‘मोडी’चा अभिजात ठेवा

मोडी लिपी ही १३व्या शतकापासून ते २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनासाठी वापरली जाणारी मुख्य लिपी होती. मात्र मुद्रणाच्या अडचणी आणि फाऊंटन पेनच्या उदयामुळे मोडी लिपीचा वापर कमी झाला. तरीसुद्धा तिच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे तिचं संरक्षण, संशोधन आणि पुनरुज्जीवन आज अत्यावश्यक बनलं आहे.
‘मोडी’चा अभिजात ठेवा
नवशक्ति अक्षररंग
Published on

- पाऊलखुणा

मोडी लिपी ही १३व्या शतकापासून ते २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनासाठी वापरली जाणारी मुख्य लिपी होती. मात्र मुद्रणाच्या अडचणी आणि फाऊंटन पेनच्या उदयामुळे मोडी लिपीचा वापर कमी झाला. तरीसुद्धा तिच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे तिचं संरक्षण, संशोधन आणि पुनरुज्जीवन आज अत्यावश्यक बनलं आहे.

महादेव यादव व रामदेवराय यादव यांच्या कारकीर्दीत १२६० ते १३०९ या कालखंडात मोडी लिपी विकसित केली गेली, असं मानलं जातं. या लिपीचा खरा बहर पेशवाईच्या काळात पाहायला मिळतो. पेशव्यांच्या दस्तऐवजांवरून तिच्या प्रगतीचा मागोवा घेता येतो. या लिपीची वैशिष्ट्यं म्हणजे टापटीप अक्षरं, ओळीतील समांतर अंतर, लपेटदार लेखन आणि शुद्धलेखन. शिवाजी महाराजांपासून ते उत्तर पेशवाईपर्यंतच्या काळातील मोडी लिखाणाच्या आधारे मराठी भाषेतील बदल आणि तिच्या वाटचालीचा अभ्यास करता येतो.

मोडी लिपीच्या मुळासंबंधी अनेक मतप्रवाह आहेत. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि डॉ. भांडारकर यांचं मत आहे की, यादवांचा मंत्री हेमाडपंताने ती श्रीलंकेतून आणली, तर चांदोरकर यांच्या मते ती मौर्यकालीन ब्राह्मी लिपीचं पुढचं रूप आहे. वाकणकर आणि वालावलकर यांचा विश्वास आहे की, ही ब्राह्मी लिपीचीच एक शाखा आहे, परंतु हात न उचलता लिहिता येणाऱ्या गुणधर्मामुळे ती इतर लिपींप्रमाणे दिसत नाही. मोडी श्रीलंकेहून आली हे मत किंवा मौर्यी लिपीवरून ती घडली, असे मत हे वाकणकर आणि वालावलकर मान्य करत नाहीत. मोडी लिपी सुमारे ९०० वर्षांपासून महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. उपलब्ध असलेला सर्वात जुना मोडी दस्तऐवज इ.स. ११८९ मधील असून, तो भारत इतिहास संशोधक मंडळाकडे जतन केलेला आहे. ही लिपी १९५० पर्यंत काही प्रमाणात वापरली जात होती. मात्र या दोन-तीन शतकांत तिच्यात बरेच बदल झाले आहेत.

राजवाडे यांच्या मते, ज्ञानेश्वरी रचली जात असताना मोडी लिपीची संकल्पना महाराष्ट्रात प्रचलित होत होती. याच दरम्यान भारतात पहिले मुस्लीम आक्रमण झाले. लेखनासाठी कागदाचा वापर भारतात मुस्लिमांमुळे झाला, असेही मानले जाते, कारण ‘कागद’ हा शब्द फार्सी आहे आणि त्यासाठी संस्कृतमध्ये पर्यायी शब्द नाही. ज्ञानेश्वरीतील काही ओव्यांचा उल्लेख करून राजवाडे आपले मत स्पष्ट करतात.

मराठा साम्राज्याच्या स्थापनेनंतर या लिपीला नवे स्थान प्राप्त झाले. मराठ्यांनी मराठीला केवळ भाषेपुरती मर्यादित न ठेवता ती सत्तेची आणि संस्कृतीची भाषा मानली. मोडी लिपीचा वापर कारभार आणि वैयक्तिक पत्रव्यवहारात सर्रास होत होता. त्यामुळेच महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही या लिपीचा प्रसार झाला. मराठे ज्या भागात गेले त्या ­ठिकाणी त्यांनी मोडीचा वापर केला. म्हणूनच आज दिल्लीपासून तंजावरपर्यंत मोडी लिपीतील कागदपत्रे अनेक पुराभिलेखागारांत सापडतात. महाराष्ट्राबाहेरही या लिपीला ‘मुडिया’, ‘वाणियावटी’, ‘मुंडीमुंडी’, ‘रजवाडी’ अशी नावे दिली गेली आहेत. विविध ठिकाणच्या खासगी संग्रहातही मोठ्या प्रमाणावर मोडी दस्तऐवज सापडतात. परदेशातील काही अभिलेखागारांमध्ये देखील मोडीतील पत्रांचा संग्रह आहे. या लिपीतील दस्तऐवज वाचताना त्या काळातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती समजण्यास मदत होते.

मुद्रणकलेची माहिती शिवाजी महाराजांच्या काळात होती, तरी मोडी लिपीमधून छपाई करणे फार कठीण होतं. चार्ल्स विल्किन्स यांनी इ.स. १७०७ मध्ये मोडीसाठी धातूचे अक्षरसंच तयार केले होते. नंतर, १८०५ मध्ये पं. वैजनाथ यांच्या मदतीने विल्यम कॅरे यांनी प. बंगालमधील श्रीरामपूर येथे मोडी मुद्रणाचे तंत्र विकसित करून ‘अ डिक्शनरी ऑफ द मराठा लँग्वेज’ हा शब्दकोश प्रकाशित केला. काही इतर पुस्तकंही त्यांनी मोडी लिपीत छापली. १८०२ मध्ये ‘बॉम्बे कुरियर’ या इंग्रजी वृत्तपत्रात पहिल्यांदाच मोडी लिपीत जाहिराती प्रसिद्ध झाल्या. इ.स. १९०५ मध्ये ‘खबरदार’ नावाचे मोडीतील वृत्तपत्र बेळगावहून प्रकाशित झाले. १९व्या शतकात मोडी वाचनमालेची पाठ्यपुस्तके देखील प्रकाशित झाली. मात्र १८व्या आणि १९व्या शतकांतील राजकीय बदलांमुळे देवनागरीला अधिक महत्त्व प्राप्त झालं.

मोडीची छपाई किचकट असल्यामुळे तिचा वापर कमी झाला आणि देवनागरी सार्वत्रिक बनली. ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकुनांनी देवनागरी वापरणे सक्तीचे केले. इंग्रज सत्तेच्या अखेरीस फाऊंटन पेनचा प्रसार झाला. पूर्वी बोरूने लिहिताना अक्षरांना जाडी-रुंदी येत असे, परंतु फाऊंटन पेनमुळे ती शक्यता राहिली नाही आणि मोडी अधिक गुंतागुंतीची वाटू लागली. मात्र फाऊंटन पेनमध्ये शाई जास्त काळ टिकत असल्याने सध्याचे मोडी लेखक कॅलिग्राफी निब्स वापरून जुने सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करतात.

मोडी ही देवनागरीची जलद लिपी आहे. शब्द लिहिताना लेखणी न उचलता लिहिता येतं, कारण मोडीत देवनागरीप्रमाणे शब्द तोडावे लागत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळातील बहुतेक व्यवहार आणि दस्तऐवज मोडीतच होते. त्यामुळे मोडीत खूप ऐतिहासिक माहिती दडलेली आहे. आजही महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, चेन्नई, तमिळनाडू, केरळ आदी भागात कोट्यवधी मोडीतील दस्तऐवज विविध सरकारी व खासगी दप्तरांमध्ये आहेत. अनेक घरांत परंपरेने आलेले ताम्रपट, पत्रे जतन केलेली आहेत. मोडी लिहू आणि वाचू शकणाऱ्यांना एकत्र आणून, या इतिहासाचा प्रसार करणे, लिपीचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज आहे.

rakeshvijaymore@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in