Muscle cramps : स्नायू पेटके येणे म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि उपाय

रात्री गाढ झोपलेले असता आणि अचानकच तुमच्या पायाच्या पंजांचे स्नायू किंवा पायाच्या पोटऱ्यांचे स्नायू एका बाजूने वळून (वाकडा होणे) तुम्हाला वेदना होतात आणि झोप मोड होते का? तसेच झोपेतून उठताना किंवा खूप वेळ बसल्यानंतर उठताना देखील, अशा प्रकारे अचानक हात किंवा पायाच्या स्नायुंना त्रास होतो का? असा त्रास होत असेल तर त्याला स्नायू पेटके किंवा स्नायू उबळ येणे (Muscle cramps), असे म्हणतात.
Muscle cramps : स्नायू पेटके येणे म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि उपाय
Meta Ai Generated Image
Published on

तुम्ही दिवसभराचे काम करून रात्री गाढ झोपलेले असता आणि अचानकच तुमच्या पायाच्या पंजांचे स्नायू किंवा पायाच्या पोटऱ्यांचे स्नायू एका बाजूने वळून (वाकडा होणे) तुम्हाला वेदना होतात आणि झोप मोड होते का? तसेच झोपेतून उठताना किंवा खूप वेळ बसल्यानंतर उठताना देखील, अशा प्रकारे अचानक हात किंवा पायाच्या स्नायुंना त्रास होतो का? असा त्रास होत असेल तर त्याला स्नायू पेटके किंवा स्नायू उबळ येणे (Muscle cramps), असे म्हणतात. शास्त्रीय भाषेत याला स्नायुंचे अचानक आणि अनैच्छिकपणे झालेले आकुंचन, असे म्हटले जाते. जाणून घेऊया स्नायू पेटके का येतात.

काय आहेत स्नायू पेटके येण्याची कारणे?

स्नायू पेटके येण्याची कारणे विविध असू शकतात. कोणत्या एक दोन कारणामुळे पेटके येतात, असे सांगता येत नाही. मात्र काही प्रमुख कारणे अशी,

इलेक्ट्रोलाइट असंतुलन

इलेक्ट्रोलाइट असंतुलन झाल्यामुळे स्नायू अनैच्छिकपणे आकुंचन पावतात. इलेक्ट्रोलाइट असंतुलनाची कारणे प्रत्येक वेळी वेगवेगळी असू शकतात. सामान्यपणे द्रवपदार्थांची पातळी कमी होणे हे कारण मानले जाते. तर कधी कधी काही औषधांमुळे देखील असे होऊ शकते. इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडल्याने स्नायू अचानकपणे आकुंचन होतात. म्हणजेच कुठल्यातरी एकाच बाजूने आकसतात.

स्नायूंचा अतिवापर

सामान्यपणे स्नायूंच्या अतिवापरामुळे देखील असे पेटके येतात. उदाहणार्थ खूप जास्त व्यायामकरणे किंवा काबाड कष्टाची कामे केल्याने देखील मोठ्या प्रमाणात शारीरिक हालचाली होतात.

रक्तप्रवाह कमी होणे

खराब रक्ताभिसरण किंवा स्नायूंमध्ये रक्त प्रवाह कमी झाल्याने पेटके उत्पन्न होऊ शकतात.

पोषक तत्तवांची कमतरता

शरीरात पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम यांसारख्या खनिजांची पातळी कमी झाली तर स्नायूंमध्ये अशा प्रकारचे पेटके येऊ शकतात.

मधुमेहासारखे विकार

मधुमेह, किडनी तसेच मज्जासंस्थेच्या विकारांमुळे देखील स्नायू पेटके येण्याचा धोका वाढतो.

रात्रीच्या वेळी स्नायू पेटके का येतात?

रात्री झोपेत असताना किंवा झोपण्याच्या वेळी बेडवर फक्त पडलेले असता, अशा वेळी अनेकदा स्नायू पेटके येतात. याची प्रमुख दोन कारणे तज्ज्ञ सांगतात. स्नायुंचा थकवा आणि निर्जलीकरण ही दोन प्रमुख कारणे आहेत. याशिवाय इलेक्ट्रोलाइटचे असंतुलन हे कारण देखील आहे.

रात्रीच्या वेळी स्नायू पेटके येऊ नये यासाठी खालील सोपे उपाय करू शकता

  • हायड्रेटेड राहणे तसेच योग्य तो ताण राखणे.

  • झोपण्यापूर्वी पायांना मसाज करणे, हळुवार स्ट्रेचिंग करणे, उष्ण किंवा थंड पॅक लावता येईल.

  • तुम्हाला जर अचानकपणे पेटके आले असतील तर ते सोडवण्यासाठी एकदम हळूवारपणे ताणून योग्य त्या पोझिशनमध्ये घेऊन या.

  • उबदार क्रॉम्प्रेस किंवा हीटिंग पॅड लावा किंवा शेक घेऊ शकता. पाय सूजले असतील तर त्यावर बर्फ वापरा.

  • शरीराला कायम हायड्रेट ठेवा. यासाठी योग्य मात्रेत पाणी प्या.

  • रक्तप्रवाह वाढवण्यासाठी स्नायुंना हळुवारपणे मसाज करा.

  • पोटॅशिअम-मॅग्नेशिअम यांची शरीरातील पातळी योग्य राखण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने संबंधित आहार घ्या. सामान्यपणे पालकची भाजी आणि बदाम हे यात उपयुक्त ठरू शकतात.

  • एप्सम सॉल्ट हे स्नायूंना आराम देणारे मीठ आहे. हे मीठ गरम पाण्यात घालून आंघोळ केल्याने स्नायूंचा थकवा नाहीसा होतो.

वारंवार स्नायू पेटके येत असल्यास तसेच वेदनेची पातळी जास्त असल्यास ही गंभीर बाब ठरू शकते. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे दाखवणे आवश्यक आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

logo
marathi.freepressjournal.in