत आरोग्य चांगले राहते. तुमची जीवनशैली खूप महत्त्वाची आहे, आठवड्यातून पाच दिवस दररोज कमीत कमी ३० मिनिटे जलद चालून, व्यायाम करून तुम्ही स्वतःचे वजन नियंत्रणात राखू शकता. चालणे, योग आणि स्ट्रेचिंग खूप फायदेशीर ठरते. व्यायामाचे प्रमाण सुरुवातीला कमी आणि हळूहळू वाढवत न्यावे, शरीर तुम्हाला जे सिग्नल्स देते त्याकडे लक्ष द्यावे. खूप जास्त व्यायाम करणे टाळावे. वजन वाढू देऊ नये.

दररोज आठ तास सलग शांत झोप घ्या. ताणतणावांचे व्यवस्थापन करणे देखील महत्त्वाचे आहे. आपल्याला कॅन्सर झाला आहे हे समजल्यावर होणारा भावनिक परिणाम भरपूर ताणतणाव व चिंतांना कारणीभूत ठरतो. कौन्सेलिंगच्या बरोबरीनेच ध्यानधारणा आणि दीर्घ श्वसनाच्या व्यायामांमुळे भावनिक आधार मिळतो आणि रुग्णांना नैराश्यातून बाहेर येण्यास मदत होते. छंद आणि आनंद व आराम देणाऱ्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा, मानसिक आरोग्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. कुटुंब आणि मित्रांचा भावनिक पाठिंबा उपचार प्रक्रियेला पूरक ठरतो आणि एकटेपणाचे दुःख हलके करतो.

रक्तदाब आणि शर्करा पातळी नियंत्रणात राहील याची पुरेपूर काळजी घ्या आणि फुलटाइम स्पेशालिस्ट सिस्टीम असणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरच्या मार्गदर्शनानुसार आहार व जीवनशैलीत बदल घडवून आणल्यास आरोग्य सुधारेल तसेच जीवनाची गुणवत्ता देखील उंचावेल. आजारातून बरे होण्यासाठीचा प्रवास खडतर असेल पण ही सकारात्मक पावले तुम्हाला चांगले क्लिनिकल परिणाम मिळवून देतील.

logo
marathi.freepressjournal.in