
मुंबई : ‘सिम स्वॅपिंग’ म्हणजे एक असा सायबर गुन्हा आहे जो तुमच्या मोबाईल फोन नंबरचा ताबा चोरून, तो दुसऱ्या सिम कार्डमध्ये हस्तांतरित करतो. यात, सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईल कंपनीला फसवून तुमचा नंबर त्यांच्या ताब्यात असलेल्या सिम कार्डमध्ये पोर्ट करतात, परिणामी, ते तुमच्या नावाने येणारे मेसेज आणि कॉल मिळवू शकतात.
डिलिव्हरी बॉयच्या एका खोट्या कॉलला प्रतिसाद देत त्याला ‘ओटीपी’ सांगण्याने दिल्लीतील एका डॉक्टरला ५० लाखांना फटका बसला. हे गुन्हेगार तुमच्या मोबाईल कंपनीशी संपर्क साधतात. ते तुमच्याबद्दलची काही माहिती (जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख इ.) वापरून तुमच्या कंपनीला तुमचा नंबर दुसऱ्या सिममध्ये पोर्ट करण्यास सांगतात. गुन्हेगारांनी तुमच्या कंपनीला फसवले, तर तुमचा नंबर त्यांच्या ताब्यात असलेल्या सिममध्ये पोर्ट केला जातो. तुमचा नंबर पोर्ट झाल्यावर, तुमचा फोन नेटवर्कशी कनेक्ट होणार नाही आणि तुम्हाला कॉल किंवा मेसेज येणार नाहीत. मात्र ते सायबर गुन्हेगार मात्र तुमचा फोन नंबर वापरून तुमच्या बँक खात्यांमध्ये, सोशल मीडियावर किंवा इतर खात्यांमध्ये प्रवेश मिळवू शकतात, कारण त्यांना तुमच्या खात्यांशी संबंधित मेसेज आणि कोड मिळतात. अर्थातच ‘ओटीपी’ही त्याच सिमवर जात असल्याने त्यांना कुणाचेही बँक खाते क्षणार्धात रिकामे करता येते.
तुम्हाला तुमचा फोन अचानक नेटवर्कशी कनेक्ट होत नाही किंवा तुम्हाला काही संशयास्पद मेसेज येत असतील, तर तुमच्या मोबाईल कंपनीशी त्वरित संपर्क साधा. आपले बँक खाते आणि इतर महत्त्वाचे खाते तपशील कोणाशीही शेअर करू नका. शक्य असल्यास, तुमच्या खात्यांसाठी २-फॅक्टर ऑथेंटिफिकेशन सक्षम करा. यामुळे तुमचा नंबर पोर्ट झाला तरी, तुमच्या खात्यांमध्ये प्रवेश करणे गुन्हेगारांसाठी अधिक कठीण होईल. नवीन सिम कार्ड घेताना आधार-आधारित बायोमेट्रिक पडताळणीचा वापर करा.
काय कराल?
मजबूत पिन वापरा : तुमच्या अकाउंट्स आणि सिमसाठी अंदाज लावण्यास कठीण असा ‘पिन सेट’ करा.
मअपडेट रहा : तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर आणि ॲप्स नियमितपणे अपडेट ठेवा.
संशयास्पद व्यवहारांची तक्रार करा : तुम्हाला असामान्य व्यवहार आढळल्यास किंवा तुमचे सिम हरवल्यास ताबडतोब तुमच्या सिम कार्ड कंपनीशी संपर्क साधा.
बँकेच्या संपर्कात रहा : ‘कार्ड स्वॅपिंग’ झाल्याचा संशय आल्यास त्वरित बँकेला कळवा आणि कार्ड ब्लॉक करा.
काय टाळाल?
माहितीचे संरक्षण करा : कधीही संवेदनशील डेटा साठवू नका किंवा कॉल किंवा मेसेजद्वारे अनोळखी लोकांसोबत ‘ओटीपी’ शेअर करू नका.
सिम हरवल्याची तक्रार करा : तुमचे सिमकार्ड हरवले तर तुमच्या नेटवर्क प्रदात्याला ताबडतोब कळवा.
सुरक्षित क्रेडेन्शियल्स : तुमच्या सिम कार्डशी जोडलेले ओळख तपशील कधीही शेअर करू नका.