
रवींद्र राऊळ/मुंबई
‘ऑनलाइन गेम’च्या नादाला लागलेल्या कोथरूडमधील एका तरुणाने तब्बल ३९ लाख रुपये गमावले. या तरुणाने डाऊनलोड केलेल्या या गेममध्ये विमान जितका वेळ हवेत उड्डाण करेल तितके पॉइंट दिले जात होते. इतका सोपा गेम खेळून लाखो रुपये कमवू या भ्रमात तो तरुण त्यात अडकला. पण झाले भलतेच. विशेष म्हणजे त्या गेमची जाहिरात एका क्रिकेटपटूने केली होती.
‘ऑनलाइन गेम’चे हे मेसेज मोबाइलमध्ये येतात ते कॅसिनोमधील गेम अथवा क्रिकेट ॲपच्या स्वरूपात. मनोरंजन म्हणून अथवा फावल्या वेळात कमाई करण्यासाठी तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर या गेमच्या आहारी जात आहे. या जुगारात गेलेली रक्कम परत मिळवण्याच्या आशेने आणखी रक्कम लावली जाते आणि लाखो रुपये गेल्यावरच ते भानावर येतात. पण स्वखुशीने आणि साऱ्या अटी मान्य करूनच गेम डाऊनलोड केल्याने क्वचितच कोणी पोलिसांत धाव घेतो. या फसवणुकीतून अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत, काहींनी आत्महत्या केल्या आहेत, तर गेमवर लावण्यासाठी पैसे मिळावेत यासाठी हत्येसारखे गुन्हेही दाखल झाले आहेत.
या गेमच्या व्यसनामुळे मुलांचे अभ्यासात, कामात लक्ष लागत नाही आणि ते नैराश्याकडे झुकतात. अनेक जण वास्तविक जगापासून दूर होऊन एकाकी होतात आणि त्यांचे सामाजिक संबंध कमी होतात. त्याशिवाय शारीरिक समस्याही उद्भवतात त्या वेगळ्याच.
या गेममध्ये सायबर चोरटे तुमच्या बँक खात्यातून अथवा पेमेंट ॲपमधून रकमा काढू शकतात. काही ‘स्कॅमर’ वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड डिटेल्स चोरू शकतात. ‘ऑनलाइन गेम’ हे सायबर गुन्हेगारांसाठी मात्र बसल्या जागी पैसे कमावण्याचे साधन झाले आहे. या गेममध्ये व्हर्च्युअल चोरीपासून ते वास्तविक जगातील आर्थिक फसवणूक आणि ओळख लपवत दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा समावेश आहे. ‘स्कॅमर’ प्लॅटफॉर्मच्या अनेक कमतरतांचा गैरफायदा घेतात आणि फिशिंग घोटाळे, मालवेअर आणि सोशल इंजिनिअरिंगद्वारे तुम्हाला लक्ष्य करतात.
काय कराल?
मुलांवर लक्ष ठेवा : जर तुम्ही पालक असाल तर मुलांना देखरेखीखालीच ‘ऑनलाइन गेम’ खेळण्याची परवानगी द्या.
‘रिअल मनी ॲप्स’बद्दल सावधगिरी बाळगा : अनेक ‘रिअल मनी गेमिंग ॲप्स’ फसवे असू शकतात. सावध रहा आणि संशयास्पद वाटणारे ॲप्स टाळा.
ॲपला परवानग्या देताना दक्षता घ्या : ॲपला संपर्क, स्टोरेज यासारख्या परवानग्या देण्यापूर्वी सावधगिरी बाळगा.
वैयक्तिक माहितीचे संरक्षण करा : तुमचे पूर्ण नाव, पत्ता किंवा बँक खात्याचे तपशील इत्यादीसारखी तुमची संवेदनशील वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा.
काय टाळाल?
ॲपची सुरक्षितता पहा : संशयास्पद ‘गेमिंग ॲप्स’ डाऊनलोड करू नका.
खात्रीशीर परताव्यांपासून सावध रहा : सोशल मीडियावर किंवा जाहिरातींद्वारे खात्रीशीर परताव्याची हमी देणारे ‘गेमिंग ॲप्स’ इन्स्टॉल करू नका.
माहिती गोपनीय ठेवा : अज्ञात सहकारी खेळाडूंसोबत गोपनीय माहिती शेअर करू नका.
सोशल मीडिया शेअरिंग मर्यादित करा : छळ किंवा सायबर हल्ल्यांचे इतरांना लक्ष्य बनण्यापासून रोखण्यासाठी सोशल मीडियावरील तुमच्या गेमिंग कामगिरीची माहिती प्रसारित करण्याचे टाळा.