आजची दुर्गा : कठीण परिस्थितीवर जिद्दीने मात; बालगृहाबाहेर पडलेल्या मुलांची बनली आधारस्तंभ

मौसमीची कहाणी ही फक्त दुःखातून बाहेर पडण्याची नाही, तर संकटांवर मात करून समाजासाठी काहीतरी घडवण्याची आहे. तिच्या जिद्दीने ती स्वतः उभी राहिलीच, पण तिच्यासारख्या आसाममधील असंख्य मुलांसाठी ती आधारस्तंभ ठरली आहे.
आजची दुर्गा : कठीण परिस्थितीवर जिद्दीने मात; बालगृहाबाहेर पडलेल्या मुलांची बनली आधारस्तंभ
Published on

आजची दुर्गा : मौसमी दास

गायत्री पाठक-पटवर्धन/पुणे

मौसमीची कहाणी ही फक्त दुःखातून बाहेर पडण्याची नाही, तर संकटांवर मात करून समाजासाठी काहीतरी घडवण्याची आहे. तिच्या जिद्दीने ती स्वतः उभी राहिलीच, पण तिच्यासारख्या आसाममधील असंख्य मुलांसाठी ती आधारस्तंभ ठरली आहे.

आसाममध्ये जन्मलेली मौसमी दास ही आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. तिचे बालपण मात्र अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. जन्मत:च आईचा मृत्यू झाला आणि पाचव्या वर्षी अपघातात वडिलांचा मृत्यू झाला. एवढ्या लहान वयात ती पूर्णपणे अनाथ झाली.

एका जवळच राहणाऱ्या डॉक्टरांनी तिची परिस्थिती पाहून तिला आसाम येथील बालगृहात दाखल केले. पण तिथे गेल्यावर मौसमी प्रथम खूप घाबरली होती. तिला एकटेपण जाणवत होते आणि घरच्या प्रेमाची ओढ सतावत होती. मात्र, अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आणि सोबत राहणाऱ्या मैत्रिणींशी संवाद साधत तिने आपले एकटेपण दूर सारले. यामुळे तिचे आयुष्य हळूहळू बदलत गेले. मौसमीला लेखनाची, कविता करण्याची खूप आवड आहे. तिचे विविध विषयांवरील लेख आसाममधील काही मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले.

१८ वर्षे पूर्ण झाल्यावर मौसमीला संस्थेतून बाहेर पडावे लागले. संस्थेबाहेर आल्यावर तिच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. कॉलेजमध्ये प्रवेश घेणे, कागदपत्रे तयार करणे, त्यातच रोजच्या जगण्याचा संघर्ष यातून तिला जावे लागले. कोविड काळात तर परिस्थिती आणखी बिकट झाली. तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आणि तिला नैराश्याने ग्रासले, पण ती त्यातूनही सावरली. मौसमीला लहानपणापासून भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये रुची होती. संस्थेत असतानाही तिने थोडे प्रशिक्षण घेतले होते. मौसमीने ‘कथ्थक’ या विषयामध्ये पदव्युत्तर डिप्लोमा केला. पुढे तिला याच विषयात मास्टर पदवी मिळवायची होती, पण आर्थिक कारणामुळे तिला ही पदवी घेता आली नाही. कोविडमध्ये तिची नोकरीही सुटली होती. त्यामुळे तिची एकूणच आर्थिक कुचंबणा होऊ लागली. तिने स्वतःच्या संस्थेतील काही देणगीदारांना सांगून याकाळात ‘मेकअप आर्टिस्ट’चा सहा महिन्याचा कोर्स पूर्ण केला. त्या जोरावर मौसमीचे पदवी शिक्षण झाल्यावर तिला आसाममधील एका न्यूज चॅनलमध्ये ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम मिळाले. हे काम करीत असताना तिच्यातील लेखनाचे सुप्त गुण जागे झाले. ती तेथील बारकावे समजून घेऊन बातमी लिहिणे, ‘व्हॉइस ओव्हर’चा मजकूर लिहिणे, अँकरसाठीची बाकीची व्यवस्था लावणे हे ती तेथे बघून शिकत होती. इथेच तिला १८ वर्षानंतर संस्थेतून बाहेर पडलेल्या समुदायाबद्दल माहिती मिळाली.

आपल्याप्रमाणेच संस्थेत वाढलेली व नंतर बाहेर पडलेली बरीच मुले-मुली असाच संघर्ष करताहेत, शिक्षणासाठी आणि रोजच्या जगण्यासाठी अमाप मेहनत घेत आहेत हे तिला दिसून आले. ही मुले भेटल्यामुळे तिला एक नवीन कुटुंब मिळाल्यासारखे झाले. त्यातील काही जवळच्या मित्रमैत्रिणी मिळून त्यांनी 'आसाम केअर लीव्हर्स असोसिएशन' स्थापन केली आणि मौसमी त्याची पहिली अध्यक्षा ठरली.

यानंतर मौसमीला ‘युनिसेफ’ आणि ‘उद्यान केअर’ संस्थेच्या लिफ्ट फेलोशिपमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाने तिला नेतृत्व, टीमवर्क आणि आत्मविश्वास शिकवला. नंतर ती ‘उदयन केअर’ आणि ‘एड ॲट ॲक्शन’ या नामांकित संस्थांमध्ये वरिष्ठ पदांवर काम करू लागली.

'क्लॅन' संस्थेच्या 'सीईओ'पदी कार्यरत

सध्या मौसमी आसाममधील 'क्लॅन' या संस्थेची 'सीईओ' असून आसाममधील बालगृहातून बाहेर पडलेल्या मुलांसाठी आजही संघटितपणे काम करण्यासाठी ती अविरत झटत आहे.

logo
marathi.freepressjournal.in