
उन्हाळ्यात कांदा खाणे हे शरीरासाठी चांगले असते. विशेष करून कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला गारवा प्राप्त होतो. डोळ्यांना कांदा जरी रडवत असला तरी पोट, केस आणि त्वचेसाठी कांदा हा खूपच उपयुक्त असतो. उन्हाळ्यात कांद्याचा वापर भाज्यांमध्ये जास्तीत जास्त केल्यास उष्णतेपासून आराम मिळतो. तर त्वचेवर कांदा चोळण्याचेही अनेक फायदे होतात. जाणून घ्या सविस्तर...
तळपायाची जळजळ थांबते
कडक उन्हामुळे अनेक वेळा तळपायांना आग किंवा जळजळ होते. तळपायाची ही जळजळ थांबवण्यासाठी कांद्याचा उपयोग होतो. कांद्याचे तुकडे करून ते तळपायाल चोळावे. यामुळे लगेच आराम मिळतो.
त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत
त्वचेवर अनेक वेळा पिंपल्स किंवा अन्य कारणामुळे दाग पडतात. हे दाग घालवणे खूप कठीण असते. त्यामुळे सौंदर्याला ते मारक ठरतात. त्वचेवरील डाग कमी करण्यास कांदा उपयुक्त ठरतो. कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेवरील डाग आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करतात.
त्वचा चमकदार होते
कांद्यामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. हे व्हिटामिन सी त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. कांदा त्वचेवर चोळल्याने त्यातील व्हिटामिन सीचा त्वचेला चांगला फायदा मिळतो. त्वचेवरील तेलकटपणा कमी होऊन त्वचा चमकदार बनते.
त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात
त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास कांद्यातील व्हिटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मदत करतात. तुम्ही कांद्याचा रस तयार करून त्वचेला नियमित लावल्यास हळूहळू तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.
त्वचेसाठी कांद्याचा उपयोग कसा कराल?
कांदा वापरण्याच्या दोन तीन पद्धती आहेत.
कांदा किसून तो १० ते १५ मिनिटे त्वचेवर चोळा, नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा
कांद्याचा रस तयार करा आणि हा रस चेहरा किंवा त्वचेवर लावा.
कांद्याची पेस्ट तयार करून त्यात मध आणि तांदळाचे पीठ घालून त्याचा छान फेस पॅक तयार करू शकता.
काय घ्याल काळजी
कांदा चेहऱ्यावर चोळताना किंवा कांद्याचा रस अथवा कांद्याचा पॅक लावताना तो चुकूनही डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)