Phishing Scam: थांबा, कोणतीही ‘लिंक’ क्लिक करताना विचार करा; दहा मिनिटांतच बँक खाते होईल रिकामे

आघाडीच्या आरोग्य विमा कंपनीकडून आलेला ईमेल पाहून आधीपासूनच त्या कंपनीचे पॉलिसीधारक असलेल्या महेश पाटील यांनी त्यातील आवाहनानुसार एक ‘लिंक’ क्लिक करत आपली वैयक्तिक माहिती भरली आणि आपल्या कामाला लागले. दहा मिनिटांतच त्यांच्या बँक खात्यातील अडीच लाख रुपये गायब झाले आणि त्यांनी कपाळाला हात लावला.
Phishing Scam: थांबा, कोणतीही ‘लिंक’ क्लिक करताना विचार करा; दहा मिनिटांतच बँक खाते होईल रिकामे
Published on

रवींद्र राऊळ/मुंबई

आघाडीच्या आरोग्य विमा कंपनीकडून आलेला ईमेल पाहून आधीपासूनच त्या कंपनीचे पॉलिसीधारक असलेल्या महेश पाटील यांनी त्यातील आवाहनानुसार एक ‘लिंक’ क्लिक करत आपली वैयक्तिक माहिती भरली आणि आपल्या कामाला लागले. दहा मिनिटांतच त्यांच्या बँक खात्यातील अडीच लाख रुपये गायब झाले आणि त्यांनी कपाळाला हात लावला. संशय आल्याने त्यांनी तो ई मेल तपासला तेव्हा त्यातील कंपनीचे नाव बेमालूमपणे बदललेले असल्याचे आढळले. एखादा मासा गळाला लावण्यासारखाच हा प्रकार ‘फिशिंग स्कॅंम’ म्हणून ओळखला जातो.

एखाद्याने त्याची संवेदनशील आणि गोपनीय आर्थिक माहिती स्वतःहून द्यावी आणि त्याचा वापर करत त्याचे खाते रिकामे करता यावे यासाठी स्कॅमर असे ‘फिशिंग’ करतात. केवळ बनावट ई मेलच नव्हे तर मोबाईलवर किंवा वेबसाइटद्वारे संपर्क साधत एखादी ‘लिंक’ पाठवत महत्वाची माहिती अलगद काढून घेतात. लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि शंका येऊ नये यासाठी हे मेसेज अनेकदा नामांकित बँका, विविध सेवा पुरवणाऱ्या कंपन्या अथवा इतर कुठल्यातरी संस्थांचे असल्याचे भासवले जाते. ई मेल हे ‘फिशिंग’साठी सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम असले तरी त्याचे ‘स्पीअर, क्लोन, एचटीटीपी, पॉप अप, इव्हिल ट्वीन’ असे अनेक प्रकार आहेत. स्कॅमर बनावट ‘डोमेन’ची नोंदणी करतात जी नामांकित बँका, कंपन्या आणि वित्तसंस्थांच्या ‘डोमेन’ नावांशी साधर्म्य असलेली असते. या नामांकित संस्थांच्या स्पेलिंगमध्ये एखाद्या अक्षराचा असा काही किंचितसा बदल करून ई मेल पाठवले जातात की ते बनावट असल्याची शंका येणे कठीण होते.

अशा ‘लिंक’ क्लिक केल्याने वापरकर्त्याची माहिती स्कॅमरला मिळते अथवा सायबर गुन्हेगारांना तुमच्या डिव्हाइसवर अनधिकृत प्रवेश मिळतो. त्याचा लाभ घेत ‘हॅकिंग’ करता येते. तसे झाल्यास वापरकर्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. म्हणून कोणतीही ‘लिंक’ क्लिक करण्याआधी विचार करूनच क्लिक करा.

काय कराल?

  • सतर्क राहा : अनपेक्षितपणे आलेले संदेश सावधगिरीने हाताळा.

  • पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पडताळा : संदेशाच्या सत्यतेबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास पाठवणाऱ्याशी थेट संपर्क साधा.

  • सॉफ्टवेअर अपडेट ठेवा : अँटीव्हायरस आणि वेबब्राऊझर अपडेट असल्यास ‘फिशिंग’ हल्ले शोधणे आणि टाळणे सोपे जाते.

  • फिशिंग रिपोर्ट : ‘फिशिंग’चा प्रयत्न झाल्यास संबंधित अधिकारी किंवा प्लॅटफॉर्मला सूचना द्या.

काय टाळाल?

  • ‘लिंक्स’वर क्लिक करणे टाळा : संशयास्पद ‘लिंक्स’ आणि अज्ञात व्यक्तींकडून आलेले संदेश तत्काळ हटवा.

  • ब्लॉक करा : संशयास्पद ‘लिंक्स’ असलेल्या ई मेलमधून सदस्यता रद्द करा आणि ई मेल ब्लॉक करा.

  • अधिकृत वेबसाइटना भेट द्या : आर्थिक व्यवहारांसाठी नेहमीच अधिकृत वेबसाइटवर जात त्याची सुरक्षा पडताळून पाहा.

  • घाई करू नका : मेलमध्ये 'तातडीने कारवाई आवश्यक’ व किंवा 'तुमचे खाते बंद केले जाईल', अशी धमकीवजा आणि घाई करण्यास भाग पडणारी वाक्ये असल्यास सावध व्हा.

logo
marathi.freepressjournal.in