
कितीही पौष्टिक जेवण केले किंवा नियमितपणे जेवणाच्या वेळा पाळल्या तसेच चमचमीत आणि चटपटीत पदार्थ खाणे टाळले तरी देखील तुम्हाला पोटाच्या अनेक तक्रारी आहेतच? जेवणानंतर पोट जड पडणे, अपचन होणे, पोट ब्लोटिंग होणे, पोट फुगणे, परिणामी तुम्हाला सातत्याने औषधे खावी लागतात का? तुम्ही कधी यावर बारकाईने विचार केला आहे का, असे का होते? याचे कारण आहे पाणी पिण्याच्या चुकीच्या पद्धती. होय पाणी पिण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे झेलाव्या लागतात पोटाच्या अनेक तक्रारी. कारण पाणी पिण्याचे काही ठाराविक नियम आहेत. जाणून घ्या काय आहेत हे नियम...
पाणी कायम बसून पिणे
पाणी हे द्रव पदार्थ आहे. योगशास्त्र किंवा आयुर्वेदात याची सविस्तर माहिती दिली आहे. पाणी बसून पिल्याने पचनक्रिया व्यवस्थित होतात. परिणामी पोट फुगत नाही. तसेच हा नियम केवळ पाण्यापुरता नसून कोणताही द्रव पदार्थ बसून प्यायचा असतो. मात्र, हल्ली आपण ज्यूस किंवा चहा कॉफी स्टॉलवर जातो आणि तिथे उभे राहुनच या पदार्थांचे सेवन करतो. लक्षात घ्या द्रव पदार्थ कोणताही असो त्यात पाण्याचेच प्रमाण जास्त असते. मग तो पदार्थ जर तुम्ही उभे राहून पित असाल तर त्याचे आरोग्यावर आणि पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतात.
जेवणाआधी आणि जेवणानंतर ४० मिनिटे पाणी पिऊ नये
जेवणाआधी आणि जेवणानंतर किमान ४० मिनिटे पाणी पिऊ नये, असे योगशास्त्र सांगते. जेवणाच्या ४० मिनिटे आधी पाणी पिल्याने जेवणाच्या वेळेपर्यंत ते पाणी पचते. तसेच जेवणानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये. याचे अतिशय वाईट परिणाम पचनसंस्थेवर होतात. कारण जेवणानंतर ते अन्न पचण्यासाठी जठराग्नि पेटलेला असतो. परिणामी जेवणानंतर लगेचच पाणी पिल्यास हा जठराग्नि विझून जातो. परिणामी तुमचे अन्न पचत नाही. अन्न न पचल्याने मग पोटात गॅस होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून जेवणानंतर केवळ दोन घोट पाणी प्यावे. नंतर ४० मिनिटांनी आवश्यक तेवढे पाणी प्यावे.
एकदम गटागटा पाणी पिऊ नये
अनेक वेळा आपण एखाद्या ठिकाणाहून येतो आणि थेट गटागटा पाणी पितो. पाणी पिण्याची ही पद्धत अतिशय चुकीची आहे. पाणी पिताना कधीही एक एक घोट करून हळूहळू प्यावे. जेणेकरून तुमच्या तोंडात तयार होणारी लाळ जी पाचक असते ती पाण्यात मिसळून त्याचे पुढे अन्न पचनासाठी फायदे होतात.