‘ऑनलाइन शॉपिंग’ पडू शकते महागात; बनावट ‘ऑनलाइन शॉपिंग’ वेबसाइटपासून सावध रहा

नेरूळ येथील महिला डॉक्टरला ऑनलाइन मागवलेली तीनशे रुपयांची लिपस्टिक एक लाख रुपयांना पडली. बनावट वेबसाइटवाले ‘स्कॅमर’ ऑर्डर देणाऱ्या ग्राहकाच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून त्यात तपशील भरून घेतात आणि त्या माहितीच्या आधारे बँक खाते रिकामे करतात, तर कधी मोबाइलऐवजी बटाटे भरलेले पार्सल हाती पडते. ‘ऑनलाइन शॉपिंग’ करताना पुरेशी काळजी न घेतल्याने असे प्रकार वाढत आहेत.
‘ऑनलाइन शॉपिंग’ पडू शकते महागात; बनावट ‘ऑनलाइन शॉपिंग’ वेबसाइटपासून सावध रहा
Published on

रवींद्र राऊळ/मुंबई

नेरूळ येथील महिला डॉक्टरला ऑनलाइन मागवलेली तीनशे रुपयांची लिपस्टिक एक लाख रुपयांना पडली. बनावट वेबसाइटवाले ‘स्कॅमर’ ऑर्डर देणाऱ्या ग्राहकाच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून त्यात तपशील भरून घेतात आणि त्या माहितीच्या आधारे बँक खाते रिकामे करतात, तर कधी मोबाइलऐवजी बटाटे भरलेले पार्सल हाती पडते. ‘ऑनलाइन शॉपिंग’ करताना पुरेशी काळजी न घेतल्याने असे प्रकार वाढत आहेत.

‘ऑनलाइन शॉपिंग’मुळे होणारी फसवणूक हा असा सायबर गुन्हा आहे, जिथे फसवणूक करणारे सायबर ठग ग्राहकांना बेकायदेशीर खरेदी करण्यासाठी भाग पाडतात. ते बड्या कंपन्यांच्या बनावट वेबसाइट तयार करतात किंवा त्यांच्या कायदेशीर प्लॅटफॉर्ममध्ये फेरफार करत अशा डील ऑफर करतात ज्या मूळ ऑफरपेक्षाही खूपच आकर्षक असतात. याला बळी पडलेल्यांची ते वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरतात. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय ऑनलाइन मार्केटप्लेसबाबत अविश्वास निर्माण होतो.

‘स्कॅमर’ हे किराणा सामान, मद्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा किमती सामानांची विक्री करणाऱ्या नामांकित दुकाने आणि कंपन्यांच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करतात. त्यातून लोकप्रिय हॉटेल आणि इन्शुरन्स कंपन्याही सुटत नाहीत. या बनावट वेबसाइटवर झळकवलेले लोगोही मूळ कंपन्यांच्या लोगोशी हुबेहूब मिळतेजुळते असतात. त्यामुळे ग्राहकवर्ग सहजपणे बळी पडून आपली फसगत करून घेतो. त्यामुळे ऑफर देणारे संशयास्पद ईमेल दुर्लक्षित केले पाहिजेत.

सध्याच्या चंगळवादाच्या जमान्यात ग्राहकांना सापळ्यात अडकवणाऱ्या बनावट वेबसाइटपासून वाचणे, पैसे देण्यासाठी पर्याय निवडणे आणि आपली व्यक्तिगत माहिती सुरक्षित ठेवणे हे एक आव्हानच झाले आहे. अनेक बनावट वेबसाइट आपल्याला जाळ्यात ओढण्यासाठी जाहिराती आणि ‘एसईओ’चा वापर करतात.

काय कराल?

  • किमतींची तुलना करा : वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाइटवरील किमतींची माहिती घ्या.

  • ‘कॅश-ऑन-डिलिव्हरी’ वापरा : जर एखादी वेबसाइट संशयास्पद वाटत असेल, तर ‘कॅश-ऑन-डिलिव्हरी पेमेंट’ पद्धत निवडा. डिलिव्हरी घेताना मागवलेले सामान व्यवस्थित आले आहे का हे पहा.

  • विश्वसनीय विक्रेते निवडा : ई-कॉमर्स वेबसाइटवरील प्रस्थापित किंवा विश्वसनीय कंपन्या आणि विक्रेत्यांकडून खरेदी करणे पसंत करा.

  • ऑफरची खातरजमा करा : ज्या ऑफर अवास्तव, अव्यावहारिक अथवा भुरळ पाडणाऱ्या वाटतात अशा आकर्षक ऑफरपासून सावध रहा. ऑर्डर देण्याआधी त्याबद्दल खात्री करून घ्या.

  • सुरक्षित व्यवहार : लक्षात ठेवा, पैसे मिळविण्यासाठी तुम्हाला कधीही पिन, पासवर्ड किंवा ओटीपी शेअर करण्याची अजिबात आवश्यकता नाही.

काय टाळाल?

  • सार्वजनिक नेटवर्क टाळा : कधीही सार्वजनिक संगणक किंवा नेटवर्क वापरून ई-शॉपिंग व्यवहार करू नका.

  • तुमची माहिती सुरक्षित ठेवा : तुमचे कार्ड तपशील, जन्मतारीख, फोन नंबर इत्यादी माहिती अविश्वसनीय ई-शॉपिंग वेबसाइटवर सेव्ह करू नका.

  • विक्रेत्यांची पडताळणी करा : विक्रेत्याच्या ओळखपत्रांची पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही सीटूसी प्लॅटफॉर्मवर आगाऊ पैसे देऊ नका.

  • क्यूआर कोडपासून सावध रहा : जर एखाद्या अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर पैसे मागितले तर क्यूआर कोड स्कॅन करू नका.

logo
marathi.freepressjournal.in