
- स्टाईलवाईल
- पूजा सामंत
गुढीपाडव्यासारखा महत्त्वाचा सण आणि लग्नसराई. अशा वेळी कोणते दागिने घालायचे यासाठी विविध वयोगटातील स्त्रिया नेहमी वेगवेगळे आणि तरीही आकर्षक पर्याय शोधत असतात. सध्या ट्रेंड आहे तो टेम्पल ज्वेलरी किंवा डान्स ज्वेलरीचा. वेगवेगळ्या माध्यमांवर या दागिन्यांच्या जाहिराती दिसत असतात. अगदी तरुण मुलीही हौसेने या दागिन्यांची खरेदी करताना दिसतात.
टेम्पल ज्वेलरी किंवा डान्स ज्वेलरी हे मुळातले पारंपरिक दक्षिण भारतीय दागिने. मात्र हल्ली संपूर्ण देशभरच या दागिन्यांचा ट्रेंड सुरू आहे. विविध कार्यक्रमांमध्ये, लग्नांमध्ये टेम्पल ज्वेलरीचा ट्रेंड नव्याने पाहायला मिळत आहे. आज टेम्पल ज्वेलरी म्हणून ओळखले जाणारे दागिने मुळात देवदेवतांच्या अंगावर चढवले जात होते. त्यामुळेच यामध्ये मंदिरांवरच्या नक्षीकामाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. विशेषतः कांजिवरम अथवा पोचमपल्लीसारख्या दाक्षिणात्य पॅटर्नच्या साड्यांवर या दागिन्यांचा साज अगदी शोभून दिसतो. हे दागिने अगदी पूर्वीपासून नृत्यांगना जास्त प्रमाणात घालत होत्या. त्यामुळेच त्याला ‘डान्स ज्वेलरी’ असेही म्हटले जाते. तंजावर, चेन्नई, तमिळनाडू येथील मंदिरांमधील खांबांवर असलेली विविध शिल्प ही या दागिन्यांच्या नक्षीसाठीचे प्रेरणास्थान असल्याचे समजते. देवी-देवता, कमळ, मोर, त्रिशूल, डमरू, शिवलिंग अशा प्रकारची मोठी आणि ठसठशीत नक्षी या दागिन्यांवर दिसून येते आणि म्हणूनच हे दागिने पटकन डोळ्यात भरतात आणि अगदी लग्नांमध्येही उठून आणि शोभून दिसतात. यातल्या अनेक दागिन्यांमध्ये देवदेवतांच्या मूर्तींची डिझाईन असल्याने या दागिन्यांबाबत एक भावनिक ओलावाही आढळतो. अलंकार ठसठशीत तर दिसतातच, पण ते एकूण पेहरावाला एक वेगळेपणाही देतात. जणू, ‘बस्स! एक अलंकार ही काफी होता है’ असे काहीसे हे दागिने घातल्यावर होते. तुम्ही कितीही गर्दीत असलात तरी उठून दिसता.
या टेम्पल ज्वेलरीमध्ये विविध प्रकारचे नक्षीकाम केले जात असले तरीही यामध्ये सगळ्यात जास्त कमळामध्ये बसलेली लक्ष्मी दाखवणाऱ्या नक्षीचा हार सर्वाधिक प्रसिद्ध आहे. यामध्ये इतर नक्षीकामही विशेष कलाकुसरीचे असते. शिवाय हार, कर्णभूषण, कंठीहार, केशभूषण, नथ, वेणी, पायातील तोडे, जोडवी, कंबरपट्टा, बांगड्या, बाजूबंद, बिल्वर अशी अगदी केसांपासून ते पायापर्यंतची सर्व आभूषणं आपल्याला टेम्पल ज्वेलरीमध्ये दिसतात. या दागिन्यांमध्ये नववधू नखशिखांत नटली तर तिच्यावरची नजर हटत नाही, हे मान्य करावेच लागेल. गडद रंगाच्या साड्यांवर हे टेम्पल दागिने खूपच सुंदर दिसतात. इतकंच नाही, तर या दागिन्यांमध्ये स्त्रीचे रूप अधिक खुलून दिसते.
साधारणपणे या दागिन्यांमध्ये सोन्याचा वापर केला जातो. पण जर इमिटेशन ज्वेलरी असेल तर त्यावर सोन्याचा मुलामा चढवला जातो. तसंच यामध्ये प्रामुख्याने सोन्याचा वापर होत असला तरी त्यामध्ये हिरे, माणिक, मोती, पोवळे या खड्यांचा वापर करून त्यावर कलाकुसरही करण्यात येते. तुम्हाला हवं तसं डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता. अर्थातच ‘टेम्पल ज्वेलरी’ हा एकेकाळी महागडा असणारा सुवर्ण अलंकारांचा पर्याय आता ‘इमिटेशन ज्वेलरी’मध्ये देखील उपलब्ध आहे, ही एक समाधानाची बाब. कारण त्यामुळे प्रत्येकीलाच आपली टेम्पल ज्वेलरीची हौस भागवता येते.
सोन्याच्या दागिन्यांपेक्षा इमिटेशन ज्वेलरीमध्ये हवं तसं डिझाईन करून घेता येतं. इमिटेशन ज्वेलरीमध्ये मूळ साचा तांबे, चांदी आणि सोने असा मिश्रित असतो. या तांब्याच्या अथवा चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा चढवला जातो. थोडक्यात खिशाला परवडणाऱ्या दरात इमिटेशन ज्वेलरी मिळू शकते. त्यासाठी अमाप पैसा मोजण्याची गरज नाही. तसंच तुमची साडी कोणत्या पद्धतीची आहे त्याप्रमाणे तुम्ही या दागिन्यांची निवड करू शकता. मात्र तुम्ही यासाठी कांजिवरम, कांचीपुरम अथवा काही दाक्षिणात्य साड्यांची निवड केली तर नक्की तुमच्या दागिन्यांची शोभा अधिक वाढते.
गुढीपाडव्याच्या सणासाठी किंवा लग्नासाठी तुम्ही काही वेगळ्या लूकचा विचार करत असाल तर नक्कीच टेम्पल ज्वेलरीचा विचार करावा. नजाकत आणि फॅशन यांचा मिलाफ इथे होतो.
परंपरा मिरवणारी आभूषणं - इंद्रा जडवानी
गेली २७ वर्षे ज्वेलरी डिझायनिंग करणाऱ्या इंद्रा जडवानी यांना ज्वेलरीच्या आंतरराष्ट्रीय शोंमध्ये परीक्षक म्हणून जगभर आमंत्रित केले जाते. ‘डिझायनर ऑफ द ज्वेलरी’ हा प्रतिष्ठित पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. एक ट्रेंड सेटर ज्वेलरी डिझायनर म्हणूनही त्यांचे नाव गेली किमान २५वर्षे चर्चेत आहे. एकूणच भारतातील आणि जागतिक पातळीवरील अलंकारांचा अभ्यास असलेल्या इंद्रा ‘टेम्पल ज्वेलरी’बद्दल अधिक माहिती देताना काही वेगळे पैलू मांडतात. त्या सांगतात, “टेम्पल ज्वेलरी म्हणजे कलात्मक तरीही भरजरी असे सौंदर्यपूर्ण आभूषण. टेम्पल ज्वेलरी म्हणजे आपल्या भारतीय प्राचीन परंपरांचा वैभवशाली इतिहास. मंदिर, मूर्ती यांचा ठेवा. आपल्या श्रद्धांचा पिढ्यान् पिढ्या जपलेला वारसा... दागिन्यांच्या माध्यमातून जतन केलेला हा मंदिरांचा वारसा विशेषतः दक्षिण भारतात अतिशय आस्थेने जपला जातो. हा वारसा म्हणजेच टेम्पल ज्वेलरी!”
या ज्वेलरीचा इतिहास सांगताना इंद्रा जडवानी म्हणाल्या, “या अलंकारांची उत्पत्ती चोल-पांड्य या घराण्यांपासून झाली. पुढे या शोभिवंत आभूषणांचे अनुकरण इतरही अनेक राजवंशांमध्ये झाले. त्या काळातील आभूषण कारागीर समकाळातील भव्यदिव्य मंदिरे, मंदिरांचे वास्तुशिल्प, मंदिरातील मूर्ती यापासून प्रेरणा घेऊ लागले. असे अलंकार तेव्हापासून लोकांच्या धार्मिक भावना, आस्था, श्रद्धा यांचे प्रतीक झाले आहेत आणि तितकेच लोकप्रिय देखील ठरले आहेत. डोळे खिळून राहावेत असे हे अलंकार नंतर दक्षिण भारताची ओळख बनले.
अर्थात उत्तर भारतात देखील नववधूने हेवी ज्वेलरी वापरण्याची परंपरा आहे पण दक्षिण भारतात ‘टेम्पल ज्वेलरी’चा जो ट्रेंड आहे तशी परंपरा उत्तर भारतात नाही. अर्थात हौसेला मोल नसते. त्यामुळे विवाह समारंभात अलीकडे न्यू ट्रेंड म्हणून उत्तर भारतातील नववधू सुद्धा आवडीने ‘टेम्पल ज्वेलरी’ वापरू लागल्या आहेत. जसे पूर्वी नऊवारी साड्या वापरण्याची पद्धत होती, ती आपली परंपरा होती, कालांतराने ती अस्तंगत झाली आणि आता ६०-७० वर्षांनी पुन्हा या ट्रेंडचे पुनर्जीवन झाले आहे. तसंच काहीसं टेम्पल ज्वेलरीचं देखील झालं आहे.
मी एमराल्ड ज्वेलरीमध्ये जेव्हा प्रमुख होते तेव्हा दरमहा तीन टन सोन्यापैकी एक टन सोन्याची टेम्पल ज्वेलरी घडवली जात असे आणि ही किमान एक टन टेम्पल ज्वेलरी दक्षिण भारतासाठी राखीव असे. भारतातील प्राचीन आणि स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत आविष्कार असलेली बहुसंख्य प्राचीन मंदिरं ही दक्षिण भारतात आहेत. अशी मंदिरं, त्यातील मूर्ती ही आपली वैभवशाली परंपरा आहे, अशी येथील लोकांची धारणा आहे. ती त्यांनी दागिन्यांच्या माध्यमातून जपली आहे. म्हणूनच टेम्पल ज्वेलरी म्हणजे आपल्या परंपरेचा मान राखणे, आभूषणांद्वारे आपली परंपरा अभिमानाने मिरवणे.”