
- विशेष
- प्रवीण बांदेकर
भारतीय पातळीवर सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदीतील ज्येष्ठ कवी, कथाकार आणि कादंबरीकार असलेल्या विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आणि आजच्या काळातील एका महत्त्वाच्या लेखकाचा यथोचित सन्मान झाल्याच्या प्रतिक्रिया देशभरातून येऊ लागल्या. अठ्ठ्याएंशी वर्षे वयाच्या या साहित्यिकाला खरं तर या आधीच हा सन्मान मिळायला हवा होता, अशीही भावना अनेकांनी व्यक्त केली. एका अर्थी हे खरं असलं, तरी या पुरस्काराच्याही पलीकडे गेलेला हा लेखक आहे, हेही तितकंच खरं आहे. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर विचारल्या गेलेल्या पहिल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी असंच काहीसं सांगितलं आहे.
मी पाहिलेली, अनुभवलेली दुनिया अफाट आहे, पण या दुनियेपैकी फक्त काही हिस्साच मला लिहिता आला. ज्या वेगाने माझं वय पुढे धावतंय त्या वेगाने मला ही दुनिया माझ्या लेखणीतून कवेत घेता येत नाहीये याचं वाईट वाटतंय, असं ते म्हणतात. त्यांच्या या बोलण्यातील पराकोटीचा साधेपणा, निरागसता, प्रामाणिकपणा हीच त्यांच्या लेखनस्वभावाचीही वैशिष्ट्ये बनून गेलेली दिसून येतील. विनोद कुमार शुक्ल यांची कविता असो वा गद्य, त्यांच्या प्रत्येक लेखनकृतीमधून भाषेचा साधेपणा, रोजच्या व्यवहारातल्या त्या साध्यासुध्या भाषेतून निर्माण केलेली अर्थांची विविध वलये आणि त्यातून जाणवत राहणारा एक प्रकारचा तिरकसपणा, यांसारखी वैशिष्ट्ये आढळून येतात. दैनंदिन वास्तवाचे रूपांतर जादूई वास्तवात करण्याच्या त्यांच्या शैलीची भुरळ अनेक वाचकांना पडलेली दिसते.
वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून वावरलेल्या विनोद कुमार शुक्ल यांच्या कथा व कादंबऱ्यांमध्ये प्राध्यापकांच्या जीवनातील कौटुंबिक ताणतणाव जसे दिसून येतात, तसेच सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय आणि निम्नस्तरीय जगण्याचे चित्रणही बारकाव्यांसहित येते. हे चित्रण एकीकडे वास्तववादी आहे, आपल्या परिचयाचे आहे, असे वाचकाला वाटत असते. त्याचवेळी दुसरीकडे त्यात काहीतरी आपल्या नजरेतून सुटलेले असेही हा लेखक दाखवतो आहे, वरकरणी निरागस वाटणारे पण आतून अतिशय क्रूर, अमानुष असे काहीतरी ते आहे, असेही जाणवत राहते. लेखकाला सर्वसामान्य माणसांविषयी वाटणारी पराकोटीची करुणा आणि संवेदना एकीकडे आणि त्याचवेळी या माणसांच्या आतले विविध काटेरी कंगोरे दाखवताना हळूहळू आपल्यासमोर उलगडत जाणारं आपलंच विद्रूप अंतरंग दुसरीकडे, असं काहीतरी विलक्षण एकात एक मिसळून गेलेलं जग विनोदकुमार आपल्यासमोर उभं करतात. आपण जगत असलेल्या आणि आपल्याशी घट्टपणे निगडित असलेल्या परिचित जगाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहायला एका अर्थी हा लेखक आपल्या वाचकांना भाग पाडतो, असं म्हणता येईल. विनोद कुमार शुक्ल यांना लाभलेला हा ‘तिसरा डोळा’ फारच कमी लेखकांना लाभत असतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विनोद कुमार यांच्या काही कविता आणि अन्य काही गद्य लेखन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पडद्यावर आणण्याचे प्रयत्न काही जणांनी केले आहेत. त्यातूनही या लेखकाने आपल्या अनोख्या शैलीतून शोधलेली सामान्य माणसांच्या आतली निरागसता आणि क्रौर्य, निर्मळपण आणि बथ्थडपण, महत्त्वाकांक्षा आणि भयगंड अशा अनेक परस्परविरोधी गोष्टींपर्यंत एकाच वेळी पोहोचण्यात ते कसे यशस्वी झाले असावेत, हे पाहणे गमतीचे ठरावे. वास्तव आणि कल्पना यांच्या अनोख्या मिश्रणातून शब्दांच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमधून निर्माण होणाऱ्या जादूमधून त्यांनी घडवलेली चित्रे ही प्रत्येक वाचकासाठी स्वतंत्र आणि निराळी असू शकतात. त्यामुळेच त्यांचे माध्यमांतर ही निश्चितच पराकोटीची सत्वपरीक्षा पाहणारी गोष्ट ठरू शकते.
‘नौकर की कमीज’ (१९७९) या त्यांच्या पहिल्या कादंबरीमुळे वेगळ्या शैलीचे प्रयोगशील लेखक म्हणून विनोद कुमार शुक्ल यांचा विशेष बोलबाला झाला असला तरी त्या आधीपासूनच त्यांच्या वेगळ्या वळणाच्या कवितेमुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली होती. ‘लगभग जयहिंद’ (१९७१) हा त्यांचा पहिला कविता संग्रह. समशेर बहादुर हे हिंदीतील एक महत्त्वाचे प्रयोगशील कवी मानले जातात. त्यांच्यानंतरचा शैली, रचनातंत्र व आशय यांच्या संदर्भात अनोखे प्रयोग करणारा कवी म्हणून विनोद कुमार शुक्ल यांना हिंदी साहित्य जगतात ओळखले जात होते. त्यांनी कथालेखनातूनही आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळे रघुवीर सहाय, कुंवर नारायण, श्रीकांत वर्मा यांच्या परंपरेतील महत्त्वाचा कथाकार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते.
विनोद कुमार यांच्या कादंबऱ्यांविषयी मात्र हिंदी साहित्यात दोन टोकाची मते पाहायला मिळतात. त्यांच्या अनोख्या शैलीतंत्रामुळे हिंदीतच नव्हे, तर भारतीय कादंबरीमध्ये वेगळ्या ठरणाऱ्या त्यांच्या कादंबऱ्यांवर काही टीकाकारांनी बौद्धिकताग्रस्त कादंबऱ्या असा शिक्का मारलेला दिसतो. वास्तविक, काफ्का, सार्त्र, काम्यु किंवा जेम्स जॉईस यांसारख्या पाश्चात्य लेखकांच्या बौद्धिक गुंतागुंतीच्या क्लिष्ट व सर्वसामान्य वाचकांना काहीशा क्लिष्ट वाटणाऱ्या कादंबऱ्यांप्रमाणे विनोदकुमार यांच्या कादंबऱ्यांचा आशय वा शैली असल्याचे अजिबात दिसत नाही. उलट या कादंबऱ्या सर्वसामान्यांच्या भाषेत, सामान्य माणसाच्या जगण्यातले तपशील सांगताना संपूर्णतः भारतीय परिप्रेक्ष्यात राहून काहीतरी असामान्य शोधण्याचा प्रयत्न करतात. हे जे असामान्य काहीतरी आहे, ते विनोद कुमार शुक्ल यांच्या वास्तवाकडे पाहण्याच्या स्वतंत्र दृष्टीमध्ये आहे. त्यांच्या लेखनाचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की, कसलाही आव न आणता ते आपल्याच आसपासच्या माणसांच्या गोष्टी सांगत जातात. त्याच गोष्टींची कधी कविता होते, कधी कथा, तर कधी कादंबरी. माणसांच्या जगण्याच्या मुळाशी असलेलं दुःख, त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी त्याची स्वप्नं पाहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती, त्या स्वप्नांना चिकटून येणारं क्रूर वास्तव असं सगळंच त्यांच्या लेखनात सामावलं जातं. त्यांच्या कादंबरीत सतत कविता दिसत राहते, तसंच त्यांच्या कवितेतूनही गोष्ट ऐकू येत राहते. कविता किंवा गोष्ट सांगणारा त्यांचा निवेदक मात्र खुद्द लेखक विनोद कुमार शुक्ल यांच्यासारखाच संवेदनशील वृत्तीचा, निरागसपणे जगाकडे पाहणारा, निसर्ग, झाडंपेडं, किडामुंगीसहित सगळ्या प्रकारच्या माणसांचं जगणं समजावून घेण्याची आस असलेला, असा जाणवत राहतो.
कल्पित आणि वास्तव यांच्या सरमिसळीमध्ये वावरणाऱ्या त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये असंख्य अशा जागा सापडतात, ज्या वाचताना वाचक चकित होत जातात. लेखक रोजचंच काही माहीत असलेलं सांगता-सांगता आपल्याला कुठेतरी अद्भुत जागी घेऊन जातोय, स्वप्नासारखं काहीतरी दाखवू पाहतोय, आपण त्याच्या मागून जाताना स्वतःपासून-वास्तवापासून दूर कुठेतरी चाललोय, असं वाटत राहातं.
‘दिवार में एक खिडकी रहती थी’ या त्यांच्या बहुचर्चित कादंबरीला साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. ही कादंबरी रघुवर प्रसाद नावाच्या एका प्राध्यापकाची गोष्ट सांगू पाहते. आपल्या पत्नीसह तो एका शहरात राहतो आहे. सगळ्या अभाव, संघर्ष, दैनंदिन कटकटी यांसह विनातक्रार आनंदाने संसार करतो आहे. हे सगळं वाचकांना परिचित असलेलं, सहजपणे स्वीकारता येईल असं आहे. पण प्राध्यापक रघुवर प्रसाद ज्या घरात राहतो आहे, त्या घराला असलेल्या आणि ज्यातून आत-बाहेर जाता येईल अशा एका खिडकीविषयी लेखक बोलू लागतो आणि बघता बघता वाचकाच्या नकळत त्यांना चकवून रोजच्या सवयीच्या परिचित वास्तवातून जादूई वास्तवाच्या जगात घेऊन जातो. खिडकीपलीकडचं जग एखाद्या स्वप्नासारखं असतं. तिथे सदाबहार निसर्ग, पहाड, नदी, किलबिलाट करणारे पक्षी, तलाव, कमळं असं सगळं आहे. रघुवर आणि त्याची पत्नी या जगात वावरतात, त्यांच्यासोबत वाचकही जणू त्या स्वप्नमय जगात भटकत राहतो. रोज एखाद्या वाहनाने कॉलेजला ये-जा करणाऱ्या रघुवरला एके दिवशी वाहन मिळत नाही, तेव्हा एक साधू त्याच्या हत्तीवरून त्याला कॉलेजात पोहोचवतो. पुढे हा सिलसिला कायमच सुरू होतो. या अशा म्हटल्या तर सहजशक्य वाटणाऱ्या घटनांतून वाचकांना चकवा देण्यात आणि लपाछपीच्या खेळासारखी गंमत त्यातून साधण्यामध्ये विनोद कुमार यशस्वी होतात. एकूणच, विसंगतींनी भरलेल्या मध्यमवर्गाच्या जगण्याचं चित्रण आपल्या तीनही कादंबऱ्यांमधून त्यांनी केले आहे. विष्णू खरे म्हणतात तसं, शहरी कनिष्ठ मध्यमवर्गाच्या आत्म्यात विनोद कुमार शुक्ल यांनी जसा प्रवेश केला आहे तसा बांधिलकी मानणारे कुणीही अन्य हिंदी लेखक करू शकले नाहीत, हे मान्य करावं लागतं.
मानवता, सहानुभूती, संवेदनशीलता, कारुण्य यांसह वस्तुनिष्ठ कलात्मक दृष्टी विनोद कुमार यांच्या एकूणच लेखनातून दिसून येते. मानसिक भयगंडांनी ग्रासलेल्या भारतीय समाजाची नाडी अचूक ओळखून सगळ्या कुरूपता व क्रौर्यासहित मानवी जगणे मांडताना भाषेची निरागसता जपत विनोद कुमार शुक्ल यांनी त्यांच्या लेखनातून उभे केलेले विश्व हा भारतीय साहित्यातील एक अनमोल ठेवा आहे. विनोद कुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आल्याने या सन्मानाची उंची निश्चितच वाढली आहे.
साहित्यिक व मराठी भाषेचे अभ्यासक
pravinbandekar1969@gmail.com