
दररोज सकाळी, असंख्य लोक कार, बस, मेट्रो, शेअर टॅक्सी आणि इतर वाहतुकीच्या साधनांनी वेळेवर कार्यालयात पोहोचण्यासाठी धावपळ करतात पण तुम्ही कधी ऐकले आहे का जॉबसाठी कोणी दररोज विमान प्रवास करत आहे. घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत दररोज घरून विमानतळापर्यंत येणे तेथील तपासणी आणि नंतर विमानाने प्रवास. जॉबसाठी विमानाने ये-जा करून ७०० किमी अंतर कापणे हे आश्चर्यकारक आहे. मात्र, मलेशियातील ही भारतीय वंशाची महिला दररोज असे अपडाऊन करत आहे. ते देखील दोन मुलांसह कुटुंबाची काळजी घेत ती हे काम करत आहे. ही बाब विशेष आहे कारण आज देखील महिलांना जॉबसाठी मुलाखतीच्या वेळी तुम्ही मुलं आणि घर सांभाळत कामाची जबाबदारी कशी सांभाळणार हा प्रश्न विचारला जातो. असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ही महिला निश्चितच उत्तम उदाहरण ठरू शकते. जाणून घेऊ तिच्या या आव्हानात्मक कामाविषयी...
या महिलेचे नाव 'राचेल कौर' असे आहे. 'CNA (चॅनल न्यूज एशिया)' ने नुकतीच तिची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. ती मलेशियातील पेनांग (penang ) राज्यात राहते. मलेशियातील मलेशियाचे सर्वात मोठे शहर आणि राजधानी, क्वालालंपूर (Kuala Lumpur) येथे एअर एशियामध्ये फायनान्स ऑपरेशन्समध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करते. कौर यांना अशा प्रकारच्या प्रवासाबद्दल विचारले असता राचेल यांनी सांगितले की आधी ती कार्यालयाजवळ घर भाड्याने घेऊन राहत होती आणि आठवड्यातून दोन दिवस घरी येत असे. मात्र, यामुळे तिला आपल्या मुलांसोबत फार कमी वेळ घालवायला मिळत असे. परिणामी कुटुंबाला अधिक वेळ देता यावा म्हणून तिने अखेरीस हा निर्णय घेतला. आता तिला दररोज तिच्या मुलांसोबत वेळ घालवता येत आहे. तसेच हा प्रवास कार्यालयाजवळ भाड्याचे घर घेऊन राहण्यापेक्षा अधिक स्वस्त पडतो. हे कमी खर्चिक आहे, असा दावा तिने केला आहे.
पूर्वी, ती दरमहा किमान $४७४ (अंदाजे ४१,००० रुपये) भाडे आणि इतर खर्चांवर खर्च करत होती. आता, तिचा मासिक प्रवास खर्च $३१६ (अंदाजे २७,००० रुपये) पर्यंत कमी झाला आहे. तिची कंपनी एअर एशियाचा तिला यासाठी पाठिंबा आहे. ते तिच्या या अपडाऊनचे समर्थन करतात.
२०२४ च्या सुरुवातीला, तिने रोज विमान प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या दिनचर्येमुळे तिला तिची नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत झाली, असे कौरने मुलाखतीत सांगितले.
काय आहे कौरची दिनचर्या ?
तिच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल बोलताना, कौरने सांगितले की ती सकाळी ४ वाजता उठते, तयार होते आणि ५ वाजेपर्यंत घर सोडते. मग ती पेनांग विमानतळावर जाते, जिथे ती सकाळी ६.३० च्या क्वालालंपूरच्या विमानाने प्रवास करते.
७.४५ पर्यंत ती तिच्या कार्यालयात पोहोचते. तिचे काम पूर्ण झाल्यावर, ती रात्री ८ वाजता घरी परतते. गुगल मॅप्सनुसार, ती दररोज ये-जा करून सुमारे ७०० किमी अंतर कापते.
विमान प्रवासादरम्यान, कौर 'स्वतःसाठी वेळ' काढते - संगीत ऐकते आणि निसर्गाचे कौतुक करते. विमान उतरल्यावर, ती विमानतळावरून तिच्या कार्यालयापर्यंत ५ ते १० मिनिटे चालत जाते.
सहकार्यांसोबत संवाद साधत काम करणे जास्त सोपे
तिने वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून करण्याच्या पर्यायाविषयी तिचे मत मांडले. ती म्हणाली, ''घरातून काम करण्याऐवजी ती कार्यालयातून काम करणे पसंत करते, कारण सहकार्यांसोबत काम पूर्ण करणे अधिक सोपे जाते. लोकांमध्ये असल्यामुळे गोष्टी करणे सोपे होते. तुम्ही लोकांशी समोरासमोर संवाद साधू शकता," कौरने CNA ला सांगितले.
ती पुढे म्हणाली की जेव्हा ती कार्यालयात असते, तेव्हा ती पूर्णपणे कामावर लक्ष केंद्रित करते आणि जेव्हा ती घरी परतते, तेव्हा ती पूर्णपणे कुटुंबासाठी समर्पित असते.
विमान प्रवासादरम्यान, कौर 'स्वतःसाठी वेळ' काढते. संगीत ऐकते आणि निसर्गाचे कौतुक करते. विमान उतरल्यावर, ती विमानतळावरून तिच्या कार्यालयापर्यंत ५ ते १० मिनिटे चालत जाते.
थकवा येतो पण मुलांना पाहते तेव्हा...
तिने घर आणि काम या दोन्हींमध्ये संतुलन साधला आहे. तथापि, दररोज सकाळी लवकर उठणे खूप थकवणारे असते, असे तिने कबूल केले. पण जेव्हा ती घरी परतते आणि तिच्या मुलांना पाहते, तेव्हा तिचा सर्व थकवा नाहीसा होतो. अडचणी असूनही, राचेल कौर या दिनचर्येसाठी कटिबद्ध आहे. जेव्हा लोक तिच्या दैनंदिन वेळापत्रकाबद्दल ऐकतात, तेव्हा बरेच जण आश्चर्य व्यक्त करतात. तर काही जण तिला 'क्रेझी' म्हणतात, असेही तिने सांगितले.