
सिगारेट ओढण्याचे व्यसन अनेकांना असते. सिगारेट ही फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. मात्र, तुम्हाला जर असे वाटत असेल सिगारेट ओढल्याने फक्त फुफ्फुसांचेच नुकसान होते तर ते चुकीचे आहे. सिगारेट ओढल्याने शरीराच्या अन्य अवयवांना देखील गंभीर नुकसान पोहोचवते. तसेच हळूहळू संपूर्ण शरीराला विषाप्रमाणे हानीकारक आहे. मेंदूपासून ते हृदयापर्यंत सिगारेटच्या धुरामुळे परिणाम होतात. इतकेच नाही सिगारेट तुमचे आयुष्य कमी करते. जगभरात आज 12 मार्च धूम्रपान निषेध दिन साजरा करण्यात येत आहे. तसेच याविषयी जनजागृती केली जाते. चला जाणून घेऊया आरोग्यतज्ज्ञांच्या मते सिगारेटच्या धुरामुळे किंवा धूम्रपानामुळे शरीराला कोणकोणते नुकसान होऊ शकतात.
हृदय
सिगारेटमध्ये निकोटीन आणि टार रक्तवाहिन्या अरुंद करतात. त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. एका अभ्यासानुसार सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका २ ते ४ पट जास्त असतो! धुरात असलेले कार्बन मोनोऑक्साइड रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे हृदयावर जास्त दबाव येतो. रक्तदाब नेहमीच जास्त राहतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका हळूहळू वाढतो.
मेंदू
सिगारेट ओढण्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होतो. यामुळे डिमेंशियाचा धोका वाढू शकतो. धुरातील हानिकारक घटक मेंदूंच्या पेशींना नुकसान पोहोचवतात. ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. मज्जासंस्था कमकुवत होते. परिणामी एकाग्रता आणि विचार करण्याची क्षमता कमी होते.
त्वचा
सिगारेटचा धूर तुमच्या त्वचेतील ओलावा आणि आवश्यक पोषक तत्वे काढून टाकतो, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग आणि निस्तेज त्वचा दिसू लागते. कोलेजनचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे त्वचा निस्तेज होते आणि तुम्ही वेळेपूर्वी म्हातारे दिसू लागता. धूम्रपान करणाऱ्यांची त्वचा लवकर निस्तेज आणि काळी पडते, कारण धूम्रपानामुळे त्वचेला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. जर तुम्हाला तरुण आणि सुंदर दिसायचे असेल तर धूम्रपान सोडणे हा एकमेव मार्ग आहे!
ओठ
सिगारेटमधील हानिकारक द्रव्य निकोटीनचा ओठांवर वाईट परिणाम होतो. यामुळे ओठांचा रंग काळपट होतो.
मूत्रपिंड
सिगारेटमुळे किडनीच्या कर्करोगाचा धोका ५० टक्के वाढतो. धुरातील विषारी पदार्थ मूत्रपिंडाच्या ऊतींना नुकसान करतात. धुरात असलेले विषारी पदार्थ मूत्रपिंडांच्या ऊतींना नुकसान करतात, ज्यामुळे मूत्रपिंड हळूहळू खराब होते. यामुळे रक्तदाब वाढतो. जो मूत्रपिंड निकामी होण्याचे सर्वात मोठे कारण असू शकते.
डोळे
सिगारेटचा धूर डोळ्यांच्या नाजूक रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो, रक्ताभिसरण मंदावते आणि दृष्टी कमकुवत करते. जास्त वेळ धूम्रपान केल्याने मोतीबिंदू आणि दृष्टी अंधुक होऊ शकते. सिगारेट ओढणाऱ्यांना वयाशी संबंधित मॅक्युलर डीजनरेशन (AMD) होण्याचा धोका 3 पट जास्त असतो, ज्यामुळे वयानुसार दृष्टी पूर्णपणे नष्ट होऊ शकते.
तुम्हाला तुमचे संपूर्ण आरोग्य उत्तम ठेवायचे असेल. तर सिगारेट सोडणे केव्हाही उत्तम असते. यासाठी अनेक व्यसनमुक्ती केंद्र आहेत.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)