National Centre for the Performing Arts: नाट्य रसिकांसाठी यंदाच्या उन्हाळ्यात दिनांक १७ मे ते १९ मे २०२४ एनसीपीए वार्षिक मराठी नाट्य उत्सव 'प्रतिबिंब' आयोजित करण्यात आला आहे. ह्या उत्सवाचा मुख्य उद्देश मराठी प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याचा असल्याने तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात नाटकं, अभिवाचन, कार्यशाळा आणि थिएटर टूर अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
या नाट्य उत्सवाची सुरुवात 'पत्रा पत्री’ या अभिवाचन - दृक-आविष्काराने होणार असून हे दोन मित्रांमधील बदलत्या काळाच्या विविध समस्यांवरील हस्तलिखित पत्रांचे अभिवाचनाचा विजय केंकरे आणि दिलीप प्रभावळकर करणार आहेत. या विनोदी अभिवाचनाच्या अगदी उलट, ‘ग्रेस’ या टोपण नावाने सुपरिचित असलेल्या माणिक सीताराम गोडघाटे यांच्या काव्यकृतींवर आधारित एक संगीतमय नाट्यवाचन, ‘कवी जातो तेंव्हा’ हे ही सादर होईल.
ज्यांना विविध कला शिकण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी दोन कार्यशाळा देखील आयोजित केल्या आहेत - प्रसिद्ध अभिनेते प्रियदर्शन जाधव - अभिनयाची मूलभूत तत्वे या विषयावर तर प्रख्यात कलादिग्दर्शक मच्छिंद्र शिंदे - नेपथ्य आणि आर्ट डायरेक्शन या विषयावर कार्यशाळा घेतील.
एनसीपीएचे रंगभूमी आणि सिनेमा विभाग प्रमुख, ब्रूस गथ्री म्हणाले, "एनसीपीए प्रतिबिंब’ उपक्रमाचा मुख्य उद्देश मराठी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करत नवोदित कलकारांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या अभिव्यक्तीसाठी एक उत्तम माध्यम उपलब्ध करुन देणे आहे.
प्रेक्षकांना यंदाच्या प्रतिबिंब नाट्य उत्सवात व्यावसायिक आणि प्रायोगिक मराठी नाटकं बघता तर येईलच पण त्याच बरोबर किमान तीन नाटकाचे प्रीमियर या उत्सवाचा भाग आहे, त्याचबरोबर मनोरंजक अभिवाचनाचा ही आनंद घेता येईल. विविध विषयांचे आकलन करण्याच्या दृष्टीने दोन कार्यशाळा आयोजित केल्या गेलेल्या आहेत . या उत्सवात मराठी रंगभूमीच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांचा अभिमान असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकासाठी प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी आहे. आमच्या बऱ्याचशा सादरीकरणाना इंग्रजी सबटायटलस असल्यामुळे अनेक अमराठी प्रेक्षकांना ही दर्जेदार मराठी नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे. सर्व रसिकांना ह्या उत्सवात सहभागी होऊन, 'प्रतिबिंब'च्या रंगीबेरंगी पैलुंचा अनुभव घेण्यासाठी मी निमंत्रित करतो.”
प्रेम आणि नाती हे नेहेमीच रंगभूमी चा अविभाज्या घटक राहिले आहेत आणि मराठी रंगभूमीवर तर हलक्या-फुलक्या विनोदी प्रेमकथांपासून ते मार्मिक शोकांतिकेपर्यंत विविध स्वरुपात ह्या भावनांना अनुभवता येते. या वर्षी प्रतिबिंब दोन रंजक प्रेमकथा सादर केल्या जाणार आहेत. मानवी वर्तन आणि नातेसंबंधांची गुंतागुंत - प्रसिद्ध नाटककार इरावती कर्णिक यांचे नाटक 'जर-तरची गोष्ट' प्रेक्षकांना पहाता येणार आहे. त्याच बरोबर प्रेमाची निराळी बाजू दर्शवणारे निरंजन पेडणेकर यांचे 'लव्ह इज हानिकारक' हे नाटक
एनसीपीए’च्या प्रतिष्ठित ‘दर्पण’ नाट्यलेखन स्पर्धेचे योगेश्वर बेंद्रे लिखित विजेते नाटक ‘गोळकोंडा डायमंड्स’ या नाटकाच्या कथानकात एक रेल्वे प्रवासात भेटलेल्या दोन परस्परविरोधी सहयात्री, एक कलावंत आणि एक आयटी प्रोफेशनल, यांच्या नैतिक संघर्षांचे चित्रण घडते. गेल्या वर्षीच्या, ‘कलगीतुरा’ या पुरस्कार विजेत्या नाटकाचे लेखक दत्ता पाटील यांनी ‘दगड आणि माती’ या नाटकाद्वारे ग्रामीण भागातील तरुणांची मनस्थिती आणि तिथल्या शेती करणाऱ्या तरुणांना भेडसावणाऱ्या अनिश्चिततेची गाथा व्यक्त केली आहे. स्वप्नील जाधव लिखित आणि दिग्दर्शित ‘अस्तित्व’ हे भरत जाधव यांनी आपल्या अभिनयाने गाजवलेलं नाटकही या उत्सवाचा भाग आहे त्याचबरोबर अतिशय प्रतिभावंत मोहित टाकळकर यांनी दिग्दर्शित केलेला अनेक पुरस्कार विजेत नाटकं ‘घंटा घंटा घंटा घंटा घंटा’ हे हि या उत्सवात प्रेक्षकांना पाहता येईल.
महोत्सवाच्या संचालिका, राजेश्री शिंदे यांनी सांगितले की, “प्रतिबिंब हा एक मराठी सांस्कृतिक उत्सव आहे जो कलाकारांना, थिएटर ग्रूपसना, कार्यशाळा संचालकांना आणि प्रेक्षकांना एकत्र आणतो. यंदाचा प्रतिबंब नाट्य उत्सव या दृष्टीने घेतला गेलेला महत्वाकांक्षी प्रयत्न आहे,विविध विषयांवर भाष्य करणारी नाटकं, कार्यशाळा आणि थिएटर टूर या उत्सवाचा भाग आहेत .या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट अधिकाधिक थिएटर ग्रूपसना या नाट्य उत्सवात सामील करून विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या ,त्यांनी सादर केलेल्या कलाकृती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात. आम्हाला खात्री वाटते की ‘प्रतिबिंब’ हा राज्यातील सर्वोत्तम प्रादेशिक रंगभूमीचा अनुभव घेण्यासाठी चा वन-स्टॉप प्लॅटफॉर्म बनेल. ‘प्रतिबिंब’ नाट्य उत्सव हा मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा जो आपल्या विविध शैलींतील विस्तृत सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे तो एनसीपीएच्या या मंचावर साकारणार आहे. तेव्हा या आणि एनसीपीए च्या मंचावर सादर होणाऱ्या कथांद्वारे महाराष्ट्राच्या नाट्यमय आणि सांस्कृतिक कलाविश्वाचा अनुभव घ्या”.