
दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी धूम्रपान निषेध दिन साजरा केला जातो. हा दिवस धूम्रपान करणाऱ्यांना सोडण्यास प्रोत्साहित करतो आणि लोकांना तंबाखूचे धोके समजून घेण्यास मदत करतो. २०२५ मध्ये, १२ मार्च रोजी धूम्रपान निषेध दिन येत आहे. या दिवशी, जगभरातील लोक धूम्रपानमुक्त जीवनाला प्रोत्साहन देतात आणि तंबाखूमुळे होणारे आरोग्य धोके कमी करण्यासाठी काम करतात. जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि धूम्रपान कायमस्वरुपी कसे सोडावे? आणि काय आहेत फायदे?
कधी झाली सुरुवात?
१९८४ मध्ये युनायटेड किंग्डममध्ये या दिवसाची सुरुवात झाली. तेव्हापासून, सरकारे, आरोग्यसेवा गट आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे या दिवशी जनजागृती केली जाते. विविध संस्थांमार्फत लोकांना धूम्रपान सोडण्यास कशी मदत करता येईल याबाबत माहिती देण्यात येते. धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कसे कमी करता येईल यासाठी विविध समुपदेशन कार्यक्रम घेण्यात येतात. १९८४ मध्ये, आरोग्य व्यावसायिक आणि धूम्रपान विरोधी कार्यकर्त्यांनी लोकांना धूम्रपान सोडण्यास मदत करण्यासाठी हा दिवस तयार केला. कालांतराने, ही मोहीम इतर देशांमध्येही पसरली. आज ही लोक चळवळ बनली आहे.
काय आहे महत्त्व?
धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे आजार तर होतातच मात्र, याव्यतिरिक्त, मेंदू, मज्जासंस्था, डोळे, ओठ, त्वचा, हृदय आणि मूत्रपिंड यासाठी देखील घातक आहे. धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण, औषधांवर होणारा आर्थिक खर्च इत्यादी सर्व बाबींचा विचार केला तर धूम्रपान निषेध दिन साजरा करणे का महत्त्वाचे आहे. हे समजते. धूम्रपानाच्या व्यसनातून लोकांना मुक्त करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कष्ट घेतात. त्यामुळे धूम्रपान निषेध दिन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांसाठी आणि व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी आरंभ बिंदू मानला जातो.
धूम्रपान निषेध मोहिमेचे फलित
धूम्रपान निषेध मोहिमांमुळे आणि जनजागृतीमुळे याचे सकारात्मक परिणाम दिसत आहे. काही अभ्यासांप्रमाणे लोकांमध्ये धूम्रपान सोडण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ३५ टक्के शक्यता निर्माण झाली. तर धूम्रपान सोडण्याच्या दरात १५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आल्याची माहिती आहे. याशिवाय सोशल मीडियामुळेही मोठी मदत झाल्याचे दिसून येते. #QuitFor2025 हा हॅशटॅग लोकप्रिय झाला होता.
धूम्रपान कसे सोडावे?
धूम्रपान सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या समुपदेशन केंद्रात जाऊ शकतात. धूम्रपान सोडवण्यासाठीच्या अनेक ट्रिक्स आता विकसित करण्यात आल्या आहेत. व्यसनमुक्ती केंद्रातील मार्गदर्शनांतर्गत तुम्ही या ट्रिक्स फोलो करू शकता.
काय आहेत फायदे?
धूम्रपान सोडण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुमचे मेंदू अधिक क्रियाशील बनते. फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते. स्ट्रोकचा धोका कमी होतो. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. ओठांचा काळवंडलेपणा कमी होतो. एकूणच आरोग्य उत्तम राहते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)